पुणे जिल्ह्यात भात रोपवाटिकेची कामे सुरू

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः गेल्या आठवड्यापासून पुणे जिल्ह्यातील काही भागात पाऊस होत असल्याने शेतकऱ्यांनी खरिपाची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात भात रोपवाटिका टाकण्यास सुरवात झाली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत रोपवाटिकेच्या कामांना वेग येणार आहे.

पुणे जिल्ह्यात खरिपाची सुमारे दोन लाख ३० हजार हेक्‍टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. पश्‍चिमेकडील भोर, वेल्हा, मावळ, मुळशी तसेच उत्तरेकडील खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्‍यांत प्रामुख्याने भात पिकाची लागवड केली जाते. यंदा भात पिकाच्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असून, सुमारे ६४ हजार ८०० हेक्‍टरवर लागवड होण्याचा अंदाज आहे. त्यातच, यंदा चांगल्या पावसाची शक्‍यता असल्याने शेतकऱ्यांनी सुरवातीपासून खरिपाचे नियोजन करण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी लागणाऱ्या निविष्ठांचा पुरवठा कृषी विभागामार्फत कृषी सेवा केंद्रांना सुरू असून शेतकऱ्यांना निविष्ठा उपलब्ध होणार आहे.

भात पट्ट्यातील शेतकऱ्यांनी सध्या शेती मशागती व रोपवाटिकेची कामे हाती घेतली आहे. काही शेतकऱ्यांनी भाताच्या बियाणांची उगवणक्षमता तपासून पाहण्याचे काम हाती घेतली आहे. पश्‍चिम पट्यात भात लागवडीसाठी मजुरांची टंचाई भासत असल्याने यांत्रिकीकरणाचा अवलंब करण्यावर शेतकऱ्यांचा सर्वाधिक भर राहणार आहे.

त्यासाठी आत्मा व कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाद्वारे भात लागवड व त्यासाठी लागणारी रोपवाटिका यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. या प्रशिक्षणाचा लाभ शेतकरी घेत असून रोपवाटिकेची कामे सुरू केली आहे. काही ठिकाणी रोपवाटिकेत भात बियाणे टाकण्याचे कामे सुरू आहे. पाण्याची उपलब्धता असलेल्या शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यात रोपवाटिकेत बियाणे टाकले असून ते आता उगवून वर आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com