परभणीत ‘जलयुक्त’ची एक हजारांवर कामे अद्याप सुरू नाहीत

परभणीत ‘जलयुक्त’ची एक हजारांवर कामे अद्याप सुरू नाहीत
परभणीत ‘जलयुक्त’ची एक हजारांवर कामे अद्याप सुरू नाहीत

परभणी : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानाच्या चौथ्या वर्षी (२०१८-१९ मध्ये) गावांची निवड करण्याचे उद्दिष्ट निश्चित केलेले असताना २०१६-१७ मध्ये निवड झालेल्या गावांतील कार्यारंभ दिलेल्या जलसंधारणाच्या कामांपैकी ८७४ कामे आणि २०१७-१८ मध्ये निवड झालेल्या गावांतील १६२ कामांना असे दोन्ही वर्षाच्या मिळून एकूण १ हजार ३६ कामांना अद्याप सुरवात झालेली नाही.

पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सुरू करण्यात जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत पहिल्या वर्षी (२०१५-१६ मध्ये) जिल्ह्यातील १७० गावांची निवड करण्यात आली होती. दुसऱ्या वर्षी (२०१६-१७ मध्ये) १६० गावांची निवड करण्यात आली होती. तिसऱ्या वर्षी (२०१७-१८ मध्ये) १२८ गावांची निवड करण्यात आली. चौथ्या वर्षी (२०१८-१९ मध्ये) १०० गावांची निवड करण्याचे उद्दिष्ट दिलेले आहे.

२०१६-१७ आणि २०१७-१८ या वर्षीच्या आराखड्यानुसार कार्यारंभ दिलेल्या कामांपैकी १ हजार ३६ कामांना अद्याप सुरवातच झालेली नाही. २०१६-१७ मध्ये जलसंधारणाच्या ५२८१ कामांचा १३६ कोटी ९२ लाख रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यापैकी ५१३९ कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्यापैकी ४९३८ कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आले.

गतवर्षी अतिवृष्टीमुळे तसेच पिके उभी असल्यामुळे अनेक कामांच्या ठिकाणी यंत्रसामग्री नेण्यासाठी अडचणी आल्या. त्यामुळे अनेक कामांना विलंबाने सुरवात झाली. आजवर ३४७१ कामे पूर्ण झाली आहेत. ६२५ कामे अपूर्ण आहेत. पूर्ण झालेल्या कामांवर ४० कोटी ५२ लाख २४ हजार रुपये खर्च झाला आहे.

अद्याप सुरू न झालेल्या कामांमध्ये कृषी विभागाच्या २९० ठिकाणचे ढाळीचे बांध, ४१ ठिकाणचे खोल सलग समतलचर, १ ठिकाणचा मातीनाला बांध, १४२ शेततळी, १८ नाला खोलीकरण, रुंदीकरण, सिंचन विभागाचे ७३ सिमेंट नाला बंधारे, पंचायत विभागाचे २९४ विहिरी, बोअर पुर्नभरण, सामाजिक वनीकरण विभागाचे १ वृक्षलागवडीचे काम, कृषी आणि सिंचन विभागाचे १२ लघुसिंचन तलाव, भूजल सर्वेक्षण यंत्रणा आणि जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभाग यांचे प्रत्येकी एक नाला खोलीकरण आदी कामांचा समावेश आहे.

२०१७-१८ मध्ये ३ हजार ६५ कामांचा ७० कोटी ३६ लाख खर्चाचा आराखडा प्रस्तावित करण्यात आला आहे. प्रशासकीय मान्यता दिलेल्या ३६५ कामांपैकी २ कोटी २४ लाख ६ हजार रुपये खर्चाच्या २७८ कामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले. त्यापैकी १५८ कामे पूर्ण झाली असून २१ कामे अपूर्ण आहेत. पूर्ण झालेल्या कामांवर ९६ लाख ३७ हजार रुपये खर्च झाला आहे. अद्याप सुरू न झालेल्या कामांमध्ये कृषी विभागाचे २२ ठिकाणचे ढाळीचे बांध, १४० शेततळी यांचा समावेश आहे.

२०१८-१९ यावर्षी जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत १०० गावांची निवड करण्याचे उद्दिष्ट आहे. परंतु गेल्या दोन वर्षातील १ हजार ३६ कामे अद्याप सुरू झालेली नाहीत.गतवर्षीच्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या ३० टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे येत्या काळात अनेक गावांत टंचाईची स्थिती उद्भवणार आहे.

जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत मंजूर झालेली सर्व कामे उन्हाळ्यात पूर्ण होणे आवश्यक आहे. तरच येत्या पावसाळ्यात या कामांमुळे संरक्षित पाणीसाठा जमा होऊन पाणीटंचाईवर मात करणे शक्य होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com