सर्व विभागांचे काम पंतप्रधानांच्या कार्यालयातूनच, मंत्र्यांना कामच नाही : यशवंत सिन्हा

यशवंत सिन्हा
यशवंत सिन्हा

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयातूनच देशाच्या सर्व विभागांचे काम सुरू असून केंद्रीय मंत्र्यांना कोणतेही अधिकार नाहीत, त्यांना कामच उरले नसल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी केली.  भाजप सरकारच्या विरोधात सिन्हा यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या राष्ट्रमंच या संघटनेची स्थापना केली असून, या संघटनेच्या वतीने आयोजित ''लोकशाही वाचवा, संविधान वाचवा'' या कार्यक्रमात शुक्रवारी (ता. १०) ते बोलत होते. या कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री अरुण शौरी, भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा, आपचे खासदार संजय सिंग, तृणमूल काँग्रेसचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी, अॅड. माजिद मेमन, ज्येष्ठ वकील आभा सिंह, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते घनश्याम तिवारी, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे आदी उपस्थित होते. सिन्हा म्हणाले, की पंतप्रधान मोदी यांच्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते गृहमंत्री राजनाथसिंग आहेत. पण त्यांना काश्मीरमधील मुफ्ती मेहबूबा सरकारचा पाठिंबा काढला हे माहितीच नव्हते. ईशान्य भारतात सुरक्षाविषयक धोरण पंतप्रधान मोदी यांनी घोषित केले, त्याची माहितीसुद्धा गृहमंत्र्यांना नव्हती. नोटाबंदीच्या निर्णयाबाबत अर्थमंत्री अरुण जेटलीही अनभिज्ञ होते. तसेच परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाही काहीही काम उरले नाही. देशाची सध्याची परराष्ट्र नीती काय आहे, याबाबत त्या सांगू शकत नाहीत. मंत्री स्वराज ट्विटरवर परराष्ट्र खाते चालवतात. देशात सध्या संविधानाची पायमल्ली सुरू आहे. केवळ एकाधिकारशाहीवर कारभार सुरू आहे. हा कारभार असाच सुरू राहिल्यास भारतीय लोकशाही धोक्यात येईल. पण मुंबई ही क्रांतीची नगरी आहे. इथून सुरू झालेली लढाई लोकशाहीचा निःपात करणाऱ्यांच्या विरोधात नक्कीच जिंकू, असा विश्वास सिन्हा यांनी या वेळी व्यक्त केला. माजी मंत्री अरुण शौरी म्हणाले, की देशात आतापर्यंत गोरक्षा आणि धर्माच्या नावावर 72 जणांची हत्या झाली आहे. सोहराबुद्दीन केसमधील साक्षीदार उलटले आहेत. माध्यमांनी न घाबरता काम केले पाहिजे, त्याशिवाय सत्यता लोकांपर्यंत पोचणार नाही. 2019 ला बदल न झाल्यास लोकशाही संपली असेच समजा, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. जनतेने पंतप्रधानांनी केलेल्या घोषणांचा पाठापुरावा करावा. एक एक घोषणा घ्या, त्या घोषणेचा किती फोलपणा आहे, त्याच्या खोलात जा म्हणजे जुमला काय आणि खरे काय ते समजेल.  भाजपने मला सोडावे ः शत्रुघ्न सिन्हा सातत्याने सरकारच्या भूमिकेवर बोट ठेवत असल्याने, लोक मला विचारतात भाजप सोडणार का? पण मी भाजपच्या आधी भारतीय जनतेचा आहे. जनतेच्या प्रश्नांवर सरकारवर बोलणार, मी भाजप सोडणार नाही, भाजपने मला सोडावे. नोटाबंदी कुणाला विचारून या सरकारने केली. नोटाबंदीचे फार दूरगामी दुष्परिणाम जाणवत आहेत. अनेक उद्योग बुडाले त्याचबरोबर लाखो लोकांचा रोजगार गेला, त्याला जबाबदार कोण? भाजपने मला निवडणुकीत तिकीट द्यावे की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. पण तिकीट पाहिजेच कुणाला, असे खासदार शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com