यवतमाळ जिल्ह्यात शंभर टक्के क्षेत्रावर बोंड अळी

यवतमाळ जिल्ह्यात शंभर टक्के क्षेत्रावर बोंड अळी
यवतमाळ जिल्ह्यात शंभर टक्के क्षेत्रावर बोंड अळी

यवतमाळ : जिल्ह्यातील पाच लाख हेक्‍टरवर कपाशीची पेरणी शेतकऱ्यांनी केली. त्यातील तब्बल चार लाख ९४ हजार हेक्‍टरवरील पीक बोंड अळीने नष्ट केले. म्हणजेच जवळपास शंभर टक्के क्षेत्रावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. यामध्ये दोन हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्र धारण केलेल्या शेतकऱ्यांचे एकूण क्षेत्रफळ तीन लाख १९ हजार हेक्‍टर आहे. शासकीय नियमानुसार त्यांना ३४९ कोटी रुपयांची मदतीचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात यंदा पाच लाख सहा हजार ७३२ हेक्‍टर क्षेत्रावर तीन लाख ६० हजार ७९१ शेतकऱ्यांनी लागवड केली होती. त्यापैकी पाच लाख हेक्‍टरवर बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. जवळपास शंभरटक्के क्षेत्रावरचे पीक यंदा बोंड अळीने फस्त केले. शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह विरोधकांनी लावून धरली. नागपूर येथे झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात कृषिमंत्र्यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिले. त्यानंतर महसूल व कृषी विभागाने पंचनाम्याला सुरवात केली. गुलाबी बोंड अळीमुळे कापूस पिकाचे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, कृषी विभागाने आपला अहवालही सादर केला आहे.

सादर केलेल्या अहवालात चार लाख ९४ हजार ५७४ हेक्‍टरवरील नुकसान ३३ टक्केच्यावर असल्याचे नमूद आहे. त्यात जिरायती बाधित क्षेत्र चार लाख ९१ हजार ३६४ हेक्‍टर, तर बागायतीचे क्षेत्र तीन हजार २१० हेक्‍टर आहे. केंद्रीय आपत्ती निवारणाच्या नियमानुसार दोन हेक्‍टरच्या आत हेक्‍टरी सहा हजार ८०० रुपये देण्याचे निकष आहेत. तीन लाख १९ हजार ३५६ हेक्‍टर क्षेत्र दोन हेक्‍टरपेक्षा कमी आहे. हे क्षेत्र धारण केलेल्या शेतकऱ्यांची संख्या ९४ हजार ८५ आहे. कृषी विभागाच्या अंतिम अहवालात या बाबी स्पष्ट झाल्या आहेत. हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा केली होती.

कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील तीन लाख शेतकरी बाधित झाले आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या नजरा मदतीकडे लागल्या आहेत. बोंड अळीच्या आक्रमणामुळे यंदा जिल्ह्यात कपाशीच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचे दिसून येत आहे.

३५० कोटींची मदत अपेक्षित आपत्ती निवारणाच्या निकषानुसार सहा हजार ८०० रुपयांप्रमाणे जिल्ह्यात दोन हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी २१७ कोटी १६ लाख रुपयांची मदत अपेक्षित आहे. दोन हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी १२७ कोटी ९६ लाख निधीची आवश्‍यकता आहे. जिराईत कापूस क्षेत्राकरिता एकूण ३४५ कोटी, तर बागाईत चार कोटी असे एकूण ३४९ कोटी १७ लाख रुपयांची मदत अपेक्षित आहे.

प्रस्ताव शासनाकडे पाठविणार गुलाबी बोंडअळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले आहेत. कृषी व महसूल विभागाने केलेले सर्वेक्षण पूर्ण झाले असून, प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com