agriculture news in marathi, yavatmal poisoning case | Agrowon

यवतमाळच का?
मनोज कापडे
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

विषबाधेनंतर वापरल्या गेलेल्या कीटकनाशकांचे नमुने गोळा केले का, ते तपासण्यात आले काय, तपासलेल्या कीटकनाशकांमधील विषाची तीव्रता जास्त होती काय, या प्रश्नाची उत्तरेदेखील कृषी खात्याने दिलेली नाहीत.

पुणे : यवतमाळ जिल्ह्यात कापसावर फवारणी करताना झालेल्या विषबाधेच्या घटनांना आणि मृत्यूंना मानवी चुका कारणीभूत असल्याचा दावा करून हात झटकण्याचा प्रयत्न कृषी खाते करीत असले तरी त्यापलीकडेही अनेक अनुत्तरीत प्रश्न असल्याकडे जाणकार लक्ष वेधत आहेत. विशेष म्हणजे कापूस उत्पादन करणारे जिल्हे पंधरापेक्षा अधिक आहेत व बहुतांश ठिकाणी रोग-कीडींचा प्रादुर्भाव झालेला असताना विषबाधेच्या बहुतांश घटना यवतमाळ जिल्ह्यातच का झाल्या, याचे समाधानकारक उत्तर खात्याकडे नाही.

यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनाच फवारण्या कशा करायच्या याचे शास्त्रीय ज्ञान नाही, बाकी साऱ्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना ते अाहे, असा कृषी खात्याच्या दाव्याचा अर्थ होतो आहे. कृषी आयुक्तालयाच्या गुणनियंत्रण विभागाचे संचालक अशोक लोखंडे यांनी विषबाधाग्रस्त भागांना भेटी दिल्यानंतर आपल्या अहवालात काही निष्कर्ष मांडले आहेत. यवतमाळ जिल्ह्यात कापूस उत्पादक पट्ट्यात फवारल्या गेलेल्या कीटकनाशकांमुळे १८ जणांचा मृत्यू झाला असून ५०० पेक्षा जास्त व्यक्ती बाधित झालेल्या आहेत.

कृषी आयुक्तालयाला या घटनेची माहिती मिळाल्यानंतर २८ सप्टेंबरला कृषी संचालक श्री. लोखंडे यांनी ९ जणांच्या तज्ञ पथकासह विषबाधाग्रस्त भागांना भेटी दिल्या. अकोला कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्र विभागप्रमुख डॉ. धनराज उंदिरवाडे यांनीदेखील ९ तज्ञांचे दुसरे एक पथक तयार करून अन्य गावांना भेटी दिल्या आहेत.

'कृषी संचालकांनी दिलेल्या अहवालानुसार शेतकरी व शेतमजूर सातत्याने कीटकनाशकांच्या संपर्कात होते. मात्र, फवारणी करताना चष्मा, हातमोजे, मास्क, गणवेश याचा वापर करण्यात आला नाही. वाऱ्याच्या विरोधी दिशेने फवारणी, शरीर स्वच्छ न करता जेवण करणे, फवारलेल्या हातांनी तंबाखू सेवन करणे अशा निष्काळजीपणामुळे श्वसन व त्वचेच्या मार्गाने विषबाधा घडून आली, असे अहवालात नमूद केले आहे.

कृषी आयुक्तालयाच्या अहवालानुसार २७ सप्टेंबरपर्यंत पुसद ४, उमरखेड 2, महागाव 5, आरणी 59, दिग्रज 14, दारव्हा 19, कळंब 26, बाभुळगाव 16, नेर 8, राळेगाव 13, पांढरकवडा 25, घाटंजी 40, मारेगाव 2, झरी 6 तर यवतमाळमध्ये 67 जणांना बाधा झाली आहे.

विषबाधा झालेल्या भागात अनेक प्रकारची कीटकनाशके वापरली गेली आहेत. मात्र, ऑरगॅनोफॉस्फरस गटातील चार कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे विषबाधा झालेल्या मजुरांची संख्या जास्त आहे. प्रोफेनेफॉस, मोनोक्रोटोफॉस, सायपरमेथ्रीन आणि डायफेन्थुरॉनचा वापर जास्त दिसतो आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. ही कीटकनाशके हिरवी, पिवळी आणि निळ्या श्रेणीतील म्हणजे घातक श्रेणीतील नाहीत, असा दावा कृषी खात्याने केला आहे.

'कीटकनाशके कशी वापरावीत यासाठी यवतमाळच्या १८७३ गावांमध्ये यापूर्वीच जनजागृती मोहीम राबविली गेली होती. त्यासाठी २५ हजार घडीपत्रिकांचे वाटप करण्यात आले होते. क्रॉपसॅपच्या माध्यमातूनदेखील जागृती करण्यात आलेली होती. मात्र, प्रत्यक्ष शेतात कीटकनाशकांचा वापर सुरक्षितपणे वापरण्याची पद्धत नसल्यामुळे हा प्रकार घडून आला आहे. यात विशिष्ट कीटकनाशकांमुळेच विषबाधा झाल्याचे म्हणता येत नाही, असाही दावा कृषी खात्याने केला आहे.

लाखो रुपयांची उधळपट्टी करून कृषी खात्याकडून क्रॉपसॅप योजना राबविली जाते. कपाशीवर जादा कीड आल्यावर ते जाहीर करणारी आणि त्यानुसार उपाययोजना करणारी यंत्रणा या प्रकल्पात आहे. ही यंत्रणा संबंधित बाधित गावांमध्ये कार्यरत होती काय, कीटकनाशकांची विक्री करणाऱ्या कंपन्यांची जबाबदारी काय आणि ती पार पाडली गेली होती की नाही, याचाही शोध घेण्याची आवश्यकता असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

अनेक प्रश्न अनुत्तरीत
विशिष्ट कंपन्यांच्या कीटकनाशकांमध्ये विषाची तीव्रता जास्त असल्यामुळे हा धक्कादायक प्रकार घडला काय, याचा शोध कृषी खात्याने अजूनही घेतला नसल्याचे उघड झाले आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेशात कपाशीवर मोठ्या प्रमाणात कीटकनाशके फवारली जातात. त्यासाठी हायपॉवर पंपांचा वापर होतो. कीटकनाशकेदेखील सर्वत्र सारखीच असतात.

मग केवळ यवतमाळ जिल्ह्यामध्येच विषबाधा का झाली, विषाची तीव्रता न तपासल्यामुळे तयार झालेला संशय कायम ठेवण्यामागे हेतू काय, याचे उत्तर कृषी खात्याला देता आलेले नाही. विषबाधेनंतर वापरल्या गेलेल्या कीटकनाशकांचे नमुने गोळा केले का, ते तपासण्यात आले काय, तपासलेल्या कीटकनाशकांमधील विषाची तीव्रता जास्त होती काय, या प्रश्नाची उत्तरेदेखील कृषी खात्याने दिलेली नाहीत.

आग लागली तरी बंब तयार नाही
कीटनाशके, खते आणि बियाणे हा विभाग हाताळणारा स्वतंत्र विभाग कृषी आयुक्तालयात आहे. सध्या या विभागाला कायमस्वरूपी अधिकारीच नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्याचे गुणनियंत्रण संचालक अशोक लोखंडे निवृत्त झाले आहे. त्यांचे कामकाज तात्पुरत्या स्वरूपात विस्तार सहसंचालक एम. एस. घोलप यांच्याकडे देण्यात आले आहेत.

राज्याचे मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पददेखील भरण्यात आलेले नाही. यापदाची जबाबदारी मुख्य सांख्यिक उदय देशमुख यांच्याकडे देण्यात आली आहे. 'विषबाधा प्रकरणामुळे आग लागली तरी आमचे बंब तयार नाहीत, अशी खंत एका अधिकाऱ्याने व्यक्त केली.

इतर अॅग्रो विशेष
नेमका गरजेवेळी युरिया जातो कुठे?जळगाव  ः जिल्ह्यात मागील काही दिवसांत चांगला...
केरळमध्ये युद्धपातळीवर मदतकार्य तिरुअनंतपुरम : केरळमधील पूरस्थिती अजूनही गंभीर...
मोसंबीची फळगळ वाढलीऔरंगाबाद : मोसंबीच्या आंबे बहारावर फळगळीचे संकट...
पाऊस आला; पण त्यानं नुकसान टळलं का?झळा दुष्काळाच्याः जिल्हा जालना जालना जिल्ह्यात...
कोल्हापूर जिल्ह्यातील ५२ बंधारे...कोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाचा...
कमी दाब क्षेत्राची निर्मिती; पावसाचा...पुणे : बंगालच्या उपसागरात रविवारी (ता. १९) कमी...
राज्यात मुबलक युरियापुणे: राज्याच्या काही भागात अपेक्षित पाऊस...
केरळात साडेतीन लाखावर लोक विस्थापित ;...तिरुअनंतपुरम : केरळ राज्यात अतिवृष्टी...
खरिपात खर्चही निघेल असं वाटत नाहीझळा दुष्काळाच्या ः जिल्हा नगर मागचे पाच-...
डाळिंबावर फुलगळीचा प्रादुर्भावसांगली ः राज्यात मृग हंगामात ८० ते ९० हजार हेक्‍...
अतिपावसाचा खरिपाला फटकापुणे : दीर्घ खंडानंतर बुधवार (ता.१५) ते शुक्रवार...
लष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोकायुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर...
पीक बदलातून शेती केली किफायतशीरकोठारी येथील माध्यमिक शाळेमधील शिक्षकाची नोकरी...
अन्नपूर्णा उद्योगातून स्वयंपूर्णतेकडेआवडीचं क्षेत्र जेव्हा आपल्या व्यवसायाचा आधार बनते...
चंद्रपूर : पोडसा पूल पाण्याखाली; पाच...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : दोन...
केरळमध्ये पुरामुळे २४७ जणांचा मृत्यूतिरुअनंतपुरम : मागील आठवडाभर चालू असलेल्या...
कधी ढग, तर कधी पावसाची नुसती भुरभुरझळा दुष्काळाच्याः जिल्हा सांगली पहिल्या पावसावर...
मराठवाड्यात दुसऱ्या दिवशीही दमदार पाऊसऔरंगाबाद : मराठवाड्यातील ४२१ महसूल मंडळांपैकी...
ग्लायफोसेटला परवान्यातूनच वगळण्याचा...नागपूर ः चहा वगळता इतर पिकांसाठी ग्लायफोसेट...
कोल्हापूर जिल्ह्यात अतिपावसाने पिके...कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या...