‘विषबाधा घटनेमागील खरी कारणे, दोषी शोधा’

मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पाहता कीडनाशकांचा असुरक्षित वापर एवढेच कारण पुरेसे वाटत नाही. उत्पादनात कोणता जहाल घटकही मिसळलेला असू शकतो. नमुन्यांचे तातडीने परीक्षण होऊन त्यांची गुणवत्ता तपासायला हवी. - डॉ. बी. बी. भोसले, कीटकशास्त्रज्ञ व लातूर येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य
‘विषबाधा घटनेमागील खरी कारणे, दोषी शोधा’
‘विषबाधा घटनेमागील खरी कारणे, दोषी शोधा’

पुणे : कीटकनाशक विषबाधेच्या यवतमाळ जिल्ह्यातील घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. प्रतिकूल हवामान, कापूस पिकाची वाढलेली उंची आणि शेतकरी-मजुरांकडून कीडनाशकांचा झालेला असुरक्षित वापर, हीच कारणे या घटनेला कारणीभूत असल्याचे चित्र शासनाकडून आणि काही प्रसारमाध्यमांकडून समोर आणले जात आहे. तथापि या घटनेमागील खरी कारणे व नेमके सत्य अभ्यासून या घटनेला नेमके जबाबदार कोण, हे शोधण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

कीडनाशकांची गुणवत्ता, लेबल क्लेम, फॉर्म्युलेशन, विक्री आणि त्याचबरोबर बीटी बियाण्यांचीही गुणवत्ता आदी विविध बाबींवर प्रकाश पाडून दोषी व्यक्तींवर कारवाई होण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

बोंडअळ्यांच्या नियंत्रणासाठी उपाय म्हणून बीटी तंत्रज्ञानावर आधारित कापूस बियाणे बाजारात आले. त्यामुळे बोंडअळ्यांची संख्या आटोक्यातदेखील आली. मात्र आजची स्थिती लक्षात घेतली, तर बीजी वन पाठोपाठ बीजी टू वाणालाही गुलाबी बोंडअळी दाद देत नसल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. एकीकडे प्रतिकूल हवामान व दुसरीकडे महागड्या बीटी वाणांवर रसशोषक किडींबरोबर अळीचा प्रकोप यामुळे कापूस उत्पादक प्रचंड हवालदिल झाला आहे. साहजिकच फवारण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरीही या परिस्थितीला अपवाद ठरलेले नाहीत. कपाशीवर फवारणी करताना कीडनाशक विषबाधेच्या घटनेत येथे १८ जणांना जीव गमवावा लागला. पाचशेहून अधिक शेतकरी दवाखान्यात उपचार घेत आहेत. हा आकडाच घटनेचे गांभीर्य स्पष्ट करण्यास पुरेसा आहे. प्रतिकूल, दमट हवामान, पावसाचा खंड या कारणांबरोबरच सघन लागवड, कपाशी पिकाची वाढलेली उंची, कीडनाशकांचा असुरक्षित वापर आदी कारणांमुळेच विषबाधेचा प्रकार घडल्याचे समर्थन शासनाकडून केले जात आहे. यातून अप्रत्यक्षरीत्या शेतकऱ्यांच्या अज्ञानावरच खापर फोडले जात आहे.

तातडीने तपास करणे गरजेचे राज्यात द्राक्ष, डाळिंब, भाजीपालासह अन्य पिकांतही कीडनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. यवतमाळ जिल्ह्यातही कीडनाशकांचा वापर काही नवा नाही. येथील शेतकऱ्यांनी मोनोक्रोटोफॉस, प्रोफेनोफॉस व सायपरमेथ्रीन हे संयुक्त बुरशीनाशक, डायफेन्थुॅरॉन, इमिडाक्लोप्रिड अधिक फिप्रोनील (संयुक्त कीटकनाशक) आदी कीटकनाशकांचा वापर केल्याचे सांगितले जात आहे.

मात्र ज्या कंपन्यांची कीटकनाशके वापरण्यात आली त्यांची गुणवत्ता, त्यांचे लेबल क्लेम, सक्रिय घटकाचे प्रमाण लेबलवर दिल्यानुसार आहे की त्याहून अधिक आहे, संबंधित उत्पादनात काही धोकादायक वा घातक रसायनांची भेसळ झाली आहे का, याचाही आता तातडीने तपास करणे गरजेचे झाले असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लेबल क्लेम नसलेल्या उत्पादनांची विक्री होते कशी? डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्र विभागातील मुख्य पीक संरक्षण अधिकारी डॉ. अनिल कोल्हे यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा मागोवा घेतला. ते म्हणाले की येथील कीटकनाशक विषबाधा होण्याची अनेक कारणे आहेत. शेतकऱ्यांनी वापरलेल्या काही कीटकनाशकांमध्ये फिप्रोनील अधिक इमिडाक्लोप्रीड या संयुक्त कीटकनाशकांचे नावही पुढे आले आहे.

वास्तविक त्याचे कपाशीवर लेबल क्लेम नाही. ते दाणेदार स्वरूपातील असून, केवळ उसासाठीच त्याची शिफारस आहे. मग हे कीटकनाशक या भागात विकले कसे जाते, हा अभ्यासाचा विषय आहे. काही वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध कंपनीच्या प्रसिद्ध उत्पादनातील सक्रिय घटकाचे प्रमाणदेखील लेबलवर सांगितलेल्यापेक्षा अधिक आढळल्याची घटना गाजली होती. इथेही या दृष्टिकोनातून पाहाता येईल.

कीटकनाशकांचे पृथ्थकरण गरजेचे कीटकशास्त्रज्ञ व लातूर येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. भोसले म्हणाले, की संयुक्त कीटकनाशक वापरल्याने असे घडले आहे की त्यामागे अन्य कारणे दडली आहेत, हे शास्त्रीयदृष्ट्या तपासायला हवे. उत्पादनाच्या लेबलवर मूळ घटकांचे जे प्रमाण दर्शवले आहे तेच प्रत्यक्षात त्यात आहे का, याचे पृथ्थकरण व्हायला हवे.

मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पाहता कीडनाशकांचा असुरक्षित वापर एवढेच कारण पुरेसे वाटत नाही. उत्पादनात कोणता जहाल घटकही मिसळलेला असू शकतो. नमुन्यांचे तातडीने परीक्षण होऊन त्यांची गुणवत्ता तपासायला हवी. अखंड काही तास फवारणी करीत राहिल्यानेही विषबाधेच्या तीव्रतेत वाढ होते.

संयुक्त कीडनाशकामुळे विषारीपणा वाढला असावा कृषी रसायन उद्योगातील ईआयडी पॅरी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी विजय कोष्टी यांनी सांगितले, की यवतमाळ भागातील शेतकऱ्यांनी वापरलेल्या कीटनाशकांमध्ये फिप्रोनील अधिक इमिडाक्लोप्रिड या संयुक्त कीटकनाशकांचा वापर झाल्याचे आम्हाला समजले आहे. वास्तविक हे दोन्ही घटक रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी वापरले जातात.

गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी त्याचा वापर झाला असेल तर तो कोणी व का सुचवला, त्याच्या विक्रीवर नियंत्रण नाही का, या कीटकनाशकाला कपाशीत लेबल क्लेम नाही, मग त्याची विक्री होते कशी, याला जबाबदार कोण, असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. मुख्य म्हणजे हे कीटकनाशक नव्यानेच बाजारपेठेत आले आहे. या दोन्ही घटकांच्या एकत्रीकरणाची खरोखरच गरज होती का, त्यामुळेही उत्पादनाच्या विषारीपणाची तीव्रता वाढली अाहे का, हे अभ्यासणे गरजेचे झाले आहे.

सर्व शक्यता तपासून पाहाव्यात पीक संरक्षण विषयातील ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. सी. डी. मायी म्हणाले, की अपुऱ्या मजूरबळामुळे अनेकवेळा शेतकरी एकापेक्षा अनेक रसायने मिसळून फवारतात. प्रसंगी काहीवेळा त्यात खतांचाही समावेश असतो. संरक्षक वस्त्रेही वापरत नाहीत. अशामुळे विषारीपणाची तीव्रता वाढते. सध्या बाजारपेठेत अनेक बोगस कंपन्यांचेही लोण आहे. परराज्यांचा माल आणून इकडे विकला जातो. अलीकडे तर बोगस बीटी बियाणेसुद्धा मोठ्या प्रमाणात फोफावले आहे. या संदर्भात सरकारकडे मी अहवालदेखील सादर केला आहे. कीडनाशक विषबाधेची प्रमुख कारणे

  • बीटी कपाशी आल्यापासून दोन अोळींतील व दोन झाडांतील अंतर कमी झाले आहे. परिणामी अंतर दाट झाले आहे. फवारणीही एकाच दिशेने होते.
  • कपाशीची उंची पाच फुटांच्या वर गेल्याने फवारणीचा लोट दाट पसरून ते फवारणी करणाऱ्यांच्या शरीराच्या संपर्कात आले. वेळेवर उपचारही झाले नाहीत. त्यामुळे विषबाधेच्या तीव्रतेत वाढ झाली.
  • किडींचा प्रादुर्भाव जास्त असल्याने फवारण्या सतत घ्याव्या लागत होत्या.
  • प्रखर तापमानात किंवा उष्णतेत सातत्याने फवारणी
  • अनेक रसायने एकमेकांत मिसळून मारली जातात. संयुक्त कीटकनाशक उत्पादनात पुन्हा एखादे रसायन मिसळून फवारल्यास नेमकी काय क्रिया घडत असावी हे कळायला मार्ग नाही.
  • फवारणीदरम्यान संरक्षक वस्त्रे, हातमोजे, बूट, चेहऱ्याला मास्क आदींचा वापर न केल्यानेही विषबाधाची तीव्रता वाढली.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com