उपचारांच्या पातळीवरही अनास्था अन्‌ अंधार

उपचारांच्या पातळीवरही अनास्था अन्‌ अंधार

यवतमाळ ः विषबाधेमुळे जिल्ह्यात १९ जणांचे बळी गेल्यानंतर शासकीय रुग्णालयांमधील अव्यवस्थेचा मुद्दादेखील ऐरणीवर आला. कृषी विभागाचे सचिव बिजयकुमार यांनीदेखील कृषी विभागासोबतच इतर विभागांच्या जबाबदारीचेदेखील मूल्यांकन होण्याची गरज मांडली होती. त्यानुसार शासकीय रुग्णालयांचा अभ्यास केला असता, प्राथमिक उपचाराअभावीच हे मृत्यू झाल्याचे तथ्य समोर आले आहे. कळंब तालुक्‍यातील मडावी या शेतकऱ्याला डोळ्यांत जळजळ होत असल्याच्या कारणावरून सोमवारी (ता. १८ सप्टेंबर) जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. त्या वेळी तेथे ताथूरमातूर उपचार करण्यात आले. डोळ्यांत जळजळ होते म्हणून डोळ्यांत ड्रॉप टाकण्यात आला आणि रुग्णाला परत पाठविण्यात आले. त्यानंतर मंगळवारी त्यांची दृष्टी गेली. बुधवारी (ता. २०) घरीच ठेवून त्रास वाढल्याने गुरुवारी (ता. २१) त्यांना यवतमाळला नेण्यात आले. उपचार सुरू असताना शनिवारी (ता. २२) त्यांचा मृत्यू झाला. विषबाधेमुळे न्यूमोनिया, रक्‍तदाब कमी होणे आणि त्यानंतर हृदयकाम बंद करणे अशा परिस्थिती उद्‌भवतात, असे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले. यामुळेच मुख्यत्वे विषबाधित रुग्णांचा मृत्यू होतो. ॲन्ट्रोपिन आणि पाम या दोन घटकांचा वापर बाधित रुग्णांवर होतो. सर्पदंश व इतर विषबाधा झालेल्या रुग्णांवर उपचाराच्या पद्धती वेगळ्या आहेत. 

व्हिसेरावरून कळते नेमके कारण  अपघात व इतर कारणांमुळे अनैसर्गिक मृत्यू झालेल्या व्यक्‍तीच्या मृतदेहातून विविध अवयव काढले जातात. लिव्हरचाही त्यामध्ये समावेश असतो. त्याचे न्यायवैद्यक प्रयोगशाळा (फॉरेन्सिक लॅब)मध्ये पृथ्थकरण करून मृत्यूच्या नेमक्‍या कारणांचा शोध घेतला जातो. विदर्भात अमरावती व नागपूर येथे प्रयोगशाळा आहेत. त्यामुळे व्हिसेरा अहवाल मिळण्यास सहा महिने ते एक वर्षाचा कालावधी लागतो. व्हिसेरा काढल्यानंतर दोन ते तीन वषे तो टिकतो, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.  २२ रुग्णालये डॉक्‍टरविना जिल्ह्यात विषबाधेमुळे रुग्ण असताना २२ रुग्णालयांत डॉक्‍टरच नसल्याचे वास्तव समोर आले आहे. त्यासोबतच लोनबेहेळ येथील डॉक्‍टर चक्‍क १३८ किलोमीटर अंतरावरून ये-जा करतात. सुरवातीला या रुग्णालयांमध्ये विषावरील ॲन्टिडोसेसच उपलब्ध नव्हते. प्रकरणाची व्यापकता वाढल्यानंतर त्याचा पुरवठा करण्यात आला. प्रयोगशाळा मर्यादित असल्याने अहवाल येण्यास विलंब शवविच्छेदन (पोस्टमोर्टेम) करण्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्‍तीचा नियमानुसार व्हिसेरा काढला जातोच. त्यात हयगय होतच नाही. त्यामुळे साहजिकच विषबाधा प्रकरणातील मृतकांचादेखील व्हिसेरा घेण्यात आला असेल किंवा घेतला आहे. रुग्णालयाच्या न्यायवैद्यक शाखेकडे याची जबाबदारी राहते. प्रयोगशाळा मर्यादित असल्याने अहवाल येण्यास विलंब होतो. आम्ही योग्यप्रकारे उपचार केले; परिणामी आमच्याकडे दाखल ४१७ पैकी केवळ ११ रुग्ण दगावले. त्याची कारणे वेगवेगळी आहेत. विषबाधेवर जगभरात ॲन्ट्रोपिन व पाम हेच जगभरात ॲन्टिडोसेस म्हणून वापरतात. ही औषधी यवतमाळ जिल्ह्यात सर्वदूर उपलब्ध आहे, असे यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com