यवतमाळ विषबाधा प्रकरण ः बैठकांचा फार्स

फवारणीसाठीच्या कामात मजुरी जास्त मिळत असल्यानेच सुरक्षात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करून जिवाशी खेळले जात असल्याचा प्राथमिक निष्कर्ष चौकशी करणाऱ्या विभागीय समितीने नोंदविला आहे.
यवतमाळ विषबाधा प्रकरण ः बैठकांचा फार्स
यवतमाळ विषबाधा प्रकरण ः बैठकांचा फार्स

यवतमाळ ः विषबाधेमुळे ११ जणांचे मृत्यू आणि ५६० बाधित झाल्यानंतर जागे झाल्याचा आव आणत प्रशासनाने आता बैठकांवर बैठका घेत शेतकरी, शेतमजुरांच्या हिताकरिता फार गंभीर असल्याचे भासविण्यावर भर दिला आहे. शुक्रवारी (ता. २९) येथील बळिराजा चेतना भवनमध्येदेखील अशीच बैठक झाली.

कपाशीवरील किडीच्या नियंत्रणादरम्यान विषबाधा झाल्याने जिल्ह्यात ११ जणांचा मृत्यू, तर ५६० पेक्षा अधिक बाधित आहेत. मे महिन्यापासून हा प्रकार घडत असताना कोणालाच त्याची दखल घ्यावीशी वाटली नाही. परंतु त्यानंतर तीव्रता वाढल्याने प्रशासनाने आता या प्रकरणी गंभीर असल्याचे भासविण्यासाठी बैठकांचे सत्र चालविले आहे.

शुक्रवारी (ता. २९) (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कोळपने, कृषी विद्यापीठाचे डॉ. सी. यू. पाटील, केव्हीकेचे डॉ. नेमाडे यांच्या उपस्थितीत बळिराजा चेतना भवनमध्ये बैठक झाली. जिल्ह्यातील सर्व कृषी अधिकारी, कृषी सहायक या बैठकीला होते. कीडनाशक फवारणी संदर्भाने उपाययोजनांवर चर्चेकरिता असलेल्या या बैठकीत जलयुक्‍त शिवार आणि रब्बी हंगाम नियोजनाचेही विषय चर्चिले गेले.

कृषी सहायक जाणार पहाटेच शेतात फवारणीकामी शेतकरी, शेतमजूर पहाटेच घराबाहेर पडतात. त्याचवेळी गावात कृषी सहायकाने जात त्यांना गाठावे आणि त्यांना फवारणी करताना घ्यावयाच्या सुरक्षेसंदर्भाने माहिती द्यावी, असे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे यांनी सांगितले. मात्र, याची अंमलबजावणी मे महिन्यापासूनच होणे अपेक्षित होते. परंतु आता ११ जणांचे बळी गेल्यानंतर उपाययोजना करून काय साधले जाणार, असा प्रश्‍न या पार्श्‍वभूमीवर उपस्थित केला जात आहे.

जास्त मजुरीसाठी सुरक्षेकडे दुर्लक्ष फवारणीसाठीच्या कामात मजुरी जास्त मिळत असल्यानेच सुरक्षात्मक उपाययोजनांकडे दुर्लक्ष करून जिवाशी खेळले जात असल्याचा प्राथमिक निष्कर्ष या संदर्भाने चौकशी करणाऱ्या विभागीय समितीने नोंदविला आहे. विषबाधाप्रकरणी तज्ज्ञांच्या पथकाने गुरुवारी (ता. २८) रुग्णालयात बाधितांची विचारपूस केली. त्यानंतर कळंब येथे कपाशी पिकाच्या अवस्थेचीही पाहणी केली.

कपाशीवरील कीडरोगाच्या निवारणासाठी सध्या जिल्ह्यात कीडनाशकांची फवारणी केली जात आहे. याकरिता जिल्ह्यात ठराविक मजुरांच्या टोळ्या असून, त्यांच्याकडूनच हे काम शेतकरी करून घेतात. शेतीच्या इतर कामांच्या तुलनेत याकरिता अधिक पैसे मोजले जातात. त्यामुळे मजूरदेखील इतर कामे सोडून दररोज हेच काम करण्याला प्राध्यान्य देत असल्याचे वास्तव समोर आले आहे.

राज्याचे गुणवत्ता संचालक अशोक लोखंडे, अमरावती विभागीय गुणवत्ता निरीक्षक डॉ. पंकज चेडे, आत्माचे प्रकल्प संचालक दत्ता काळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठअंतर्गत यवतमाळ प्रादेशिक संशोधन केंद्राचे डॉ. सी. यू. पाटील, कृषी विद्यापीठाचे कीटकशास्त्रज्ञ डॉ. धनराज उंदीरवाडे, डॉ. कोल्हे, कृषी उपसंचालक पाटील, केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे तज्ज्ञ यांच्या पथकाने गुरुवारी (ता. २८) रुग्णालयात बाधितांची विचारपूस केली. त्यानंतर कळंब येथे कपाशी पिकाच्या अवस्थेची पाहणी केली. मुख्यमंत्री तसेच कृषी आयुक्‍तांना या संदर्भातील अहवाल पाठविला जाणार आहे.

आमळी (ता. घाटंजी) येथील विषबाधेने मृत्यू झालेल्या शेतमजुराच्या घरी जात तेथेदेखील समितीकडून घटनाक्रम जाणून घेण्यात आला. आमळी येथील हा शेतजमजूर सोमवारी (ता. १८) फवारणी करून सायंकाळी परतल्यावर त्याला उलट्या झाल्या. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. मंगळवारी (ता. १९) त्रास वाढल्याने त्याला घाटंजी रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी डोळ्यांत जळजळ होत असल्यामुळे डोळ्यांचा एक ड्रॉप देत डॉक्‍टरने घरी पाठविले.

बुधवारी घरीच थांबल्यानंतर गुरुवारी (ता. २१) जास्त त्रास्त जाणवू लागल्याने तो यवतमाळ जिल्हा रुग्णालयात दाखल झाला आणि उपचारादरम्यान शनिवारी (ता. २३) त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे या संदर्भातील आरोग्यविषयक तक्रारीकडे दुर्लक्ष होत असल्यानेदेखील अनेकांचा मृत्यू झाल्याची बाब समितीने अहवालात मांडली आहे.

दौरा पूर्ण करून समिती रात्री साडेअकरा वाजता यवतमाळला परतली. त्यानंतर अहवाल तयार करण्याचे कामही सुरू झाले. अडीच वाजेपर्यंत हे काम सुरू असताना वारंवार वीजपुरवठा खंडित होत होता.

समितीने नोंदविलेले निष्कर्ष

  • फवारणी कामासाठी मिळते ३५० रुपये मजुरी
  • कामावरील इतर मजुरांना केवळ १५० ते २०० रुपये
  • शेतमजुरांच्या माध्यमातूनच होते फवारणीचे काम
  • फवारणीकरिता मजुरांच्या टोळ्या
  • हंगामात करतात केवळ फवारणीचे काम
  • आदिवासी मजुरांचा या कामात सर्वाधिक समावेश
  • गावात सुरक्षात्मक उपाययोजना ऐकण्यासाठी मजूर बैठकीत येतच नाहीत
  • पहाटेच कामावर जात असल्याने प्रशासनाच्या जागृतीपर उपक्रमांना या मजुरांचा प्रतिसाद नाही
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com