बेदाण्याचे यंदा तीस टक्केच उत्पादन

बेदाण्याचे यंदा तीस टक्केच उत्पादन
बेदाण्याचे यंदा तीस टक्केच उत्पादन

सांगली : राज्यात दरवर्षी सुमारे २ लाख टन बेदाण्याचे उत्पादन होते. मात्र, अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान आणि तीन वर्षांपासून बेदाण्याला अपेक्षित दर नसल्याने शेतकऱ्यांनी द्राक्ष निर्यातीस प्राधान्य दिल्याने राज्यात यंदा बेदाण्याचे २५ ते ३० टक्केच उत्पादन होण्याचा अंदाज आहे.  राज्यातील सांगली, सोलापूर, नाशिक जिल्ह्यांत बेदाणा उत्पादन केले जाते. यंदा द्राक्ष हंगाम चांगला जाईल अशी आशा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना होती. मात्र, फळ छाटणीनंतर द्राक्ष बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अपेक्षित दराअभावी बेदाणा निर्मिती करण्याऐवजी द्राक्षाची विक्री करण्याचे शेतकऱ्यांनी ठरवले आहे. द्राक्षापासून बेदाणा तयार करण्यासाठी २५ टक्के खर्चात वाढ होते. अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी नुकसानीत जात असल्याने यंदा बेदाणा उत्पादनात २५ ते ३० टक्के घट होण्याचा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.  बेदाणा निर्मितीसाठी लागणारा वेळ आणि होणारा खर्च, मिळणारा दर यांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक ताळमेळ घालणे मुश्‍कील झाले आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी बेदाणाऐवजी ‘टेबल ग्रेप्स’ करण्याकडे वळले आहेत.  कर्नाटक राज्यात दरवर्षी ६० ते ७० हजार टन बेदाण्याचे उत्पादन होते, तोही बेदाणा तासगाव बाजार समितीत विक्रीला येतो. यंदा या राज्यातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांनी थेट द्राक्षाची विक्री केली असल्याचे तासगाव बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. यामुळे दरवर्षीच्या उत्पादनापेक्षा यंदा या राज्यात २० हजार टनाने उत्पादन घटेल असा अंदाज आहे.  बेदाण्याला तीन वर्षांपासून अपेक्षित दर नाहीत. त्यातच बेदाण्याला जीएसटी लावला आहे. शासन, व्यापारी आणि बाजार समितींच्या चुकीच्या धोरणामुळे दराला फटका बसला आहे. बेदाण्याला अधिक दर मिळावा, यासाठी शासन आणि बाजार समितीने ठोस पाऊले उचलावित अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.  फळ छाटणीच्यावेळी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा फटका बेदाणा उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे बेदाण्याचे उत्पादनात घट होण्याची शक्‍यता आहे. राज्यातील बेदाण्याचे उत्पादन किती होईल हे एप्रिल महिन्याच्या अखेर स्पष्ट होईल. - सुभाष आर्वे अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ गेल्या तीन वर्षांपासून बेदाण्याच्या दरात वाढ झाली नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी द्राक्षाची निर्यात करण्यासाठी पुढे आले आहेत. बेदाण्याचे दरवाढीसाठी शासन आणि बाजार समितीने ठोस धोरण राबविण्याची गरज आहे. तरच बेदाणा उत्पादकांना चांगले दिवस येतील. - एन. बी. म्हेत्रे,  बेदाणा तज्ज्ञ, तासगाव. बेदाण्याचे उत्पादनात घट झाली, तरी बेदाण्याच्या दरात वाढ होईल अशी आशा आहे. - श्री. पदमन, बेदाणा उत्पादक शेतकरी, वाळवा,  जि. सांगली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com