असुरक्षिततेवर मात केल्यास नेतृत्व विकास : मुख्यमंत्री

असुरक्षिततेवर मात केल्यास नेतृत्व विकास : मुख्यमंत्री
असुरक्षिततेवर मात केल्यास नेतृत्व विकास : मुख्यमंत्री

मुंबई : स्वत:मधील असुरक्षिततेवर मात करून आपल्याला कुठल्या दिशेने जायचंय हे ठरवून पुढे गेलं तरंच खरंखुरं नेतृत्व तयार होत असल्याची गुरूकिल्ली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (ता. ५) येथे यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क (यिन) नेतृत्व विकास परिषदेत तरुणांशी संवाद साधताना दिली. तुमच्या सकारात्मक कृतीतून एका तरी व्यक्‍तीच्या आयुष्यात परिवर्तन करता आले तर तुम्ही खरे देशभक्‍त आहात आणि तेच खरे नेतृत्व असल्याचे सांगत फडणवीस यांनी तरुणांच्या कानात सामाजिक बांधिलकीच्या नेतृत्वाचे वारे फुंकले.

समाजाला आज राजकारणाशिवाय सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक नेतृत्वाची नितांत गरज असून त्याची कमतरता भासत असल्याची चिंता फडणवीस यांनी या वेळी व्यक्‍त करत या पार्श्‍वभूमीवर "यिन' सारखे व्यासपीठ नेतृत्व घडविण्याची महत्त्वाची सामाजिक बांधिलकी पार पाडत असल्याचे गौरवोद्‌गारही काढले.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात मुख्यमंत्री फडणवीस यांनी यिनच्या परिषदेचे उद्‌घाटन केले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर "सकाळ' माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक व "एपी ग्लोबाले'चे चेअरमन अभिजित पवार उपस्थित होते, त्यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. अभिजित पवार यांनी, कृतीतून व्यक्‍त होण्यासाठी तरुणांना "यिन'चे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. राज्यातील चार हजार महाविद्यालयांतून निवडणुकीच्या माध्यमातून निवडून आलेल्या 900 युवा प्रतिनिधींच्या तीन दिवसांच्या परिषदेला आजपासून सुरवात झाली. परिषदेच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या प्रशासनावर मुख्यमंत्री म्हणून अनोखी छाप उमटविणाऱ्या फडणवीस यांनीच नेतृत्व कसे घडवावे याचा मंत्र तरुणांना देत तरुणांच्या प्रश्‍नांना मनमोकळेपणाने उत्तरंही दिली.

मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरवातीलाच, माध्यम समूह कायम वाचकांना बांधून ठेवण्याच्या हेतूने विविध व्यासपीठं तयार करत असतात. सामाजिक बांधिलकी मानणाऱ्या "सकाळ' माध्यम समूहाने मात्र महिला, युवक आणि शेतकऱ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत सकारात्मक पाऊल उचलल्याचे कौतुकाने नमूद केले.

तंत्रज्ञानाचा फायदा समाजाला पुढे नेण्यासाठी करा श्री. फडणवीस युवकांना उद्देशून म्हणाले, की तंत्रज्ञानाशी मैत्री असणारी तुमची जनरेशन आहे. तंत्रज्ञान समाजातील सर्व प्रकारचे भेदाभेद कमी करत प्रयत्नांच्या नवनवीन कसोट्यांवर पुढे पुढे जात असते. याच तंत्रज्ञानाचा फायदा देशाला, समाजाला पुढे नेण्यासाठी करा. नेतृत्व विकास करताना कायम समाज बांधणी करण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक प्रेरणा देणारीच व्यक्‍ती नेतृत्व करू शकते. समाजातील सर्वांत वंचित आणि डावलल्या गेलेल्या वर्गाला सोबत घेऊन रामाने दैत्यांशी आणि शिवाजी महाराजांनी मोगलांना कसे चितपट केले हे आठवा. केवळ शब्दांतून नव्हे तर कृती करून नेतृत्व घडविण्याचा सल्ला त्यांनी दिला. मोठमोठी भाषणं देण्यापेक्षा कृती करा, चांगल्या विचारांची वाट चोखाळा. तुमच्या कृतीतून एका तरी व्यक्‍तीच्या आयुष्यात परिवर्तन करता आले तर तुम्ही खरे देशभक्‍त आहात आणि तेच खरे नेतृत्व असल्याचे सांगत श्री. फडणवीस यांनी तरुणांच्या सामाजिक बांधिलकीच्या नेतृत्वाचे वारे फुंकले.  

ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या नेतृत्वाखाली लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू करण्यात येणार आहे. डॉ. माशेलकर दर १५ दिवसांनी स्वतः संवाद साधतील. त्याचबरोबर राज्यातील पाच विद्यार्थ्यांना डॉ. माशेलकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक वर्ष काम करण्याची संधी मिळेल, हा प्रोग्राम म्हणजे नेतृत्व विकासाच्या मार्गावर टाकलेले पहिले पाऊल आहे. - अभिजित पवार , व्यवस्थापकीय संचालक, सकाळ माध्यम समूह, चेअरमन, एपी ग्लोबाले

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com