तरुणांनो, शेतीकडे वळा...

तरुणांनो, शेतीकडे वळा...
तरुणांनो, शेतीकडे वळा...

मुंबई : शेतीतील राजकारण आणि शेतीमालाला हमीभावासारख्या प्रश्‍नांच्या पलीकडे जाऊन कृषी क्षेत्रात असलेली आव्हाने अन्‌ संधींचा एक व्यापक पट ‘यिन’च्या प्रतिनिधींसमोर ‘ॲग्रोवन’चे संपादक आदिनाथ चव्हाण यांनी प्रयोगशील शेतकरी अंकुश पडवळे आणि ‘लाइफ सायन्सेस सातारा मेगा फूड पार्क’चे उपाध्यक्ष विजयकुमार चोले यांच्याशी रंगलेल्या गप्पांतून मांडला. तोट्यातली शेती, कृषीमाल आयात करताना येणाऱ्या अडचणी, दुष्काळी भागातली शेती अन्‌ सेंद्रिय शेतीचा ब्रँड आणि अन्नपदार्थ प्रक्रिया उद्योगातल्या संधींची कवाडे यानिमित्ताने त्यांनी उलगडून दाखवली. शेतीमध्ये संधी आहे आणि शेतीला प्रतिष्ठा व ग्लॅमर मिळवून देण्यासाठी खेड्याकडे वळावे, असा संदेश त्यांनी नकळतच तरुणांना दिला.

सेंद्रिय शेतीचे महत्त्व जाणून घ्या सोलापूरचे प्रयोगशील शेतकरी अंकुश पडवळे म्हणाले, की सेंद्रिय आणि विषमुक्‍त शेतीचा राज्याचा एकच ब्रँड करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. ब्रॅंडिंग, पॅकिंग आणि बार कोडिंग असलेली ही उत्पादने परदेशात निर्यात करण्याबरोबरच आपल्या देशातल्या नागरिकांनाही विषमुक्‍त अन्न मिळण्याचा हक्‍क आहे. येत्या काही वर्षांत आपल्याला तो टप्पा गाठता येईल.

शेतीला आणि शेतकऱ्यांना समाजात प्रतिष्ठा नाही ही बाब खरीच आहे. ग्रामीण भागातील महाविद्यालयांतील एका पाहणीत तरुणांनी ‘शेती नको’ असे म्हटले होते. स्वत: शेतकरीही शिकलेल्या मुलीला शेतकरी नवरा करत नाही इतकी अनास्था शेतीबाबत आहे; पण ही परिस्थिती बदलण्यासाठी तरुणांनी शेतीकडे वळले पाहिजे. एक-दोन एकरात उत्तम शेती करता येते. समूह शेतीच्या माध्यमातून नवनवीन प्रयोग करता येतात आणि त्याला यशही मिळते, हे आम्ही दुष्काळी भागात पिकवलेल्या शेतीतून दाखवून दिले आहे. तंत्रज्ञान, विज्ञानाशी कास धरत सेंद्रिय, विषमुक्‍त अशी शाश्‍वत शेती करता येईल. दहा वर्षे डाळिंबाच्या उत्पादनात असलेल्यांची डाळिंबेही या वर्षी युरोपियन युनियनच्या निकषांमध्ये न बसल्याने नाकारण्यात आली; मात्र आम्ही सातत्याने त्यांच्या निकषांप्रमाणे उत्पादनात बदल करत राहिलो. त्यामुळे आमची ३० पैकी केवळ तीनच सॅम्पल नाकारली गेली. काळाच्या बरोबर राहत मागणी तसा पुरवठा करण्याबरोबरच डाळिंबांसाठी वापरण्यात येणाऱ्या खतांमध्ये आवश्‍यकतेप्रमाणे बदल करत राहिल्यानेच हे शक्‍य झाले. परदेशात निर्यात करताना इतकी काटेकोर काळजी घेतली जाते; परंतु आपल्याच देशात याच डाळिंबांची विक्री करताना कोणते निकष पाळले जातात? युरोपियन युनियनने नाकारलेली डाळिंबे आपल्याच बाजारपेठेत विकली जातात. याचा अर्थ विष म्हणून त्यांनी नाकारलेली फळे आपलीच माणसे विकत घेऊन खातात. याच विचारातून यापुढे सेंद्रिय आणि विषमुक्‍त शेतीबरोबरच समाजात शेतीला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी चळवळ उभी राहावी म्हणून काम सुरू केले अाहे. गेली २५ वर्षे सेंद्रिय शेतीमध्ये असणाऱ्यांची शेती यशस्वी का झाली नाही, याचा अभ्यास सुरू केला. त्यांनी बाजारात मागणी असणारी शेती करण्याबरोबरच तिचे मार्केटिंग करण्यावरही भर दिला पाहिजे होता. बाजारात वेळोवेळी होणारे बदल स्वीकारायला हवे होते; परंतु तसे झाले नाही. बाजारातल्या भाज्यांच्या शेजारीच सेंद्रिय भाज्या विकल्या गेल्या. प्रॉडक्‍टचा ब्रँड तयार केला आणि त्याचे पॅकेजिंग केले, तर त्यामध्ये भेसळ होत नाही. प्रॉडक्‍टवरचा ग्राहकांचा विश्‍वास वाढतो. सेंद्रिय शेतीतून पैसा तर मिळतोच; पण विषारी अन्नाची निर्मिती होत नाही. भविष्यात विषमुक्‍त अन्नाला मोठी मागणी येणार असल्याने सेंद्रिय आणि विषमुक्‍त शेतीकडे वळावे, असे आवाहन पडवळ यांनी तरुणांना केले.

अन्नपदार्थ प्रक्रिया उद्योग लाखमोलाचा लाइफ सायन्सेस सातारा मेगा फूडपार्कचे उपाध्यक्ष विजयकुमार चोले म्हणाले, की अन्नपदार्थ प्रक्रिया उद्योगात भविष्यात मोठी संधी असून, सॉफ्टवेअरच्या खालोखाल त्याची वाढ होत आहे. देशात ४२ फूडपार्क तयार केले जात आहे. प्रत्येक फूडपार्कच्या पायाभूत सुविधांसाठी शंभर ते सव्वाशे कोटी रुपये केंद्र सरकार खर्च करत आहे. भविष्यात दीड लाख कोटींपेक्षा अधिक उलाढाल या उद्योगात होणार आहे. लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलत असल्याने शेतीबरोबर अन्नप्रक्रिया उद्योगही महत्त्वाची बजावणार आहे. तरुणांनी खेड्याकडे जाऊन अन्नप्रक्रिया उद्योगाकडे वळले पाहिजे. अनेक मोठमोठ्या कंपन्या अन्नप्रक्रिया उद्योगात आहेत. तमिळनाडूमध्ये कोको आणि केरळमध्ये व्हॅनिला समूह पद्धतीतून किंवा काँट्रॅक्‍ट पद्धतीने तयार केला जातो. अन्नप्रक्रिया उद्योगासाठी सरकारच्या अनेक सवलती असतात; पण लोकांपर्यंत त्या पोचतच नाहीत. टाटा, जिंदाल आदींसारखे समूह हार्वेस्ट मॅनेजमेंटसाठी अनुदान देतात. त्याचा लाभ घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com