आंबा गावातील युवक करतायेत देवराईचे संवर्धन

आंबा गावातील युवक करतायेत देवराईचे संवर्धन
आंबा गावातील युवक करतायेत देवराईचे संवर्धन

आंबा, जि. कोल्हापूर : सह्याद्री डोंगररांगातील गावात परंपरा आणि श्रद्धेने देवराई जपल्या आहेत. या देवराईंत वृक्ष, औषधी, सुगंधी वनस्पती, पशू-पक्षी, फुलपाखरांच्या जैविविधतेचे भांडार असते. गावांतील देवराईतील जैविविधतेचे संवर्धन होण्यासाठी विविध उपक्रम स्थानिक पर्यावरणप्रेमींकडून राबविले जातात, असाच एक प्रयत्न आंबा गावातील तरुणांनी हाती घेतला आहे. आंबा (ता. शाहूवाडी) गावातील देवराई संवर्धनाबाबत माहिती देताना उत्साही युवक प्रमोद माळी म्हणाला, ‘‘जोरदार पावसाच्या काळात आंबा घाट, विशाळगड, आमिनी घाटात दरडी कोसळतात, या वेळी काही झाडेदेखील पडतात. ही कोसळलेली झाडे आम्ही गावातील मुले उचलून त्यांचे देवराईमध्ये पुनर्रोपण करतो. गेल्या तीन वर्षांपासून आम्ही सत्तर मोठ्या झाडांचे पुनर्रोपण केले आहे. व्हॉटसॲप ग्रुपवरून वृक्ष लागवडीची माहिती दिली जात असल्याने परिसरातील मुले, नागरिक आमच्या मदतीला येतात.’’ देवराईमध्ये आम्ही ‘मंगल वन` उपक्रम राबवितो. मित्रमंडळी किंवा नातेवाइकांच्या लग्नामध्ये आहेर, भेटवस्तूंचा खर्च न करता त्याएेवजी लग्न मुहूर्ताच्या वेळी आम्ही देवराईत दुर्मिळ होत असलेल्या स्थानिक वृक्षांच्या रोपाची स्वखर्चातून लागवड करतो. गाव परिसर तसेच शहरातील ओळखीचे लोक आम्हाला लग्न किंवा वाढदिवसाच्या दिवशी देवराईत रोप लावण्यासाठी संपर्क आणि आर्थिक मदत करू लागले आहेत.  आंबा परिसरातील जंगलात अनेक पशू, पक्ष्यांचा अधिवास आहे. उन्हाळ्यात या परिसरातील पाणवठे आटतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या काळात जंगलातील पशू, पक्षी परिसरातील शेतीमध्ये येतात. हे लक्षात घेऊन पशू-पक्ष्यांना जंगलामध्येच पाण्याची पुरेशी उपलब्धता होण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून दरवर्षी २७ ते २९ एप्रिल दरम्यान ‘वन्यजीव पाणवठा निर्माण मोहीम` राबविली जाते. मोहिमेच्या कालावधीमध्ये जंगलातील झऱ्याजवळील पाणवठ्याची स्वच्छता केली जाते. दरवर्षी आम्ही पंधरा पाणवठे तयार करतो. पाणवठे करताना सिमेंटचा वापर न करता नैसर्गिक पद्धतीने दगड, मातीचा वापर केला जातो. झऱ्याचे पाणी जेथे सुरू होते तेथे पक्षी पाणवठे तयार केले जातात. या पाणवठ्यातून बाहेर पडणारे पाणी पुढे लोळणात जाते. याठिकाणी गवा, सांबर, डुक्कर चिखलात लोळतात. या उपक्रमामध्ये दरवर्षी राज्यभरातून चाळीस जण सहभागी होतात.  मलकापूर जवळील मुटकलवाडीमध्ये असणाऱ्या मुटकेश्वर देवालयाजवळ मोकळ्या जमिनीत गेल्या तीन वर्षांपासून लोकसहभागातून देवराई तयार होत आहे. गेल्या तीन वर्षांपासून येथे रोपांची लागवड करण्यात येत आहे. आंबा गावातील देवराई 

  • सुमारे दहा एकरांचा विस्तार. देवराईमध्ये अंबेश्वराचे देऊळ.
  • वृक्षांच्या ८७ प्रजाती. प्रामुख्याने हिरडा, बेहडा, आपटा, हुरा, धोमा, पांगारा, पिंपरण, सोनचाफा, भेरली माड.
  • सुमारे १६ प्रकारच्या पक्ष्यांचा अधिवास. धनेश, स्वर्गीय नर्तक, टिकेल्सचा निळा माशीमार, व्हिसलिंग थ्रश, भू कस्तुर, भारद्वाज, हरियाल.
  • साप, नाग, अजगर, जंगल कॅलोटस सरडा, गेळा (सर्वांत छोटे हरिण), बेडकांचा अधिवास.
  • फुलपाखरांच्या १५० जाती. ब्लू मॉरमन, सर्वांत छोटे फुलपाखरू ब्लू ग्रास ज्वेल, सर्वांत मोठे फुलपाखरू सदर्न बर्ड विंग, मोठा पतंग ॲटलास मॉथ पाहायला मिळतो.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com