कोल्हापुरातील जमिनीत लोह, जस्ताच्या प्रमाणात लक्षणीय घट

जमिनीचे घटक समजून न घेता अतिप्रमाणात रासायनिक खतांचा वापर, पीक फेरपालटीचा अभाव आणि जमिनीतील सेंद्रिय कर्बाची घटती पातळी यामुळे अनेक तालुक्‍यांमध्ये जमिनीची सुपीकता चिंतेचा विषय झाला आहे. जिल्ह्यात माती परीक्षणासाठी दहा प्रयोगशाळा आहेत. यामध्ये शासकीय एक व उर्वरित नऊ खासगी आहेत. आम्ही आरोग्यपत्रिकेच्याबरोबरीने जमीन सुपीकतावाढीसाठी उपाययोजना सांगत आहोत. याकडे शेतकऱ्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे. सेंद्रिय कर्ब वाढविणे, लोह, जस्ताचे प्रमाण वाढविण्याकडे शेतकऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. - म. वि. लाटकर, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी, कोल्हापूर.
जमीान आरोग्यपत्रिका
जमीान आरोग्यपत्रिका
कोल्हापूर: पीक फेरपालटीचा अभाव आणि एकाच क्षेत्रात वर्षभर सातत्याने पिके घेतल्याचा प्रतिकूल परिणाम जिल्ह्यातील शेतजमिनीवर होत आहे. जमिनीमध्ये लोह व जस्ताच्या प्रमाणात मोठी घट झाली आहे. परिणामी पीक उत्पादन घटू लागले आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास पीक उत्पादन घटीचा मोठा धोका शेतकऱ्यांच्या समोर आहे.
 
जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात भात आणि पूर्व भागात ऊस लागवड मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक तालुके डोंगराळ आहेत. डोंगराळ भागातील जमिनीत आंतरपिकांचा अभाव आणि पारंपरिक पद्धतीने तीच तीच पिके घेतल्याने जमिनीची सुपीकता मोठ्या प्रमाणात घटत आहे.
 
जमिनीच्या सुपीकतेमध्ये नत्र, स्फुरद, पालाश यांच्याबरोबर लोह, तांबे, मंगल, जस्त आदी घटकांचे प्रमाण महत्त्वाचे ठरते. बारा तालुक्‍यांच्या जमीन आरोग्याचा आढावा घेतल्यास नत्र, स्फुरद, पालाशचे प्रमाण चांगले आहे. जमिनीमध्ये नत्राचे प्रमाण २.१४ टक्के, स्फुरद १.४० टक्के, तर पालाश २.४० टक्के आहे.
 
जिल्ह्यातील एकूण कमतरतेचा विचार केल्यास तांबे ०.३६ टक्के, लोह २५ टक्के आणि जस्ताची तब्बल ३२ टक्के इतकी कमतरता आहे. जोराच्या पावसामुळे जमिनीतील जस्ताचा मोठ्या प्रमाणात निचरा झाल्याने कमतरता वाढली आहे.
 
सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेबरोबरीने जमिनीच्या सुपीकतेमध्ये महत्त्वाची बाब असलेल्या सेंद्रिय कर्बाची कमतरताही उत्पादनवाढीच्या आड येत आहे. गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, पन्हाळा, राधानगरी, गारगोटी आदी तालुक्‍यांतील जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण एक टक्क्‍यापर्यंत आहेत. बहुतांशी ऊस लागवड असलेल्या शिरोळ, हातकणंगले, करवीर, कागल आदी तालुक्‍यांत हे प्रमाण केवळ ०.६० ते ०.८० टक्के इतकेच आहे. सातत्याने रासायनिक खतांचा अतिवापर आणि दुसऱ्या बाजूला सेंद्रिय खत वापराचे घटलेले प्रमाण यामुळे सेंद्रिय कर्बाचे प्रमाण चिंताजनक झाले आहे.
कमतरतेचा परिणाम :-
लोह   ः शेंड्याकडील पानांच्या शिरामधील भाग पिवळा होतो, झाडाची वाढ खुंटणे, खोड बारीक होते.
जस्त   ः पाने लहान होऊन शिरामधील भाग पिवळा होतो. खोड, फांद्या किंवा पेरामधील खोडाची वाढ खुंटते, फळांच्या वाढीत अनियमितता.
तांबे  ः शेंड्याची वाढ खुंटते, खोडाची वाढ कमी होते, पाने लगेच गळतात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com