नगर जिल्ह्यात बंद, रास्ता रोको आंदोलन

मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन

नगर  ः मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनादरम्यान नदीत उडी घेतल्याने काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाला. या घटनेचे पडसाद मंगळवारी (ता.२४) नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी उमटले. जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. बहुतांश गावांत बंद पाळण्यात आला. रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतुकीवर परिणाम झाला होता. औरंगाबाद येथे आंदोलनाची तीव्रता अधिक असल्याने शेवगाव आणि कोपरगावमार्गे एसटी गाड्या वळवल्या गेल्या.  

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी पाच ते सहा दिवसांपासून आंदोलन सुरू असले तरी मंगळवारी नगर- औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या कायगाव टाका येथे आंदोलनादरम्यान नदीत उडी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मंगळवारी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये नगर जिल्ह्यामधील बहुतांश गावांनी सहभाग नोंदवला. मंगळवारी सकाळी दौंड-नगर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. श्रीगोंदा तालुक्‍यातील बहुतांश गावांत मंगळवारी बंद होता. पाथर्डी येथे रास्ता रोको आंदोलन झाले. संगमनेर तालुक्‍यातील वडगाव पान शिवारात एक एसटी बस जाळण्यात आली.

नेवासा, कुकाणा भागात सोमवारी रात्री रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मंगळवारी सोनई भागात कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. लोणी, जामखेड, राहुरी फॅक्‍टरी येथे रास्ता रोको तर पारनेरमध्ये ठिय्या अंदोलन झाले. कोपरगाव शहरासह तालुक्‍यात बंद पाळण्यात आला. बहुतांश भागात बंद, आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांना सुटी देण्यात आली. शेवगाव येथे काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून आंदोलन करण्यात आले. दरम्यान एका एसटीवर दगडफेक करण्यात आली. नगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज हुतात्मा स्मारकाजवळ काकासाहेब शिंदे यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर सकल मराठा समाजाची बैठक झाली. आज (बुधवारी) औरंगाबाद- नगर- पुणे महामार्गावर ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय नगर शहरातील सकल मराठा समाजाने घेतला आहे.

एसटी गाड्यांना दिली वाट   आषाढी वारी संपवून वारकरी घरी परतत आहेत. जिल्ह्यामधून पुणे, औरंगाबाद, नाशिक, धुळे, जळगाव भागातील वारकरी जात आहेत. आंदोलनाच्या काळात एसटी अडवू नका सांगण्यात आल्याने मंगळवारी जागोजागी झालेल्या रास्ता रोको आंदोलनादरम्यान वडगाव पान येथे रात्री घडलेली घटना वगळता एकही एसटी आडवली गेली नाही. एसटी आली की आंदोलनकर्ते वाट मोकळी करून देत होते. त्यामुळे तारकपूर आगारात सोमवारी काही प्रमाणात थांबवलेल्या गाड्या मंगळवारी सोडण्यात आल्या. आंदोलक अन्य गाड्या मात्र अडवत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com