नगर जिल्ह्यातील गावागावांत पोचली आंदोलनाची धग

मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन

नगर   ः मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पुकारलेल्या आंदोलनामुळे बुधवारी (ता. २५) सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यामधील बहुतांश गावांत बंद होता. आंदोलनाची धग प्रत्येक गावात पोचली. जिल्हाभरात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नगर शहरातून जाणारा औरंगाबाद-नगर- पुणे महामार्ग जवळपास आठ ठिकाणी रोखून धरल्याने औरंगाबाद, बीड, सोलापूरकडून येणारी-जाणारी वाहतूक बंद होती. खबरदारीचा उपाय म्हणून महामंडळाने एसटी गाड्या सोडल्या नाहीत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी पाच ते सहा दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. परळी (जि. बीड) येथून सुरू झालेले आंदोलन राज्यभर पोचले आहे. त्यातच सोमवारी (ता. २३) नगर - औरंगाबाद रस्त्यावर असलेल्या कायगाव टोका येथे आंदोलनादरम्यान काकासाहेब शिंदे यांचा मृत्यू झाला. त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंद पुकारण्यात आला. तिसगाव (ता. पाथर्डी), आश्‍वी (ता. संगमनेर), माहिजळगाव, कर्जत, श्रींगोदा, कोपरगाव, घोगरगाव, निमगाव खलू, निघोज (ता. पारनेर), कोपरगाव, राहुरी, देवळाली प्रवरा, जामखेड, कुळधरण, मढेवडगाव, माहिजळगाव, करंजी, राशीन, भाळवणी, आश्‍वी यांसह विविध ठिकाणी बंद पाळण्यात आला. आंदोलन सुरू असल्यामुळे जिल्हाभरात एसटी वाहतूक बंद होती. महामंडळानेही एसटी गाड्या सोडल्या नाहीत.

नगर शहरातून जाणारा औरंगाबाद-नगर- पुणे महामार्ग जवळपास आठ ठिकाणी रोखून धरल्याने औरंगाबाद, बीड, सोलापूरकडून येणारी-जाणारी वाहतूक बंद होती. एसटी गाड्या बंद असल्याने काही प्रवासी बस स्थानकात अडकून पडले. नगर-मनमाड रस्त्यावरील एका शोरूमवर कार्यकर्त्यांनी दगडफेक केली, तर कर्जतला वनविभागाचे वाहन जाळले. आरक्षणाबाबत सरकारने ठोस निर्णय घेतल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. बुधवारी जिल्ह्यामधील काही तालुक्‍यांत पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी बैठका झाल्या. बुधवारी आंदोलनाची जिल्ह्यामधील प्रत्येक गावांत धग दिसत होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com