पुणे जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम

मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदाेलनाची धग जिल्ह्यात गुरुवारी (ता. २६) देखील कायम हाेती. विविध ठिकाणी माेर्चे काढून बंद पाळण्यात आला हाेता. या वेळी सरकारच्या विराेधात आंदाेलनकर्त्यांनी निषेधाच्या घाेषणा दिल्या. रांजणगाव, वाल्हे, कडूस, नसरापूर, कवठे येमाई आदी ठिकाणी आंदाेलने झाली. लाेणावळा - मळवली  येथे आंदाेलनकांनी रास्ता राेकाेसह रेल्वे राेकाे आंदोलन केले. मावळ येथे महामार्ग राेखून धरण्यात आला हाेता.

रांजणगाव सांडसमध्ये कडकडीत बंद रांजणगाव सांडस, ता. शिरुर : येथे गुरुवारी मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या अांदोलनाला पाठिंबा म्हणून कडकडीत बंद पाळण्यात आला. शिवशक्ती ग्रुपच्यावतीने चौकात टायर पेटवून सरकारी धोरणाचा निषेध करण्यात आला. बुधवारी रात्री उशिरा काही कार्यकर्त्यांची बैठक घेऊन बंद चा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे गुरुवारी सकाळी सकल मराठा समाज, शिवशक्ती ग्रुप आदींच्या वतीने गावातील प्रमुख रस्त्यावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चेकऱ्यांनी गावातील छोट्या - मोठ्या व्यावसायिकांना आवाहन केल्यानंतर बँक व शाळेचा अपवाद वगळता संपूर्ण व्यवहार बंद करण्यात आले.

कडूसमध्ये सरकारचा निषेध कडूस, ता.खेड ः मराठा समाजास आरक्षण देण्यास सरकार टाळाटाळ करत असल्याचा निषेधार्थ कडूस येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. या वेळी सर्वपक्षीय नागरिकांनी मोर्चा काढून सरकारचा निषेध केला. सकाळी दहा वाजता एसटी स्टॅण्ड चौकातून मराठा क्रांती मोर्चाला सुरवात झाली. या आंदोलनात परिसरातील वाड्यावस्त्यांमधील नागरिक माेठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण बाजारपेठेतून घोषणा देत हा मोर्चा ग्रामपंचायत कार्यालयाच्या चौकात आला. या ठिकाणी निषेध सभा झाली.

नसरापूर बंद नसरापूर ः नसरापूर व परिसरातील अखिल मराठा समाजाच्या वतीने सरकारचा निषेध करीत आरक्षणाच्या मागणीसाठी बंदची हाक देण्यात आली. त्यास व्यापाऱ्यांनी उस्फूर्त प्रतिसाद देत दिवसभर बंद पाळला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी गुरुवारी बंद पाळण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वीच घेण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी दुकाने न उघडता उस्फूर्तपणे बंदमध्ये सहभाग घेतला. या वेळी सकाळी अकरा वाजता चेलाडी महामार्गापर्यंत मोर्चाचे अायोजन करण्यात आले होते. यामध्ये युवक, युवती व महिलादेखील मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या वेळी नायब तहसीलदारांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.

कवठे येमाईत पाठिंब्यासाठी सभा कवठे येमाई, ता. शिरूर ः येथील ग्रामस्थांनी सकल मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे निवेदन शिरूरचे पोलिस निरीक्षक कैलास घोडके यांना देण्यात आले. मराठा आरक्षण मागणीच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कवठे येमाई येथील ग्रामस्थांनी बाजारतळावर सभेचे आयोजन केले होते. या वेळी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. माजी पंचायत समिती सदस्य सुदाम इचके, सरपंच दीपक रत्नपारखी, माजी सरपंच बबनराव पोकळे, रामदास सांडभोर, बाळासाहेब डांगे, मिट्टूशेठ बाफना, बाळासाहेब इचके, बाजीराव उघडे, दत्तात्रेय सांडभोर यांनी मराठा आरक्षणाबाबत मार्गदर्शन केले.

मांडकी येथे रॅली वाल्हे, ता. पुरंदर ः येथे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाची मागणी, काकासाहेब शिंदे यांनी श्रद्धांजली व सरकारचा निषेध म्हणून गुरुवारी ‘मांडकी बंद’ची हाक देण्यात आली. त्यानुसार कडकडीत बंद पाळण्यात आला. येथील काही कार्यकर्त्यांनी बुधवारी रात्री बैठक घेऊन ‘बंद’चा निर्णय घेतला. व्यापाऱ्यांनी आंदोलनाला प्रतिसाद देत दुकाने बंद ठेवली. दवाखाने आणि औषधी दुकानांचा अपवाद वगळता गावातील बाजारपेठेत शुकशुकाट होता. गावात निषेध रॅली काढण्यात आली. रॅलीदरम्यान मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, शेतीला हमीभाव मिळालाच पाहिजे आदी मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या.   पुणे बाजार समितीतील व्यवहार सोमवारी बंद मराठा आरक्षण आंदाेलनाला पाठिंबा देण्यासाठी पुणे बाजार समितीमधील व्यवहार साेमवारी (ता. ३०) बंद ठेवण्याचा निर्णय अडते असाेसिएशनसह कामगार संघटनांनी घेतला आहे. साेमवारी फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, केळी व पान बाजार येथील व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती असाेसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ आणि कामगार संघटनेेचे अध्यक्ष अमाेल चव्हाण यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com