पुणे जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम

मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन

पुणे  ः मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या आंदाेलनाची धग जिल्ह्यात कायम हाेती. साेमवारी (ता. ३०) जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये सरकारच्या निषेधार्थ माेर्चे काढण्यात आले. तसेच, घाेषणाबाजी करण्यात आली. पिंपरी येथे देखील आंदोलकांनी वाहने पेटवली. हिंजवडी येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

खेड येथे बंद चास, ता. खेड ः येथे मराठा समाजाने पुकारलेल्या खेड तालुका बंदला तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सर्वच गावांनी पाठिंबा देत आपले दैनंदिन व्यवहार बंद ठेवले. गुंडाळवाडी येथे रस्त्यावर टायर पेटवल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. मात्र, सर्वत्र बंद शांततेत पार पडला. चाससह कान्हेवाडी, कडधे, बुरसेवाडी येथेही दैनंदिन व्यवहार बंद होते. वाडा येथे नागरिकांनी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून रस्त्यावर एकत्र येत बंदचे समर्थन केले.

पेठमध्ये सर्वपक्षीय बंद सातगाव पठार, ता. आंबेगाव ः येथे मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येत कोपरासभा घेतली. व्यापाऱ्यांनी बंदमध्ये सहभागी होऊन संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवली. कुरवंडी, कोल्हारवाडी, थुगाव, भावडी, कारेगाव, पेठ व पारगावतर्फे खेड परिसरातील सात गावांतील सकल मराठा समाजातील कार्यकर्ते यात सहभागी झाले.   इंदापूर तहसीलसमोरील आंदोलन स्थगित वडापुरी, ता. इंदापूर ः येथील प्रशासकीय भवनासमोर २५ जुलैपासून सुरू असलेले मराठा आरक्षणासाठीचे ठिय्या आंदोलन शनिवारी (ता. २८) रात्री उशिरा स्थगित करण्यात आले. इंदापूर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन स्थगित करत असल्याचे निवेदन श्रीकांत पाटील व पोलिस निरीक्षक मधुकर पवार यांना दिले. सरकारने मराठा समाजाला तातडीने १६ टक्के आरक्षण जाहीर करावे व राज्यात आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.     कबाडवाडी येथे रास्ता राेकाे कबाडवाडी, ता. जुन्नर ः राज्य शासनाने मराठा आरक्षणावर तातडीने तोडगा काढावा अन्यथा पुढील काळात आंदोलन उग्र स्वरूप धारण करेल, असा इशारा देत जुन्नर तालुक्यातील कबाडवाडी चौकात पाडळी गणातील सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सकाळी कबाडवाडीच्या मुख्य चौकात मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने एकत्र येत माणिकडोह, नाणेघाट तसेच आदिवासी भागांत जाणारी वाहने अडविली. कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडून शासनाचा निषेध केला.

आळंदी येथे कडकडीत बंद आळंदी, ता.खेड ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील मराठा आंदोलनाबाबत वेगवेगळी वक्तव्ये करून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. राणे पितापुत्रांची धडपड मराठा आरक्षणासाठी नसून त्यांच्या वैयक्तिक मंत्रिपदासाठी आहे. मुख्यमंत्री व राणे यांचा साेमवारी (ता. ३०) आळंदीत मराठा मोर्च्याच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. या वेळी शहरातील दुकाने सकाळपासूनच बंद ठेवून शासनाच्या विरोधात कडकडीत बंद पाळण्यात आला. या वेळी मोर्चादेखील काढण्यात आला हाेता. पालिका चौकात मोर्चेकरांनी ठिय्या मांडून रास्ता रोको केला.

एस. टी. वाहतूक ठप्प मंचर ः  मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी राजगुरुनगर व चाकण येथे पाळण्यात आलेल्या बंदचा परिणाम सोमवारी (ता. ३०) मंचर (ता. आंबेगाव) येथे जाणवला. नाशिकहून पुण्याला जाणारी वाहतूक ठप्प पडली होती. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे व मुंबईला जाणाऱ्या ४० एसटी गाड्या मंचर बस स्थानकावर उभ्या होत्या.

राजगुरुनगर व चाकण येथील बंदची परिस्थिती लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी पुणे, कोल्हापूर, बेळगाव, पंढरपूर, बारामती, संगमनेर, नाशिक, शिर्डी, धुळे, साक्री, भीमाशंकर, सुरत, इंदोर व मुंबईला जाणाऱ्या एसटी गाड्याचे नुकसान होऊ नये म्हणून मंचरला गाड्या थांबून ठेवल्या हाेत्या. सार्वजनिक वाहतूक ठप्प झाल्याने लहान मुले, महिला व ज्‍येष्ठ नागरिकांचे हाल झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com