सोलापुरात दुसऱ्या दिवशीही मराठा आरक्षणावरून आंदोलने

मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन

पंढरपूर, जि. सोलापूर  ः मराठा क्रांती मोर्चाने गेल्या दोन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणावररून आंदोलन करून लक्ष वेधले आहे. सलग दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.२२) मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले. मंगळवेढा, पंढरपूर, बार्शी तालुक्‍यात अनेक ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यासह एस. टी. बसेसवर दगडफेकीच्या घटनाही घडल्या.

पंढरपूरकडे निघालेले जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सहकार, पणनमंत्री सुभाष देशमुख यांनाही मंगळवेढ्याजवळ कार्यकर्त्यांनी घेराव घालून त्यांना जाब विचारला. पंढरपुरातील आषाढी वारीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःहून येणार नसल्याचे कळवूनही मराठा समाजाने आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यात तणावाचे वातावरण आहे.  

सोलापुरात शनिवारी शिवाजी चौकात चक्काजाम आणि मुंडण आंदोलन केल्यानंतर माढा, करमाळा, बार्शीत कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले. त्यानंतर बार्शी महामार्गावर एक बस जाळली. त्याशिवाय पाच बसवर पंढरपूर, मोहोळ भागात दगडफेक करण्यात आली. हे वातावरण अद्याप शांत झाले नाही, तोवर मंगळवेढ्यात सकाळी माचणूरजवळ कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

याच मार्गावरून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सुभाष देशमुख पंढरपूरकडे निघाले होते. पण त्यांना अडवून कार्यकर्त्यांनी घेराव घातला. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. स्वतः जलसंपदा मंत्री महाजन यांनी मुख्यमंत्र्यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून, भावना सांगितल्या. तेव्हा मुख्यमंत्र्यांनीही महापूजेसाठी मी येऊ नये, असे वाटत असेल, तर मी येत नाही, असे सांगितले.  तरीही कार्यकर्ते आंदोलनावर ठाम राहिले. मेगा भरती रद्द करावी, तेव्हाच आम्ही माघार घेऊ, असे सांगितले.

दुसरीकडे बार्शीजवळ वैराग एस. टी. स्थानकात उस्मानाबाद आगाराच्या दोन बसेसवर दगडफेक करण्यात आली. त्याशिवाय पंढरपुरातही खर्डीनजीक बसवर दगडफेक करण्यात आली. जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात बसेसवर दगडफेक आणि ठिय्या आंदोलनामुळे तणाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे आषाढीसाठी पंढरपुरातील वातावरण शांत रहावे, यासाठी पोलिस सतर्क झाले असून, शहरातील कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. काही प्रमुख कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेतले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com