आज राज्यव्यापी ‘बंद’ची हाक

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद / मुंबई   : मराठा आरक्षणासाठी आज (ता. ९) राज्यव्यापी बंदची हाक देण्यात आली आहे. औरंगाबादेत झालेल्या बैठकीनंतर बंदची घोषणा करण्यात आली. मात्र मुंबईसह ठाणे, नवी मुंबई आणि परळी येथे केवळ ठिय्या आंदोलन होणार आहे. राज्यभर पोलिस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे.

आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी बुधवारी (ता. ८) औरंगाबाद येथे तीन तास बैठक चालली. राज्यभरातील बहुतांश जिल्ह्यांचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते. नऊ जिल्हा समन्वयकांनी संदेशाद्वारे आपण जो निर्णय घ्याल, तो आम्हाला मान्य असल्याचे कळविले होते. गुन्हे दाखल करून मराठा समाजाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न सरकार आणि समाजकंटकाकडून होतो आहे. त्यामुळे स्वत:लाच शिक्षा म्हणून १५ ऑगस्टपासून चूल बंद आंदोलन करण्यात येणार आहे. एक वेळचा अन्नत्याग करावा, असे या बैठकीत मांडले गेले.

बैठकीनंतर समन्वयकांनी पत्रकारांना सांगितले, की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आजचा बंद होईल. आंदोलनादरम्यानचे गुन्हे सरसकट मागे न घेतल्यास १५ ऑगस्टपासून चूल बंद आंदोलन केले जाईल. तसेच, तालुका, जिल्हास्तरावर शुक्रवारपासून (ता. १०) साखळी उपोषण केले जाईल, आत्महत्या रोखण्यासाठी शुक्रवार (ता. १०) ते रविवार (ता. १२) दरम्यान संवाद यात्रा निघणार आहे.मराठा समाजबांधवांनी आत्महत्या करू नयेत, तसेच कोपर्डी प्रकरण स्मरणात ठेवून क्रांती दिनाचे आंदोलन शांततेत करावे, हिंसेला थारा देऊ नये, असेदेखील आवाहन या वेळी करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबईत मराठा आंदोलक आणि पोलिसांदरम्यान महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यात मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीला गुरुवारच्या महाराष्ट्र बंदमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला. वारंवार लोकांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे सांगत या चारही शहरांना बंदमधून वगळण्याचा आणि या शहरांमध्ये केवळ ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नवी मुंबईतील सकल मराठा समाजाच्या नेत्यांनी ‘बंद’मध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नवी मुंबईत ‘बंद’ऐवजी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदार नरेंद्र पाटील यांनी सांगितले आहे. ‘बंद’बाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समन्वय समित्यांना देण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक परिस्थिती पाहून ‘बंद’बाबतचे निर्णय घेतले जातील, असे सांगण्यात आले. काही ठिकाणी ‘बंद’ऐवजी चक्का जाम, ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचा निषेध नोंदवला जाणार आहे. राज्यात गेल्या २१ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. या दरम्यान अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते.

‘बंद’मधून अत्यावश्यक सेवा वगळल्या आजच्या बंदमधून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहेत. दवाखाने, मेडिकल सुरू राहतील. एसटी महामंडळाच्या वाहनाला लक्ष्य करू नका, असे आवाहन समन्वयकांनी केले. आतापर्यंत रुग्णवाहिकांना जशी वाट करून दिली. तसेच धार्मिक यात्रा म्हणजेच हज यात्रेकरूंनाही आंदोलक वाट करून देतील, अशी आचारसंहिता ‘महाराष्ट्र बंद’साठी तयार केली आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका  मुंबईत आज पेट्रोल पंपापासून मॉलपर्यंत आणि रिक्षापासून ते बसेसपर्यंत सर्व वाहतूक बंद असेल, असे संदेश सध्या सोशल मीडियावरून फिरवले जात आहेत. एवढेच नव्हे तर नागरिकांनी तातडीने सर्व आवश्यक वस्तूंची खरेदी करावी, अशा सूचनाही दिल्या जात आहेत. हे सर्व मेसेज खोटे असून आज मुंबईतील जनजीवन सुरळीत सुरू राहील, असे सकल मराठा समाजाने स्पष्ट केले आहे. ‘मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळीतील ‘बंद’बाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका’, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com