नगर जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र घटले

नगर जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र घटले
नगर जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र घटले

नगर : नगर जिल्ह्यामध्ये गेल्या दहा वर्षांच्या तुलनेत कापसाच्या क्षेत्रात वाढ होत गेली. मात्र, यंदा पाऊस नसल्याचा आणि गेल्या वर्षी बोंड अळीचा परिणाम म्हणून कापूस लागवड क्षेत्रावर परिणाम झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे एकवीस हजार हेक्‍टरक्षेत्रावर कमी लागवड कमी झाली आहे. शिवाय लावलेल्या कापसावरही अनेक ठिकाणी बोंड अळी आढळून आल्याने शेतकरी धस्तावलेले आहेत.

ऊस, फळबांगाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये साधारण पंधरा वर्षांपूर्वी कापूस लागवड सुरू झाली. शेवगाव, पाथर्डी, नेवासा, जामखेड तालुक्यांतील लागवड होऊ लागली. त्यानंतर मात्र त्याचे जिल्ह्यातील क्षेत्र वाढू लागले. साधारण आठ वर्षांपूर्वी ६० हजार हेक्‍टर कापसाचे सरासरी क्षेत्र होते. हळूहळू एक लाखापर्यंत सरासरी क्षेत्र गेले. यंदा कृषी विभागाने १ लाख ५ हजार ४१९ हेक्‍टर सरासरी कापसाचे क्षेत्र धरून बियाणे खताचे नियोजन केले. त्यापैकी आतापर्यंत ९४ हजार ६६९ हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झाली आहे. गेल्यावर्षी १ लाख १५ हजार ६०० हेक्‍टरवर लागवड झाली असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे.

गेल्यावर्षी जिल्हाभरात बोंड आळीचा फटका बसला. त्यामुळे कापूस उत्पादकांचे कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस नाही. त्याचा परिणाम खरिपाच्या पेरण्यावर झाला आहे. खरिपाचे ४ लाख ७८ हजार ६४० हेक्‍टर सरासरी क्षेत्र आहे. त्यातील ४ लाख १७ हजार ४७२ (८७.२२) हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.   वाढीव क्षेत्राचा घोळ गतवर्षी एक लाख १५ हजार ६०० हेक्‍टर क्षेत्रावर कापूस लागवड झाल्याची नोंद प्रशासनाच्या सुरवातीच्या अहवालात होती. यंदासाठी (२०१८-१९) साठी प्रकाशित झालेल्या अहवाल पुस्तिकेतही एक लाख १५ हजार ६०० हेक्‍टर क्षेत्रावर कापूस लागवड झाल्याचे नमूद आहे. मात्र, गतवर्षी बोंड अळीमुळे नुकसान झाल्याबाबत १ लाख ४७ हजार हेक्‍टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचे पंचनामे करून १५७ कोटी २३ लाख १४ हजार ८०० रुपयांची नुकसानभरपाईसाठी निधी मागितला. अजूनही जिल्ह्यामधील अनेक शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. वर्षनिहाय कापूस लागवडीचे क्षेत्र

२००८-०९ ६०, ८०१
२००९-१० ८४, ७९२
२०१०-११ १,०९,०३८
२०११-१२ १,२१,०००
२०१२-१३ ९,५१२८
२०१३-१४ १,१०,०००
  २०१४-१५ ८९,५००
२०१५-१६ ७३,२००
२०१६-१७ ९२,०००
२०१७-१८ १,१५,६००
२०१८-१९ ९४,६६९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com