लघु प्रकल्पातील पाणीसाठा घटला
लघु प्रकल्पातील पाणीसाठा घटला

मराठवाड्यातील लघू प्रकल्पांत १४ टक्के उपयुक्त पाणीसाठा

औरंगाबाद  : एकीकडे उष्णतेचे प्रमाण वाढत असताना मराठवाड्यातील प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. ७४६ लघू प्रकल्पांतील उपयुक्‍त पाणीसाठा १४ टक्‍क्‍यांवर आला आहे. मराठवाड्यातील एकूण ८६७ प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठ्याचा टक्‍का २४ वर आला असून, झपाट्याने आटणारे पाणीसाठे चिंतेत भर घालत आहेत. 
 
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांमधील उपयुक्‍त पाणीसाठा २८ टक्‍क्‍यांवर आला आहे. ७५ मध्यम प्रकल्पातही केवळ २४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांमध्ये २९ तर तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील चोवीस बंधाऱ्यांमध्ये केवळ ३२ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.
 
मोठ्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात उपयुक्‍त पाणीसाठा संपुष्टात आला आहे. नांदेड जिल्ह्यातील निम्न मनार प्रकल्पातील पाणीसाठाही झपाट्याने कमी होतो आहे. गत आठवड्यात या प्रकल्पात १४ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा होता. सध्या या प्रकल्पात ९ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे.  विष्णूपुरी प्रकल्पात १२ तर हिंगोली जिल्ह्यातील सिद्धेश्‍वर प्रकल्पातही केवळ १४ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्‍त पाणीसाठा आता ४८ टक्‍क्‍यांवर आला आहे.
 
औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची अवस्था बिकट आहे. या प्रकल्पांमध्ये केवळ ४ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. परभणी जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पात केवळ दहा टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. हिंगोली जिल्ह्यातील २७ लघू प्रकल्पातील पाणीसाठ्यात लक्षणीय घट होत असून, सध्या या प्रकल्पांमध्ये केवळ चार टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा आहे.
 
परभणी जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पांत ८, जालना जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पात ९, औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघू प्रकल्पांत १०, बीडमधील १२६, लातूरमधील १३२, उस्मानाबादमधील २०१ लघू प्रकल्पांमध्ये  प्रत्येकी १७ टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक आहे. नांदेड जिल्ह्यातील ८८ लघू प्रकल्पांत १३ टक्‍के उपयुक्‍त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. 

औरंगाबाद जिल्ह्यातील सोळापैकी नऊ, बीड व नांदेडमधील प्रत्येकी एका मध्यम प्रकल्पासह घनसरगाव बंधाऱ्यातील उपयुक्‍त पाणीसाठा शून्यावर आला आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील लाहूकी, गिरीजा, वाकोद, खेळणा, अंजना पळशी, शिवना टाकळी, टेंभापूरी, नारंगी बोरदहेगाव, बीड जिल्ह्यातील वाघेबाभूळगाव, तर नांदेड जिल्ह्यातील महालिंगी प्रकल्पाचा समावेश आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com