वाशीम जिल्ह्यात पंतप्रधानांच्या पत्राचे सरपंचांना वितरण

वाशीम जिल्ह्यात पंतप्रधानांच्या पत्राचे सरपंचांना वितरण
वाशीम जिल्ह्यात पंतप्रधानांच्या पत्राचे सरपंचांना वितरण

वाशीम : आगामी पावसाळ्यात पावसाच्या पाण्याचे जास्तीत जास्त संकलन व संचय करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरपंचांना केले आहे. यासाठी त्यांनी सर्व सरपंचांना पत्र लिहिले आहे. मोदी यांच्या स्वाक्षरीचे हे पत्र जिल्हा प्रशासनामार्फत सरपंचांना सुपूर्त करण्यात येणार आहे. जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांत स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेतलेल्या गावांच्या सरपंचांना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्या हस्ते हे पत्र सुपूर्त करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात झालेल्या कार्यक्रमाला निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्यासह सरपंच उपस्थित होते. मोदी यांनी सरपंचांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे, की काही दिवसतांच पावसाचे आगमन होणार आहे. आपण भाग्यवान आहोत, की आपल्या देशाला निसर्गाने पुरेसे पावसाचे पाणी दिले आहे. निसर्गाच्या या देणगीचा आदर करणे आपले कर्तव्य आहे. याकरिता पावसाचा कालावधी सुरू होताच आपल्याला अशा काही उपाययोजना कराव्या लागतील, की जेणेकरून आपण पावसाच्या पाण्याचे जास्तीत जास्त संकलन व संचय करू शकू. या पत्रामध्ये श्री. मोदी यांनी पाण्याची कशा पद्धतीने साठवणूक करता येईल, याविषयी सूचनाही दिल्या आहेत. सरपंचांनी ग्रामसभा भरवून त्यात हे पत्र सर्वांना वाचून दाखवावे आणि पावसाचे पाणी अडविण्यासाठी गावात काय व्यवस्था करता येईल, यावर सर्वांनी मिळून चर्चा करावी. स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेऊन त्या अभियानाला जन आंदोलनाचे स्वरूप दिले, त्याचप्रमाणे पाण्याच्या अभियानालासुद्धा जन आंदोलनाचे स्वरूप देऊन यशस्वी करण्यास नेतृत्व द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. वाशीम जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामात पुढाकार घेतलेल्या वाशीम तालुक्यातील साखरा, वाळकी जहाँगीर, कारंजा तालुक्यांतील उंबर्डा बाजार, पिंप्री मोडक, शिवनगर, रिसोड तालुक्यातील बाळखेड, मंगरूळपीर तालुक्यातील नागी या गावांच्या सरपंचांना जिल्हाधिकारी श्री. मोडक यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पत्र सुपूर्त करण्यात आले. लवकरच जिल्ह्यातील सर्व सरपंचांना हे पत्र जिल्हा प्रशासनामार्फत सुपूर्त करण्यात येणार आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com