नगर जिल्ह्यातील ३५ गावांत दुष्काळी स्थिती

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर   : जिल्ह्यामध्ये अपेक्षित प्रमाणात पाऊस झाला नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने आता नुकतीच खरीप हंगामात पारनेर व नगर तालुक्‍यांतील ३५ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी असल्याचे जाहीर केले आहे. या गावांसाठी विविध सवलती शासनाने लागू केल्या आहेत. यात ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या पारनेर तालुक्‍यातील ३०, तर नगर तालुक्‍यातील पाच गावांचा समावेश आहे. सध्या प्रशासनाने फक्त दोन तालुक्‍यांतील गावांत दुष्काळी स्थिती असल्याचे मान्य केले असले तरी साऱ्या जिल्ह्यावरच दुष्काळाचे सावट आहे.

नगर जिल्ह्यामध्ये यंदा संपूर्ण पावसाळ्यात पाऊस झाला नसल्याने खरीप वाया गेला. पिण्याच्या पाण्याचे संकटदेखील उभे राहत आहे. त्यामुळे प्रशासनाने केलेल्या पाहणीतून ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यातील ३५ गावांत ५० पेक्षा कमी पैसेवारीची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एक हजार ६०० गावांपैकी एक हजार १८ गावे प्रामुख्याने रब्बी हंगामातील पिके घेतात, तर ५८२ गावे खरीप हंगामाची पिके घेतात. श्रीरामपूर, श्रीगोंदे, कर्जत व जामखेड हे तालुके रब्बी हंगामातील पिके घेतात. उर्वरित दहा तालुके खरीप हंगामातील पिके घेतात.

यंदा आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पिकांचे उत्पादन घटणार आहे. जलयुक्‍त शिवार योजनेतून चांगली कामे झाली; मात्र पावसाअभावी भूजलपातळी घटली आहे. जमीन महसुलात सूट, कर्जाचे पुनर्गठन, पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टॅंकरचा वापर, टंचाई जाहीर केलेल्या गावांत शेतकऱ्यांच्या शेतीपंपांची वीजजोडणी खंडित न करणे आदी सवलती ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांना लागू करण्यास शासनाची मंजुरी आहे. सर्वांत कमी पैसेवारी पारनेर तालुक्‍यातील कासारे गावाची आहे.

पैसेवारी चुकीची खरीप हंगामी पिकांची पैसेवारी प्रशासनाने जाहीर केली आहे; परंतु ती चुकीची आहे. ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेली गावे तालुक्‍यात बहुतांश आहेत. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा दुष्काळसदृश स्थितीचा आढावा घ्यावा व नंतर पैसेवारी जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. प्रशासनाने दुष्काळी स्थिती गांभीर्याने घ्यावी, सर्व आढावा घेतल्याशिवाय पैसेवारी जाहीर करू नये, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केली आहे.

कमी पैसेवारी जाहीर केलेली गावे पारनेर ः तिखोल, ढवळपुरी, भनगडेवाडी, दरोडी, गारखिंडी, कळस, टाकळी ढोकेश्‍वर, कर्जुले हर्या, कासारे, धोत्रे बु., धोत्रे खु, ढोकी, सावरगाव, नांदुर पठार, कारेगाव, वनकुटे, तास, वडगाव सावताळ, गाजदीपूर, वासुंदे, पळशी, मांडवे खु., देसवडे, खडकवाडी, काताळवेढे, डोंगरवाडी, पळसपूर, पोखरी, वारणवाडी, म्हसोबा झाप. नगर ः खोसपुरी, पांगरमल, मजले चिंचोली, आव्हाडवाडी, उदरमल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com