वऱ्हाडातील बाजारपेठेत पावसाअभावी शुकशुकाट

वऱ्हाडातील बाजारपेठेत पावसाअभावी शुकशुकाट
वऱ्हाडातील बाजारपेठेत पावसाअभावी शुकशुकाट

अकोला ः  खरीप तोंडावर आलेला असतानाही बाजारपेठांमध्ये शुकशुकाट आहे. कुठेच फारशी हालचाल नाही. शेतकऱ्यांजवळही बी-बियाणे, खते खरेदीसाठी पैसा नाही. कुणी पीकविम्याच्या मदतीची तर कुणी पीक कर्ज हातात पडण्याची प्रतीक्षा करीत आहे. त्यातच पाऊसही लांबत असल्याने चिंतेचे ढग वाढू लागले आहेत. 

वऱ्हाडात अकोला, बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. बुलडाणा जिल्हा तर काही वर्षे सलग दुष्काळात होरपळत आहे. अर्धा जून महिना लोटला, तरी पाऊस नसल्याने उलाढाल ठप्प पडलेली आहे. शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ठेवली असून प्रत्येक जण पावसाची प्रतीक्षा करीत थांबला आहे. वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांमध्ये पीककर्ज वाटपाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. बुलडाणा जिल्ह्यात सरासरी १० टक्केही पीककर्ज वाटप अद्याप झालेले नाही. अकोला, वाशीममध्येही उद्दिष्टाच्या २५ टक्क्यांपर्यंत पीककर्ज वाटप पोचलेले नाही. 

सध्या सर्वच कृषी केंद्रांमध्ये बी-बियाणे, रासायनिक खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. विक्रेत्यांनी कोट्यवधींचा माल साठवून ठेवलेला आहे, तर शेतकरी या महिनाअखेरपर्यंत तरी पीककर्ज मिळेल अशी अपेक्षा बाळगून आहे.  पाऊस अधिक लांबत गेल्यास पेरणी नियोजन बदलण्याची चिन्हे अधिक आहेत. प्रामुख्याने या विभागाचे मुख्य पीक असलेल्या सोयाबीनच्या लागवड क्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. असे झाले तर विक्रेत्यांना मोठी झळ सहन करावी लागू शकते. 

जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून सतत दुष्काळ आहे. या वषी पीकविमा जाहीर झाला मात्र, तो हेक्टरी अवघा पाच हजार रुपयांपर्यंत मिळत आहे. सरसकट सर्वच शेतकऱ्यांना हा विमा मिळालेला नाही. पीककर्जासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करीत आहोत. वेळेत आर्थिक मदत न झाल्यास अनेकांसमोर पेरणी कशी करावी, हा प्रश्न उभा आहे.  - श्रीकृष्ण ढगे, शेतकरी, वरवट बकाल, जि. बुलडाणा. 

बाजारपेठेत सध्या शांतता आहे. काहीच खरेदी होत नाही. थोडीबहुत जी बियाणे खरेदी आहे ती कपाशी बियाण्याची होत आहे. पाऊस लांबत असल्याने सोयाबीन लागवडीकडे कल कमी होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना भेडसावत असलेली आर्थिक टंचाई हेसुद्धा खरेदी न होण्याचे कारण आहे. सध्या सर्वच कृषी विक्रेते बसून आहेत. ना बियाण्याची विक्री सुरू आहे ना खताची विक्री होत आहे. कृषी केंद्रचालकांनी सर्वच बी-बियाणे, खतांचा साठा केलेला असून मालाची उचल नसल्याने हा पैसा अडकून पडला आहे. व्यवहार ठप्प झालेले आहेत.  - मोहन सोनोने, कार्याध्यक्ष, कृषी व्यावसायिक संघटना, अकोला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com