मजुरी करून शेतकरीपुत्र बनला कृषी विस्तार संचालक

डॉ. विठ्ठलराव शिर्के.
डॉ. विठ्ठलराव शिर्के.

वर्ष १९८२ मधील जून महिन्याची एक सकाळ... पुण्याच्या ‘अॅग्रिकल्चर कॉलेज’च्या गेटमधून एक शेतकरीपुत्र आत येतो. वायरची पिशवी, साधा पांढरा शर्ट, पायजमा, डोक्यावर गांधी टोपी घातलेला, अनवाणी अवतारातील हा विद्यार्थी पाहून अवघा कॉलेज कॅम्पस फिदीफिदी हसू लागतो. सुटाबुटातील इतर ‘स्टुडंटस’ला आश्चर्याचा अजून एक धक्का बसतो, जेव्हा तो टोपीवाला शेतकरीपुत्र थेट ‘बीएस्सी अॅग्री’च्या क्लासरूममध्ये दिसतो तेव्हा...!  कमवा व शिका या योजनेत हाच विद्यार्थी पुढे या कॉलेजमध्ये रोजंदारीने काम करू लागला. हा विद्यार्थी रात्री वॉचमनबरोबर झोपून पहाटे उठून कॉलेज कॅम्पसमधील विद्यार्थ्यांना दूध वाटू लागला. भूक लागली की हमाल पंचायतीच्या अड्ड्यावर पिढलं-भाकर खाऊ लागला. पोटाच्या भुकेपेक्षाही ज्ञानाची मोठी भूक असलेला हा विद्यार्थी पुढे याच कॉलेजचा प्राचार्य बनला. त्याचे नाव डॉ. विठ्ठलराव साहेबराव शिर्के. आता हाच विद्यार्थी राज्याच्या कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या कृषी विस्तार संचालकपदी विराजमान झाला आहे.  ग्रामिण भागातील नव्या पिढीला दीपस्तंभ ठरणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. विठ्ठलराव शिर्के. कृषी परिषदेच्या विस्तार शिक्षण व साधनसामग्री विकास विभागाचे संचालक म्हणून अलीकडेच त्यांची नियुक्ती झाली आहे. डॉ. शिर्के हे पुण्याच्या अॅग्रिकल्चर कॉलेजमध्ये गांधी टोपी घालून शिक्षण घेणारे एकमेव विद्यार्थी होते. खिशात शिक्षणासाठी पैसे नसल्यामुळे कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य डॉ. बी. सी. पाटील यांनी स्वतः अॅडमिशनाला पैसे दिले. याच कॉलेजमध्ये तीन रुपये रोजाने ते कामाला लागले. पहाटे दूधवाटप, सकाळी रोजंदारीवर काम, दुपारी न जेवता अभ्यास आणि संध्याकाळी भवानी पेठेत कष्टाची भाकर केंद्रावर जेवण, असा आगळावेगळा त्यांचा दिनक्रम होता. पहाटे दूध वाटून पुन्हा रात्री अकरा वाजेपर्यंत लायब्ररीत दिसणारा हा एकमेव विद्यार्थी होता.   कष्टाला चिकाटीची जोड देत ‘बीएस्सी अॅग्री’मध्ये डिस्टिंक्शनमध्ये आणि कृषीविद्या विषयात डॉ. शिर्के हे सर्वप्रथम आले आणि कॉलेजला आश्चर्याचा धक्का बसला. कृषी विस्तार विषयात ‘एमएस्सी’मध्ये ते विद्यापीठात सर्वप्रथम आले. कृषी विस्तारातच डॉ. शिर्के यांनी शेतकऱ्यांसाठी ‘मराठी भाषेचे अवघडपण व सोपेपण मोजण्याचे सूत्र’ विकसित केले. मराठी भाषेतील हा पहिलाच प्रयोग ठरला. डॉ. शिर्के कराडच्या नव्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य झाले. पुढे महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या कृषी विस्तार विभागाचे प्रमुखदेखील बनले.  राज्याच्या कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे विस्तार संचालक पदावर काम करण्यासाठी राज्य शासनाने अर्ज मागविले होते. या पदासाठी डॉ. शिर्के यांनी अर्ज करताच शासनाने त्यांची गुणवत्तेवर निवड केली. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये विस्तार कार्याचा समन्वय ठेवणे आणि शासन व विद्यापीठांमधील दुवा म्हणून काम करण्याची मोठी जबाबदारी डॉ. शिर्के यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे. विस्तार शिक्षणासंदर्भात चारही विद्यापीठांच्या उपक्रमांचे अहवालदेखील डॉ. शिर्के यांच्याकडूनच शासनाला जाणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय स्तरावरील कृषी शास्त्रज्ञ निवड समितीचे तज्ज्ञ सदस्य म्हणून डॉ. शिर्के काम बघतात. कृषी परिषदेत कृषी विद्यापीठांमधील साधनसामग्रीच्या विकासासंबंधीचे कामकाज हाताळण्याची जबाबदारी डॉ. शिर्के यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.   पुण्याचे अॅग्रिकल्चर कॉलेज असो की राहुरी विद्यापीठ असो. शेतकरी कुटुंबातील एक गरीब विद्यार्थी म्हणून या संस्थांनी मला घडविले आहे. त्यामुळे कृषी शिक्षण विकासासाठी शासनाची ध्येयधोरणे शेतकऱ्यांपर्यंत पोचविणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय आहे, असे डॉ. शिर्के यांनी सांगितले.  वडिलांच्या संदेशामुळेच शिकलो... सोलापूरच्या करमाळा भागात कोरडवाहू शेती करणाऱ्या माझ्या वडिलांनी दुष्काळी कामावर खडी फोडून मला शाळा शिकवली. शिकण्यासाठी लाज बाळगू नको, असा सल्ला त्यांनी दिला. वडिलांच्या या संदेशामुळेच कष्ट करून मी पुण्याच्या अॅग्रिकल्चर कॉलेजमध्ये डिस्टिंक्शनमध्ये पास झालो. माझ्याच अॅग्रिकल्चर कॉलेजमध्ये मी दहा वर्षे विस्तार विभागाचे प्रमुख म्हणून आणि पुन्हा प्राचार्य म्हणून काम बघणे माझ्यासाठी गौरवाची बाब होती. कृषी महाविद्यालयाने मला घडविले. त्यामुळेच मी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘एमपीएससी’मध्ये सिलेक्शन होऊनदेखील मी कृषी विद्यापीठात नोकरी करण्याची प्रतिज्ञा घेतली, असे डॉ. शिर्के आनंदाने सांगतात.  डॉ. शिर्के : ९४२२५२२७१२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com