वऱ्हाडात कांदा बिजोत्पादनाला गारपिटीचा तडाखा

तीन एकरांत ४० क्विंटल कांद्याची लागवड केली होती. हा बियाण्याचा कांदा २६०० रुपये भावाने विकत घेतला होता. लाख रुपये बियाण्यावर खर्च झाला. शिवाय तीन खते, तीन फवारण्या, पाणी व्यवस्थापन असा दीड लाखावर खर्च झाला होता. अर्धा तास झालेल्या गारपिटीनंतर हा संपूर्ण प्लॉट जमीनदोस्त झाला. आता नांगरटी करणार आहे. दरवर्षी आमच्या गावात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. यावर्षी फक्त चौघांनी लागवड केली आणि चौघांचेही माझ्यासारखेच नुकसान झाले. - शरद रमेशराव देशमुख, रा. दुधा, ता. मेहकर, जि. बुलडाणा .
गारपीटीचा कांदा बीजोत्पादनाला फटका
गारपीटीचा कांदा बीजोत्पादनाला फटका

अकोला ः कांदा बिजोत्पादनाचे मोठे क्षेत्र असणाऱ्या बुलडाणा, वाशीम, अकोला या जिल्ह्यांमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या गारपिटीचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. इतर पिकांसोबतच कांदा बिजोत्पादनाचे क्षेत्र या आपत्तीत पार उद्‍ध्वस्त झाले आहे. उत्पादनात ५० टक्‍क्‍यांपेक्षा अधिक घट होण्याची शक्‍यता शेतकरी वर्तवित आहेत.

गेल्या दोन हंगामात कांदा बियाण्याला फारसे दर न मिळाल्याने आधीच शेतकऱ्यांनी लागवड घटविली. कांदा दरातील चढ-उतारामुळे लागवडीचे क्षेत्र जवळपास ६० टक्‍क्‍यांवर आले होते. ज्यांनी लागवड केली त्या शेतकऱ्यांच्या कांदा प्लॉटमध्ये बिजाची प्रक्रिया सुरू झाली होती. कांद्याचे गोंडे उमलू लागले असतानाच या महिन्यात दोनदा गारपीट झाली. या गारपिटीचा तडाखा हे बिजोत्पादाचे प्लॉट सहन करू शकले नाहीत. कांद्याची पात मोडली गेली. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

प्रामुख्याने बुलडाणा जिल्ह्यात मेहकर, चिखली, देऊळगावराजा, सिंदखेडराजा, वाशीम जिल्ह्यात रिसोड, मालेगाव, अकोल्यात पातूर, तेल्हारा, अकोट या भागांत अधिक नुकसान झाले. यातील बहुतांश तालुक्‍यांत दरवर्षी शेतकरी कांदा बिजोत्पादन घेतात. एकरी तीन ते पाच क्विंटलपर्यंत सरासरी बियाण्याची उत्पादकता आहे.

यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात हमखास पैसे मिळवून देणारे पीक म्हणून याकडे पाहले जात होते. मात्र गेल्या दोन वर्षात बियाण्याच्या दरात प्रचंड चढ-उतार झाले. मागील मोसमात उत्पादित केलेले बियाणे अनेकांकडे तसेच पडून होते. आता बियाण्याला मागणी येऊ लागली. मात्र बियाण्याची उगवण क्षमतेवर दर ठरत आहे. बियाणे तसेच साठवून ठेवल्याने उगवण क्षमतेवर त्याचा परिणाम झाला आहे.

या मोसमात घटलेले लागवड क्षेत्र, गारपिटीच्या तडाख्याने झालेले नुकसान तसेच बाजारात कांद्याचे सध्या मिळत असलेले चांगले दर बघता कांदा बियाण्याला योग्य दर मिळतील, अशी शेतकऱ्यांना आशा आहे. मात्र उत्पादनाबाबत साशंकता आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com