खानदेशात पपई लागवडीत होणार निम्म्याने घट

खानदेशात पपई लागवडीत होणार निम्म्याने घट
खानदेशात पपई लागवडीत होणार निम्म्याने घट

जळगाव : खानदेशात आगाप पपई लागवडीला सुरवात झाली आहे. परंतु पाण्याचा अभाव असल्याने व यंदाच्या दरांच्या तिढा लक्षात घेऊन लागवड मागील हंगामाच्या तुलनेत निम्म्यावर येईल, असे चित्र आहे. मुबलक जलसाठा, मुख्य मार्गांवर शेती, रस्त्यांची चांगली सुविधा असणारे शेतकरीच लागवडीचे नियोजन करीत असल्याची माहिती मिळाली. 

पपई लागवडीसाठी खानदेशात नंदुरबारपाठोपाठ धुळे व जळगाव जिल्ह्यातील अनेक गावे प्रसिद्ध आहेत. सर्वाधिक १५०० ते १७०० हेक्‍टवर नंदुरबारात लागवड होते. नंदुरबारमधील शहादा, तळोदामध्ये, धुळ्यात शिरपूर, शिंदखेडा व धुळे तालुक्‍यात, जळगाव जिल्ह्यात चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर व पाचोरा भागात लागवड केली जाते. फेब्रुवारीच्या सुरवातीला सुरू होऊन मार्चअखेर लागवड आटोपते. काही शेतकरी एप्रिलच्या मध्यापर्यंतदेखील लागवड करतात. खानदेशात मिळून चार हजार हेक्‍टरपर्यंतची लागवड असते. परंतु यंदा ही लागवड दोन ते अडीच हजार हेक्‍टरपर्यंतच होईल, अशी स्थिती आहे. 

चोपडामधील सातपुडा पर्वतालगतच्या अडावद, धानोरा, पंचक, लोणी, नारोद भागात पाणीटंचाई जाणवत आहे. लासूर, चुंचाळे भागातही समस्या आहे. यावलमधील वड्री, कोरपावली, विरावली, न्हावी, हंबर्डी, सांगवी बुद्रूक, भालोद परिसरातही जलसंकट आहे. फक्त रावेरात स्थिती बरी आहे. पाचोरा, धरणगाव भागात लागवड अपवादानेच होईल, कारण या भागातही आतापासूनच शिवार उजाड होत आहे. धुळ्यातील शिंदखेड्यामध्ये लागवड घटेल.

शिरपुरातील सातपुडालगतच्या निमझरी, तऱ्हाडीसारख्या भागातही जलसंकट आहे. नंदुरबारमधील नंदुरबार तालुक्‍यातील शिंदे, लहान शहादे, कोळदे, पळाशी, कोठली, खोंडामळी भागातही हीच स्थिती आहे. या भागात जलसंकट वाढल्याने मिरचीचे पीक सोडून देण्याची वेळ आली आहे. शहादामधील जयनगर, बामखेडा, कहाटूळ या भागातही जलसंकट आहे. यंदा दरांचा तिढाही अधिक राहिला. दर सात-आठ दिवसांत दरांवरून तक्रारी येत होत्या. ऑक्‍टोबरमध्ये दर १६ रुपये होते. २०१८च्या अखेरिस दर तीन रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आले. सध्या उष्णता वाढल्याने दरांवर पुन्हा दबाव वाढू लागला आहे. नुकसान अधिक झाल्याने लागवड कमी होईल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com