विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७०० रुपये क्‍विंटलवर

विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७०० रुपये क्‍विंटलवर
विदर्भात भुईमूग शेंगाचे दर पोचले ५७०० रुपये क्‍विंटलवर

नागपूर ः उन्हाळी भुईमुगाची आवक विदर्भातील अनेक बाजार समित्यांमध्ये होत आहे. यवतमाळ, अमरावती, तसेच वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत सध्या भुईमुगाची आवक वाढती असून दरातही तेजी अनुभवली जात आहे.  विदर्भात उन्हाळी भुईमूग क्षेत्र सर्वाधिक आहे. सिंचनाच्या सोयी असलेल्या शेतकऱ्यांकडून भुईमूग घेतला जातो. परंतू या वर्षी पाण्याची उपलब्धता कमी असल्याने सरासरीपेक्षा कमी क्षेत्रावर भुईमुगाची लागवड झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. लागवड क्षेत्र कमी झाल्याच्या परिणामी बाजारातील भुईमुगाची आवक ही अपेक्षित नाही. परिणामी, दरात तेजीचा अनुभव सध्या भुईमूग उत्पादक घेत आहेत.  यवतमाळ जिल्ह्यात भुईमुगाचे सरासरी क्षेत्र सर्वाधिक आहे. कृषी विभागाकडील आकडेवारीनुसार सुमारे आठ हजार हेक्‍टरवर या जिल्ह्यात भुईमूग होतो. परंतु या वर्षी संरक्षित सिंचन पर्यायांनी तळ गाठल्याने त्याचा परिणाम भुईमूग क्षेत्र कमी होण्यावर झाला आहे. यवतमाळ बाजार समितीत सध्या रोजची भुईमूग आवक अवघी ७०० क्‍विंटलची आहे. भुईमुगाला सरासरी ५२०० ते ५७०० रुपये क्‍विंटल इतका दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव वाढई यांनी दिली.  अमरावती बाजार समितीत देखील दर पाच हजार रुपये क्‍विंटलच्या वर असल्याचे सांगण्यात आले. परंतु आठवडाभरात दरात मोठे चढउतार या ठिकाणी अनुभवण्यात आले. गुरुवारी (ता. ६) ४०५० ते ५१५० इतका दर भुईमुगाचा होता. दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी (ता. ७) हे दर ४५०० ते ५१५० रुपयांवर पोचले. शनिवारी (ता. ८) ४५०० ते ५२०० रुपये क्‍विंटल इतका दर मिळाला. त्यानंतर मात्र अमरावती बाजार समितीत मंगळवारी (ता. ११)  दर ४००० ते ५२०० रुपयांवर पोचले. शुक्रवारी (ता. १४) ४५०० ते ५४३१ रुपये क्‍विंटलचा दर भुईमूग शेंगांना मिळाल्याचे बाजार समिती सूत्रांनी सांगितले. वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीत देखील भुईमूग शेंगांची आवक वाढती राहते. वाशीम जिल्ह्यात ६०० हेक्‍टरचे सरासरी क्षेत्र आहे. या वर्षी पाण्याअभावी ते अर्ध्यावर आल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. कारंजा बाजार समितीत भुईमुगाचे दर ५५०० रुपये क्‍विंटलचे आहेत. सरासरी ५०० क्‍विंटलची आवक या ठिकाणी असल्याचे कारंजा बाजार समितीचे सचिव नीलेश भाकरे यांनी सांगितले.  सरासरी क्षेत्र व चौकटीत या वर्षीचे क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

अमरावती  २२०० (९१४)
बुलडाणा १५०० (८७१)
अकोला  २९०० (८४७)
यवतमाळ  ८००० (१७४२)
वाशीम  ६०० (३००.९०)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com