पावसाने ताण दिल्यामुळे खरीप धोक्यात

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारली असल्याने पीक करपले अाहे. माझ्या शेतातील सोयाबीनचे संपूर्ण पीक सुकून गेले आहे. शासनाने तातडीने सर्वे करून आम्हाला मदत द्यावी. - देविदास लाहुडकर, शेतकरी, चिखली (आमसरी), जि. बुलडाणा.
पावसाअभावी मूगाला फटका
पावसाअभावी मूगाला फटका

पुणे ः राज्यात काही ठिकाणी परतीच्या पावसाने हजेरी लावली असली, तरी सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांतील काही भाग आणि मराठवाडा व विदर्भाच्या बहुतांश भागांत पावसाने दडी मारल्यामुळे पिके संकटात सापडली आहेत. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस झाला नाही, तर सोयाबीन आणि कापूस या पिकांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच, मराठवाड्यात रबी हंगामातील पेरण्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. शिवाय, उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्नही गंभीर होण्याची शक्यता आहे.

पावसाअभावी कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांत भाताचे पीक आणि नवीन लागवड केलेला ऊस अडचणीत सापडला आहे. सोलापूर जिल्हा एकीकडे दुष्काळाचे संकट आणि दुसरीकडे उसावर हुमणीचे आक्रमण, अशा दुहेरी संकटात सापडला आहे. सोलापूर जिल्ह्यातील ११ पैकी १० तालुक्यांत पावसाळ्याच्या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत ४५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. पुणे जिल्ह्यात पाऊस चांगला झाल्यामुळे सोलापुरातील उजनी धरण शंभर टक्के भरले असले, तरी त्या पाण्याचा फायदा केवळ माळशिरस, पंढरपूर, माढा, करमाळा आणि मोहोळ या मोजक्याच तालुक्यांना होतो.

उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मोहोळ, मंगळवेढा, सांगोला या भागांत पाण्याची स्थिती चिंताजनक आहे. सोलापूर जिल्ह्यात मुख्य हंगाम रबीचा असला, तरी गेल्या काही वर्षांपासून खरिपातील पेरण्यांचे प्रमाण वाढले आहे. त्यातील मूग, मटकी, उडदाच्या पेरण्या पावसाअभावी पूर्ण वाया गेल्या असून, सध्या शिवारात सोयाबीन आणि तूर हीच पिके आहेत. पावसाने ताण दिल्यामुळे ती पिकेही करपून चालली आहेत. जिल्ह्यातील पंढरपूर, माढा, माळशिरस, करमाळा, बार्शी आदी भागांत उसावर हुमणीचा प्रादुर्भाव वाढल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.  

मराठवाड्यात जुलै ते सप्टेंबरदरम्यान पावसाचे दोन दीर्घ खंड आणि परतीच्या पावसाची धुसर होत चाललेली आशा, यामुळे सोयाबीन, कापूस, मका ही पिके वाळून चालली आहेत. सोयाबीन पिवळे पडून पानगळ होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर, कापसाच्या बाबतीत पातेगळ, फुलगळ, अपरिपक्व बोंड उन्हामुळे तडकणे, असे नुकसान होत आहे. खरिपातील पिके हातचे जाण्याची वेळ ओढवली असून, पावसाअभावी रबी हंगामातील पेरण्या साधतील की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.    

विदर्भात अमरावती विभागात २२ ऑगस्टनंतर दमदार पाऊस झालेला नसल्यामुळे सोयाबीन, कापूस या पिकांना मोठा फटका बसला आहे. बुलडाणा, अमरावती जिल्ह्यात सर्वांत कमी पाऊस झाला आहे. बुलडाण्यात मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या सिंदखेडराजा, देऊळगावराजा, सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर, शेगाव, खामगाव तालुक्यांमध्ये यंदाच्या हंगामात पावसाचे प्रमाण सुरुवातीपासूनच कमी राहिले आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, भातकुली या तालुक्यांत ७० टक्के सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

विदर्भातील संत्र्याच्या बागांनाही पावसाच्या खंडाचा तडाखा बसला आहे. अमरावती जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com