मराठवाड्यात खरिपाची ४३ लाख ९२ हजार हेक्‍टरवर पेरणी

मराठवाड्यात खरिपाची ४३ लाख ९२ हजार हेक्‍टरवर पेरणी
मराठवाड्यात खरिपाची ४३ लाख ९२ हजार हेक्‍टरवर पेरणी

औरंगाबाद  : मराठवाड्यातील कपाशी पिकावर अनेक ठिकाणी बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. पावसाने ओढ दिल्याने मराठवाड्यातील खरिपाची स्थिती दोलायमान झाली आहे. पिके माना टाकायला लागली असून, पावसाअभावी मुख्य पिकांच्या पेरणीचा कालावधी हातचा गेल्याने, तसेच पर्यायी पिकांसाठीही पाऊसच नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. यंदा मराठवाड्यात ऊस वगळता ४६ लाख ७२ हजार २१२ हेक्‍टरवर खरिपाची पेरणी अपेक्षित होती. प्रत्यक्षात गुरुवारअखेर (ता. २) उसाचे क्षेत्र वगळता ९४ टक्‍के क्षेत्रावर अर्थात ४३ लाख ९२ हजार ७७३ हेक्‍टरवर पेरणी झाल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  

मराठवाड्यात सोयाबीन वगळता एकाही पिकाची अपेक्षित पेरणी वा लागवड झाली नाही. शिवाय पावसाच्या खंडामुळे बहुतांश ठिकाणी खरिपाची पिके हातची जातात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सोयाबीननंतर सर्वाधिक क्षेत्रावर लागवड झालेल्या कपाशी पिकात बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळून आला असून, समाधानकारक वाढ न होणे किंवा किडींच्या प्रादुर्भावाने ग्रासलेलीच पिकं मराठवाड्यात सर्वदूर पाहायला मिळत आहेत. वाढ, फूल, कळ्या अवस्थेतील सर्वच पिकांना दमदार पावसाची आवश्‍यकता सध्या आहे.

३० जुलैपर्यंत मराठवाड्यात सरासरी पावसाच्या तुलनेत ८६ टक्‍के पाऊस झाला. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्‍यातील लोणी खुर्द मंडळात नायगव्हाण, शिवूर मंडळात विरोळा, वळण, कविटखेडा आदी गावावंर दुबार  पेरणीचे संकट आहे. गंगापूर तालुक्‍यातील शेंदूरवादा, भेंडा, सिद्धनाथ वडगाव व मांजरी तसेच फुलंब्री तालुक्‍यातील लोहगाव, विहामांडवा, बिडकीन, व ढोरकीन महसूल मंडळात काही गावांमध्ये पावसाअभावी पेरणी पूर्ण झालीच नाही. बीड जिल्ह्यात १८ जुलैपासून पावसाने दडी मारल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.

मका पिकावर खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात हा प्रादुर्भाव प्रकर्षाने जाणवला आहे. शाखीय वाढीच्या अवस्थेतील कपाशी पिकावर रसशोषक किडीसह गुलाबी बोंड अळीचे पतंग व अळी आढळून आली आहे. पावसाच्या खंडाचा परिणाम कपाशीच्या वाढीवर झाला आहे. वाढीच्या अवस्थेतील तुरीच्या पिकाला पावसाची नितांत आवश्‍यकता आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात पावसाचा खंड पडल्याने औरंगाबाद जिल्ह्यात मूग पिकाची वाढ समाधानकारक झालेली नाही. उडीद पिकाचीही वाढ समाधानकारक नाही. औरंगाबाद जिल्ह्यात पिकांची अवस्था बिकट आहे. सोयाबीनवर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. वाढीच्या अवस्थेतेतील बाजरी पिकाची वाढ खुंटली आहे.  

खरीप पिकनिहाय पेरणी स्थिती (क्षेत्र हेक्‍टरमध्ये)
पीक    क्षेत्र
भात ४०३४
ज्वारी  १,०८,१५३
मका १,००,००३
तूर ४,३१,६७५
मूग  १,६१,३४७
उडीद १,४४,८१९
भुईमूग १३,७८७
तीळ  ६११४
कारळ  २०७३
सूर्यफूल  २७६७
सोयाबीन  १७,४९,७६५
कपाशी १४,२५,१४९
इतर तृणधाण्य    ४७७६
इतर कडधान्य ३३३४
इतर गळीतधान्य २४१५

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com