ताज्या घडामोडी
ऑनलाइन सातबारा मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. खरिपाच्या तोंडावर बॅंका आणि सरकारी कामासाठी सातबारा उताऱ्याची नितांत गरज पडत आहे. एकतर डिजिटल सातबारे देण्याचे काम तातडीने सुरू करावेत किंवा जुन्या पद्धताने सध्या तरी सातबारा उतारे द्यावेत.
- प्रमोद तांबे, शेतकरी, बोधेगाव, ता. शेवगाव,जि.नगर.
नगर ः सातबारा देण्यासाठी ऑनलाइन सर्व्हर बंद असल्याने नगर जिल्ह्यात दहा दिवसांपासून सातबारा उतारा मिळेनासा झाला आहे. खरिपाच्या तोंडावर सातबारा उतारा मिळेनासा झाल्याने शेतकरी त्रस्त आहेत.
दरम्यान, मंगळवारपासून (ता. ५) जमाबंदी आयुक्ताच्या आदेशाने पारंपरिक पद्धतीने सातबारा उतारा देण्याला सुरवात केली असल्याची माहिती कुळकायदा विभागाचे तहसीलदार एफ. आर. शेख यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यामध्ये एकून १२ लाख सातबारा आहेत. सर्व सातबारा उताऱ्यांचे संगणकीकरण झाले असले, तरी ५ लाख सातबारा उतारे डीजिटल सहीने दिले जातात. गेल्या दहा दिवसांपासून त्याबाबतचे सर्व्हर बंद पडल्यामुळे सातबारा उतारा वितरण थांबले आहे. राज्यात बहुतेक सर्व गावांमधील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यामधील दुरुस्तीची कामे पूर्ण करून संगणकीय सातबारा उतारे तयार केले गेले आहेत. सातबारा उतारा मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत.
कृषी विभागाच्या अनेक योजनांच्या लाभासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, याशिवाय खरीप हंगामाच्या तोंडावर आला असल्याने कर्जासह अन्य बाबींसाठी सातबारा उतारा आवश्यक असताना तो मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या तलाठी कार्यालयात चकरा सुरू आहेत. मंगळवारी जमाबंदी आयुक्तांनी पारंपरिक पद्धतीने सातबारा उतारा देण्याबाबत आदेश काढले आहेत. त्यानुसार सातबारा उतारा वितरणाला सुरवात होईल असे शेख म्हणाले.
दरम्यान सातबारा उताऱ्यासाठी नियमापेक्षा जास्ती पैसे शेतकऱ्यांकडून वसूल केले जातात, असा आरोप होत आहे. शेख म्हणाले, की सातबारा उताऱ्यासाठी साधारण पंधरा रुपये शुल्क आहे. तेवढेच पैसे शेतकऱ्यांकडून तलाठ्यांनी घेणे अपेक्षित आहे. त्यापेक्षा जास्ती पैसे घेतले तर प्रशासनाकडे तक्रार करावी. तलाठ्यांनीही कोणत्याही शेतकऱ्यांकडून नियमापेक्षा जास्ती पैसे घेऊ नयेत, असे त्यांनी सांगितले.
- 1 of 347
- ››