माण, कराड, खंडाळा, फलटण तालुक्‍यांत सामू वाढला

माण, कराड, खंडाळा, फलटण तालुक्‍यांत सामू वाढला अाहे. या तालुक्‍यातील जमिनीतून पाण्याचा निचरा होण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्‍यक आहे. सेंद्रिय खताचा वापर वाढवावा. शेतकऱ्यांनी जमीन सुपीक राहण्यासाठी माती तपासणी अहवालानुसार रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्यात. - राजेंद्र पवार, जिल्हा मृद चाचणी अधिकारी, सातारा.
जमीन आरोग्यपत्रिका
जमीन आरोग्यपत्रिका

सातारा ः पाणी व रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे माण, कराड, खंडाळा, फलटण या तालुक्‍यांतील जमिनी किंचित विम्लधर्मीय होण्याच्या मार्गावर आहेत. सातारा व पाटण तालुक्‍यांत नत्र व स्फुरदची कमतरता माती-पाणी परीक्षण अहवालात मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे. यामुळे या तालुक्‍यात पिकांच्या उत्पादनात घट होत आहे.

जिल्ह्यातील कृषी विभागाकडील प्रयोगशाळेत एक हजार दहा गावांतील ७२ हजार ११४ माती नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. माण, कराड, खंडाळा, फलटण तालुक्‍यांत मातीचा सामू किंचित विम्लधर्मीय दिसत असल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण होणार आहे. यात माणमध्ये ९६.७१, कऱ्हाडमध्ये ७४.४१, खंडाळामध्ये ९५.१३, फलटण ८६.६८ टक्के नमुन्यांमध्ये किंचित विम्लधर्मीय सामूत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
 
जमीन व पिकांचे नियोजन करताना सामू महत्त्वाचा असतो. जमीन आम्लधर्मी, अल्कधर्मी अथवा उदासीन असल्याची कल्पना सामूवरून येते. त्यानुसार आपल्या जमिनीत कोणती पिके व्यवस्थित येऊ शकतील याचा अंदाज बांधणे शक्‍य होते. त्यानुसार पिकांचे व्यवस्थापन केले, तर अपेक्षित उत्पादन मिळण्यास अडचण येत नाही. सेंद्रिय खतांचे विघटन, रासायनिक खताचे विघटन, हवेतील नत्राचे स्थिरीकरण इत्यादी प्रक्रिया या जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ या दरम्यान असतानाच व्यवस्थित होतात, म्हणूनच जमिनीचा सामू उदासीन राखणे गरजेचे असते. 
 
सातारा तालुक्‍यातील ८१४१ नमुन्यांच्या तपासणीत नत्र व स्फुरदची उपलब्धतता कमी, तर पालाश उलब्धतता मध्यम प्रमाणात असल्याचे स्पष्ट झाले. पाटण तालुक्‍यात ६४४४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यातून नत्राचे प्रमाण कमी, स्फुरदचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र पालाशचे प्रमाण या तालुक्‍यात भरपूर आहे.
 
कोरेगाव, खटाव, कराड, वाई, जावली, खंडाळा, फलटण, माण या तालुक्‍यांत मध्यम ते भरपूर प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध असल्याचे अहवालावरून दिसत आहे. एकूण जिल्ह्याचे चित्र पाहता नत्र मध्यम, स्फुरद साधारण ते जास्त व पालाश भरपूर प्रमाणात असल्याचे अहवालातून स्पष्ट होते. जिल्ह्यात ९९.११ टक्के क्षेत्र सर्वसाधारण, ०.७६ टक्के उगवणीस हानीकारक, ०.११ टक्के क्षार संवेदनशील, ०.०२ टक्के नुकसानकारक आहेत. यावरून जिल्ह्यातील जमिनी क्षारपड होण्याचा धोका सध्यातरी कमी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com