जळगाव जिल्हा परिषदेत सौरऊर्जा यंत्रणेची देखभाल दुरुस्ती ठप्प

सौर उर्जा पॅनेल
सौर उर्जा पॅनेल

जळगाव : जिल्हा परिषदेतील सौरऊर्जा यंत्रणा दुरुस्ती व देखभालीसाठी संबंधित कंपनीचा कालावधी संपल्याने या यंत्रणेची देखभाल थांबली आहे. अशातच सध्या भारनियमनामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील दोन्ही इमारतींमध्ये भारनियमनाचा फटका बसत असल्याने नवीन जनित्र घेतले जावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी केली आहे.

महिनाभरापासून जिल्हा परिषदेच्या कामकाजाला दुपारच्या वेळी होणाऱ्या भारनियमनाचा फटका बसतो. दुपारी दोन ते चार यादरम्यान अनेकदा वीजपुरवठा बंद असतो. जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या छतावर ८२ लाख रुपये खर्चून सौरऊर्जा यंत्रणा बसविली आहे. या यंत्रणेद्वारे जुन्या इमारतीमधील बाल कल्याण, समाज कल्याण व कृषी सभापतींचे दालन आणि पशुसंवर्धन, कृषी, शिक्षण, वित्त, समाज कल्याण विभागातील विभाग प्रमुखांची दालने, काही प्रमुख कर्मचाऱ्यांचे संगणक यासाठी वीजपुरवठा केला जातो.

पण या यंत्रणेच्या देखभाल, दुरुस्तीसंबंधीचे संबंधित कंपनीकडील कंत्राट संपुष्टात आले आहे. अशातच या यंत्रणेच्या बॅटरी दुरुस्तीचे काम रखडले होते; परंतु कृषी विभागाने विनंती केल्यानंतर संबंधित कंपनीच्या तज्ज्ञांनी किरकोळ दुरुस्ती व बॅटरीचे काम केले. यामुळे वीजपुरवठा काहीसा सुरळीत झाला; पण भारनियमन सुरू असताना सर्वच संगणक, दिवे सौरऊर्जा यंत्रणेवर कार्यरत होत नाहीत.

जिल्हा परिषदेतील जुन्या व नवीन इमारतीमध्ये कामकाजाला भारनियमनाचा फटका बसत असल्याने नवे जनित्र घेतले जावे, अशी मागणी जिल्हा परिषदेतील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी प्रशासनाकडे केली आहे. नवीन इमारतीमध्ये जुने जनित्र आहे. ते व्यवस्थित कार्यरत होत नाही; परंतु प्रशासनाने मात्र सौरऊर्जा यंत्रणा असताना पुन्हा जनित्रावर खर्च कशाला, असा मुद्दा मांडला आहे. सौरऊर्जा यंत्रणेचे पॅनल, बॅटरी यांची देखभाल, दुरुस्ती यासाठी कर्मचारी नियुक्त करावा, अशा सूचना जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने कृषी विभागाला दिल्या आहेत; परंतु तसा तज्ज्ञ कर्मचारी कृषी विभागात नसल्याने या कामासाठी आता मानधन तत्त्वावर कर्मचारी नियुक्त करण्याची तयारी कृषी विभाग करीत असल्याची माहिती मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com