सातारा जिल्ह्यात स्ट्राॅबेरीचे क्षेत्र घटले

परतीच्या पावसामुळे स्ट्रॉबेरी पिकावर परिणाम झाला आहे. लागवड झालेल्या स्ट्रॉबेरी पिकांची मर झाल्याने अर्थिक गुंतवणूक करुनही शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागला आहे. - गणपत भिलारे, अध्यक्ष, श्रीराम फळप्रक्रिया सहकारी संस्था, भिलार.
स्ट्राॅबेरी लागवड
स्ट्राॅबेरी लागवड
सातारा ः स्ट्रॉबेरी लागवडीच्या कालावधीत परतीच्या पावसाने थैमान घातल्याने पिकावरही परिणाम झाला आहे. महाबळेश्वरसह, वाई, जावली, कोरेगाव तालुक्‍यातील स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात एक हजार एकराने घट झाली आहे. तसेच लागवड झालेल्या स्ट्रॉबेरी पिकात पाणी साचल्याने जवळपास २० टक्के रोपांची मर झाली आहे. यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही स्ट्रॉबेरीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार असून, दर तेजीत राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.   
राज्यात महाबळेश्वर तालुक्‍यात सर्वाधिक तीन हजार एकर, तर वाई, जावली, कोरेगाव या तीन तालुक्‍यात सुमारे दीड हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. सातारा, खटाव, पाटण तालुक्‍यातही काही प्रमाणात स्ट्रॉबेरीची लागवड होते. स्ट्रॉबेरी लागवडीसाठी परदेशातून मातृरोपे आणली जातात. हरितगृहात या मातृरोपांद्वारे शेतात लागवडीसाठीच्या रोपांची निर्मिती केली जाते. या हंगामात स्ट्रॉबेरीची मातृरोपे वेळेत आल्याने लागवडीसाठीची रोपे वेळेत तयार झाली होती.
सप्टेंबर माहिन्यात लागवडीस प्रारंभ झाला होता. लागवडीच्या काळामध्ये महाबळेश्वरसह जिल्ह्यात सर्वत्र परतीच्या पावसाने थैमान घातले. यामुळे काही कालावधीसाठी स्ट्रॉबेरी लागवड ठप्प झाली. यानंतर पावसाने उघडीप दिल्यावर शेतात वाफसा येईल तसतशी लागवड होत राहिली. 
जिल्ह्यातील स्ट्रॉबेरीची लागवड अंतिम टप्प्यात आली असून, जवळपास पाच ते दहा टक्के लागवड अद्यापही बाकी आहे. महाबळेश्वर तालुक्‍यात सर्वसाधारण तीन हजार एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरी केली जाते. यंदा मात्र सुमारे २२०० ते २५०० एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड झाली आहे. त्यामुळे महाबळेश्वर तालुक्‍यातील लागवड क्षेत्र पाचशे एकरने घटले आहे. वाई, जावली, कोरेगाव या तीन तालुक्‍यांत १५०० एकर क्षेत्रावर लागवड होते; मात्र यंदा या तालुक्‍यांत १००० एकर क्षेत्रावर लागवड झाली आहे. याचा उत्पादनावर परिणाम होणार असून, जवळपास २० ते २५ टक्के घट होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

परतीच्या पावसामुळे लागवड झालेल्या स्ट्रॉबेरीत पाणी साचल्याने २० टक्केच्या दरम्यान स्ट्रॉबेरीची मर झाली आहे. परिणामी एकूण उत्पादनात घट होण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. परतीच्या पावसामुळे स्ट्रॉबेरी हंगामाचे दोन टप्प झाले आहेत. सध्या स्ट्रॉबेरी लागवड सुरू असताना स्ट्रॉबेरीची तोडणीही सुरू आहे. डिसेंबर, जानेवारी महिन्यात स्ट्रॉबेरी प्रमुख बहर बाजारात येणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

स्ट्रॉबेरीची उशिरा झालेली लागवड आणि यंदा दिवाळीचा सण लवकर असल्याने ऐन हंगामात स्ट्रॉबेरी उपलब्ध झाली नाही. दिवाळी सणादरम्यान पर्यटकांकडून मिळणाऱ्या चांगल्या म्हणजेच ४०० ते ५०० रुपये किलो दरापासून वंचित राहावे लागले आहे. याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.
 
स्ट्रॉबेरीच्या क्षेत्रात झालेली घट व लागवड झालेल्या क्षेत्राचे पावसाने नुकसान झाल्याने या वर्षी उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे. मागीलवर्षीप्रमाणे याही वर्षी मिळणाऱ्या उत्पादनास चांगला दर मिळण्याची अाशा शेतकऱ्यांना आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com