पर्यावरण संवर्धन, ग्राम पर्यटनाला चालना

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासवर्ग
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अभ्यासवर्ग

पर्यावरण संवर्धन, अभ्यासाच्या बरोबरीने ‘मलबार नेचर कॉन्झर्व्हेशन क्लब` या स्वयंसेवी संस्थेतर्फे आंबोली (जि. सिंधुदुर्ग) गावपरिसरात ग्रामस्थ आणि विद्यार्थांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबविले जातात. यातून ग्रामपर्यटन, जैवविविधता संरक्षणाला चालना मिळाली आहे. पर्यावरण, जैविविधता संरक्षण, शिक्षण आणि ग्रामविकासामध्ये मलबार नेचर कॉन्झर्व्हेशन क्लब ही संस्था अांबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे कार्यरत आहे. संस्थेचे अध्यक्ष महादेव भिसे आणि उपाध्यक्षा साईली पलांडे-दातार आहेत. संस्था राज्यातील विविध शहरांतील स्वयंसेवी संस्थांच्या बरोबरीने उपक्रम राबविते. संस्थेतर्फे अांबोली दशक्रोशीमध्ये ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामविकास आणि शिक्षणाबाबत नियोजन केले जाते. 

उपक्रमाबाबत साईली पलांडे-दातार म्हणाल्या की, आम्ही तज्ज्ञांसोबत आंबोली भागातील जैविविधतेचा अभ्यास करण्यास सुरवात केली. यामध्ये स्थानिक लोकांचाही चांगला सहभाग मिळाला. यामध्ये असे लक्षात आले की, परिसरातील वनस्पती, पशू-पक्षांमध्ये विविधता आहे. याचे संवर्धन, संरक्षण आणि संशोधन करण्यासाठी स्थानिक लोक आणि पर्यावरणप्रेमी, संशोधकांच्या मदतीने आम्ही अभ्यास गट तयार केला. यातून २००६ साली ‘मलबार नेचर कॉन्झर्व्हेशन क्लब` या संस्थेची स्थापना केली. पहिल्यांदा स्थानिक लोकांच्यामध्ये परिसरातील जैविविधतेची शास्त्रीय पद्धतीने माहिती होण्यासाठी आंबोलीमध्ये विविध तज्ज्ञांची व्याखाने आयोजित केली. या उपक्रमास संशोधक आणि स्थानिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. आंबोली हे पर्यटन क्षेत्र म्हणून पुढे येत आहे. हा विकास होत असताना पर्यावरणाला धोका पोचू नये, लोकांच्यामध्ये जनजागृती व्हावी, हा उपक्रम राबविण्यामागचा उद्देश आहे. कोकणातदेखील कास पठारासारखे सडे आहेत, त्यांच्या संवर्धनासाठी संस्था काम करते. 

विद्यार्थ्यांच्‍या बरोबरीने उपक्रम   उपक्रमांना व्यापक रूप येण्यासाठी संस्थेने आंबोली गावातील शालेय विद्यार्थांच्याबरोबरीने कार्यक्रमांची आखणी केली. स्थानिक मुलांच्यामध्ये परिसरातील पर्यावरण संरक्षणाबाबत जागृती केल्याने टप्प्याटप्प्याने या भागातील जंगल, वनस्पती, पशू, पक्षी यांचे चांगल्या प्रकारे संवर्धन करण्यास मदत मिळू लागली. विद्यार्थ्यांसाठी दर दोन महिन्यांनी दोन दिवसांची कार्यशाळा घेण्यात येते. संस्थेने विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण आणि तांत्रिक माहिती देण्यासाठी खास खेळ आणि सोप्या पद्धतीने शास्त्रीय माहिती देण्यासाठी मॉडेल्स तयार केली आहेत. आंबोली परिसरात रॅको (रॅकोपोरस मल्बारिकस) हा बेडूक आढळतो. हा जैवविविधतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्याचे संवर्धन होणे गरजेचे असल्याने संस्थेने या बेडकाला अंबोली परिसराचे मानचिन्ह  म्हणून निवडले. परिसरातील वनस्पती, पर्यावरणाच्या दृष्टीने स्वच्छ पाणी, पशू, पक्षी, प्राण्याचे महत्त्व कसे आहे हे विद्यार्थ्यांना गोष्टीरूपात सांगण्याचा संस्थेचा प्रयत्न असतो. संस्थेतर्फे दरवर्षी विद्यार्थ्यांना प्रकल्प करायला दिले जातात. यामध्ये शेतीमधील पीक पद्धती, जंगलातील रानमेवा, पशु-पक्षांचा अधिवास असे विषय असतात. या उपक्रमातून विद्यार्थांच्या माध्यमातून पारंपरिक ज्ञानाची माहिती संस्थेकडे जमा होत गेली. प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी परिसराचा नकाशा तयार केला. यामध्ये घरांची रचना, रस्ते, पिके, परसबाग त्याचबरोबरीने परिसरातील वनस्पती, पशू-पक्षांच्या नोंदी झाल्या. यातून पुढे गावाचा शाश्‍वत विकास तसेच पर्यावरण संवर्धनाचा आराखडा विद्यार्थांनी तयार केला.

ग्रामीण भागातील गरजू आणि शिक्षणाची आवड असणाऱ्या मुला, मुलींना संस्थेतर्फे शिक्षणासाठी मदत तसेच नवीन अभ्यासक्रमांची ओळख करून दिली जाते. पालकांना मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व समजाऊन सांगितल्यामुळे गावातील काही मुली दहावीनंतर पुणे येथे येऊन शिकल्या, काही पदवीधर झाल्या आहेत. 

आंतरराष्ट्रीय उपक्रमात सहभाग  आंबोली येथील एका शाळेत चार वर्षांपूर्वी बीएचएनएसच्या मदतीने संस्थेने आंतरराष्ट्रीय संस्थेचा उपक्रम राबविला होता. या उपक्रमासाठी भारतातील दोन शाळा निवडलेल्या होत्या. त्यात आंबोलीमधील शाळा होती. या उपक्रमामध्ये संस्थेने परिसरातील जैवविविधता आणि पशूपक्षांच्या नोंदी घेण्यासाठी विविध ठिकाणी कॅमेरा लावले होते. यात नोंद झालेली माहिती संस्थेने अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना विद्यापिठात पाठविली. या शाळेतील सहावीच्या विद्यार्थ्याने नॉर्थ कॅरोलना विद्यापीठात जाऊन आंबोली परिसरात आढळणाऱ्या पिसोरी तसेच जैवविविधतेचे महत्त्व सांगितले. या उपक्रमात आंबोली परिसरातील जंगली कुत्री, पाणमांजर, मुंगूस, साप, गवे, बिबट्या, अस्वलांची नोंद झाली. या उपक्रमातून मुलांना परिसरातील पशुपक्षांची जैवविविधता समजली. अजूनही हे काम सुरू आहे.

वाचनालयाची सुरवात  संस्थेने आंबोली येथील कार्यालयात वाचनालय सुरू केले. येथे विद्यार्थ्यांना निशुल्क पुस्तके वाचण्यासाठी दिली जातात. वाचनालयात पर्यावरण, निसर्ग, गोष्टी, विज्ञान विषयक पुस्तके आहेत. शैक्षणिक तसेच पर्यावरण विषयक खेळ आहेत. विविध राज्यातील पर्यावरण विषयक माहितीची पुस्तके येथे वाचावयास मिळतात. 

स्वच्छतेबाबत जागृती ग्रामपंचायत आणि वनविभागाच्या सहकार्याने संस्थेने पर्यटनासाठी आराखडा तयार केला. पर्यटन माहिती केंद्राची उभारणी केली. या माध्यमातून पर्यटकांना आंबोली परिसरातील पर्यावरण, शेती, पर्यटनाबाबतची माहिती दिली जाते. आंबोली ग्रामस्थांच्या सहकार्याने कचरा निर्मूलन तसेच देवराई संवर्धनासाठी उपक्रम राबविला जातो. 

फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन    संस्थेने अॉक्टोबर, २०१६ मध्ये आंबोली येथे द्वितीय राज्यस्तरीय फुलपाखरू महोत्सव आयोजित केला होता. यामध्ये दोनशेहून अधिक अभ्यासक, ग्रामस्थ, विद्यार्थी सहभागी झाले होते. या परिसरातील पारपोली गावात राज्यातील सर्वात जास्त फुलपाखरे दिसतात. या गाव परिसरात सुमारे २४० फुलपाखरांच्या प्रजाती दिसतात. त्याच्या शास्त्रीय नोंदी संस्थेने केल्या आहेत. गाव परिसरात फुलपाखरांचे संवर्धन गावकऱ्यांच्या मदतीने होत आहे. याठिकाणी फुलपाखरांना उपयुक्त अशा वनस्पतींच्या लागवडीवर भर दिला आहे. या गावाला संस्थेने ‘फुलपाखराचे गाव` असे नाव दिले.

ग्राम पर्यटनाला सुरवात 

ग्राम पर्यटनाला सुरवात पर्यटनाबाबत साईली पलांडे-दातार म्हणाल्या की, आंबोली हा निसर्गरम्य परिसर आहे. या भागातील शेतीला ग्राम पर्यटनाची जोड देण्याचा संस्थेचा प्रयत्न आहे. संस्थेतर्फे भात, नागली, वरईच्या स्थानिक जाती तसेच औषधी वनस्पतींची नोंद घेण्यात येते. पीक जाती, औषधी वनस्पतींच्या संवर्धनसाठी संस्था प्रयत्नशील आहे. पंचक्रोशीतील महिला बचत गटांनी तयार केलेल्या पदार्थांना पर्यटनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. संस्थेने आंबोली गावातील बारा मुलांना गाईड म्हणून प्रशिक्षित केले. ते पर्यटकांना मार्गदर्शन करतात. यामुळे मुलांना रोजगार मिळाला. वनविभाग आणि गावातील जैवविधता समितीची साथ या उपक्रमांना मिळते. आंबोली परिसरातील ग्रामस्थांच्याकडून पारंपरिक गोष्टी, चालीरितींची माहिती, परिसरातील देवराया, तसेच विविध अभ्यासकांनी परिसरातील पशू-पक्षी, साप, बेडूक, वनस्पती, फुले, बुरशी, वन्य प्राण्यांच्या केलेल्या शास्त्रीय नोंदी संस्थेकडे जमा होत आहेत. संस्थेने परिसराचे शास्त्रीय तसेच पशुपक्षांच्या आधिवासाचे नकाशे तयार केले. आंबोली परिसरातील दहा गावांच्यामध्ये संस्थेने पीबीआर नोंदणीचा उपक्रम राबविला. आंबोली तसेच परिसरातील चौकुळ आणि गेळे ही गावे कृषी आणि पर्यावरण पर्यटनासाठी पुढे आली आहेत. चौकुळ, आंबोलीतील दहा घरांच्यामध्ये पर्यटकांना रहाण्याची सोय आहे. या कुटुंबांना संस्थेने पर्यटकांच्याबरोबरीने कसे वागायचे, बोलायचे याचे प्रशिक्षण दिले. पर्यटकांना घरगुती जेवण, शेती कामात सहभाग, परिसरातील देवळे, देवराईंची माहिती देणे, लोककला, धनगरी नृत्य, होळीचे नृत्य असे उपक्रम राबविले जाते.

संस्थेचा गौरव  संस्थेचे सदस्य हेमंत ओगले यांनी पश्‍चिम घाटातील फुलपाखरांची शास्त्रीय नोंदी असलेले पुस्तक लिहिले आहे. पर्यावरण संवर्धन उपक्रमाबद्दल राज्यस्तरीय ‘वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन ॲवॉर्ड` आणि किर्लोस्कर वसुंधरा मित्र पुरस्काराने संस्थेला गौरविण्यात आले आहे.

- साईली पलांडे-दातार ः ९८८१००९८२६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com