पीक नियोजन, पशुपालनातून शेती केली फायद्याची

चांदखेड (जि.पुणे) ः  भातशेतीमध्ये रमलेल्या रूपाली गायकवाड.
चांदखेड (जि.पुणे) ः भातशेतीमध्ये रमलेल्या रूपाली गायकवाड.

चांदखेड (ता. मावळ, जि. पुणे) येथील रूपाली नितीन गायकवाड यांनी वर्षभर पीक पद्धतीचे नियोजन करून भात, ऊस शेतीच्या बरोबरीने बाजारपेठेची मागणी लक्षात घेत भेंडी, पालेभाज्यांच्या लागवडीवर भर दिला आहे. शेतीला पशुपालनाची जोड दिली. येत्या काळात महिला बचत गटाच्या माध्यमातून शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री करण्याचा त्यांनी आराखडा तयार केला आहे.

चां दखेड येथील रूपाली नितीन गायकवाड यांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. गायकवाड कुटुंबाची साडे तेरा एकर शेती आहे. दरवर्षी हंगामानुसार भात, ऊस, भुईमुगाची लागवड असते. नऊ वर्षांपूर्वी रूपालीताईंचे पती नितीन यांचा अपघात झाल्यामुळे शेतीमध्ये जड कामे करण्यास मर्यादा येऊ लागल्या. त्यामुळे शेतीच्या व्यवस्थापनाची जबाबदारी रूपालीताईंकडे आली.       माहेरी आईच्या साथीने रूपालीताईंनी शेतीचे धडे गिरविले असल्याने पीक नियोजन करण्यात फारश्‍या अडचणी आल्या नाहीत. शेती मशागतीसाठी रूपालीताई पतीच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅक्टर शिकल्या. पारंपरिक भात शेतीतून कमी उत्पन्न मिळत असल्याने त्यांच्यासमोर आर्थिक अडचणी आल्या. मग त्यांनी पतीच्या मार्गदर्शनानुसार बाजारपेठ आणि शेती नियोजनाचा अभ्यास करत हंगामनिहाय पिकांचे नियोजन केले. जमीन सुपीकता वाढ आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी रूपालीताईंनी सेंद्रिय पद्धतीने पीक व्यवस्थापनावर भर दिला. आर्थिक बचत करत पाच वर्षांपूर्वी दुग्ध व्यवसायाला सुरवात केली. हंगामनिहाय पीकपद्धती आणि पूरक उद्योगामुळे त्यांनी कुटूंबाची आर्थिक घडी चांगली बसविली. अडीच एकर शेती ठिबक सिंचनाखाली आणली. स्वतःच्या शेती सुधारणेबरोबरीने रूपालीताई गावातील महिला शेतकऱ्यांनादेखील मार्गदर्शन करतात. शेतीमधील प्रगतीची दखल घेत कृषी विभागाने रूपालीताईंना उत्कृष्ट शेतकरी म्हणून गौरविले आहे.

भात शेतीचे नियोजन  रूपालीताई चार एकरांवर भाताच्या इंद्रायणी जातीची लागवड करतात. जमिनीची सुपीकता जपण्यासाठी दरवर्षी मे महिन्यात लागवड क्षेत्रामध्ये ताग, धैंचा या हिरवळीच्या पिकांची लागवड करून फुलोऱ्यात येताच चिखलणीच्या वेळी जमिनीत गाडली जातात. चिखलणी झाल्यानंतर भात रोपांची चारसूत्री पद्धतीने लागवड केली जाते.    भात शेतीबाबत रूपालीताई म्हणाल्या की, भात पिकाला रासायनिक खतांच्या एेवजी जीवामृत वापरण्यास सुरवात केली. लागवड क्षेत्र मोठे असल्याने नऊ बॅरलमध्ये टप्प्याटप्प्याने जीवामृत तयार केले जाते. दर वीस दिवसांनी भात पिकाला जीवामृताची मात्रा देतो. कीड नियंत्रणासाठी दशपर्णी आणि निंबोळीवर आधारित कीटकनाशकाची गरजेनुसार फवारणी करतो. सेंद्रिय पद्धतीचा जास्तीत जास्त अवलंब केल्याने भाताचे पीक जोमदार येते. मला एकरी ४० क्विंटल उत्पादन मिळते. व्यापाऱ्यांना भात विक्री न करता तांदूळ तयार करते.  पुणे, पिंपरी चिंचवड परिसरात थेट ग्राहकांना ५५ रुपये किलो दराने तांदळाची विक्री केल्याने अपेक्षित नफा मिळतो. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी कृषी विभाग, आत्मा विभाग, कृषी संशोधन केंद्र, वडगाव मावळ येथील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळत असते.

उसामध्ये आंतरपिके  रूपालीताई दोन एकरांमध्ये सुरू हंगामात पट्टा पद्धतीने उसाच्या को-८६०३२ जातीची लागवड करतात. उसाला जास्तीत जास्त शेणखत, गांडूळखत, जीवामृताचा वापर केला जातो. लागवडीच्या पट्यामध्ये शेपू, कोथिंबीर, पालक, चाकवत, मेथी, राजगिरा, आंबटचुका, करडई, चवळी, तांदुळजा, या भाजीपाला पिकांची लागवड केली जाते. खोडवा उसातही विविध पालेभाज्यांची लागवड केली जाते. उसाला ठिबक सिंचन केले आहे. आंतर पिकातून ऊस व्यवस्थापनचा खर्च निघतो. एकरी ७० टन ऊस उत्पादन मिळते. 

भेंडी ठरली फायदेशीर  रूपालीताई दरवर्षी वीस गुंठे क्षेत्रावर भेंडी लागवड करतात. फेब्रुवारीमध्ये गादीवाफ्यावर भेंडी लागवड केली जाते. भेंडीला ठिबक सिंचन केले आहे. कीड नियंत्रणासाठी दशपर्णी अर्क, निंबोळी अर्काचा वापर केला जातो. साधारणपणे जूनपर्यंत भेंडीची तोडे चालतात. एका तोड्यात ८० ते १०० किलो उत्पादन मिळते. हिंजवडी, पिंपरी शहरातील सोसायटीमध्ये थेट ग्राहकांना ४० रुपये किलो दराने विक्री केली जाते. खर्च वजा जाता या पिकातून चांगला नफा मिळतो. 

गटातील महिलांना मार्गदर्शन  रूपालीताईंनी तीन महिन्यांपूर्वी गावातील सतरा महिलांचा करंजाई माता शेतकरी महिला बचत गट तयार केला आहे. सध्या गटातील प्रत्येक महिला महिन्याला दोनशे रुपयांची बचत करते. बहुतांश महिलांची शेती असल्याने येत्या काळात गटातर्फे सेंद्रिय पद्धतीने पीक व्यवस्थापन आणि थेट धान्य विक्रीवर भर देण्यात येणार आहे.  

दुग्ध व्यवसायाची जोड  रूपालीताईंनी शेतीला पशुपालनाची जोड दिली आहे. याबाबत त्या म्हणाल्या की, मी पाच वर्षांपासून पशुपालन करत आहे.  माझ्याकडे चार जर्सी आणि दोन गीर गाई आहेत. सध्या दोन जर्सी आणि दोन गीर गाई दुधामध्ये आहेत. गाईंना पशुतज्ज्ञांकडून शिफारशीनुसार लसीकरण केले जाते. दररोज पुरेसा हिरवा आणि कोरडा चारा तसेच गहू भरडा दिला जातो. शेतात चाऱ्यासाठी मका पिकाची लागवड केली आहे. प्रतिदिन दोन गीर गाईंचे १२ लिटर आणि दोन जर्सी गाईंचे २३ लिटर दूध मिळते. परिसरातील ग्राहकांना गीर गाईचे ५० रुपये आणि जर्सी गाईचे ३० रुपये प्रति लिटर दराने विक्री केली जाते. उन्हाळ्यात दह्याची विक्री केली जाते. त्यामुळे बऱ्यापैकी उत्पन्नात वाढ होण्यास मदत झाली.

गोवऱ्यांची निर्मिती  रूपालीताईंकडे दोन गीर गाई आहेत.  या गाईंच्या शेणापासून एप्रिल, मे महिन्यात दिवसाला सरासरी ५०० गोवऱ्या तयार केल्या जातात. त्यांनी बाजारपेठेच्या मागणीनुसार गोवऱ्यांचा आकारात बदल केला आहे. सध्या त्या पाच प्रकारच्या गोवऱ्या बनवितात. लहान गोवऱ्या (बिस्कीट आकार) बनविण्यासाठी त्यांनी साचा तयार केला आहे. पाच लहान गोवऱ्यांचे पाकीट १२ रुपये तर मोठ्या गोवऱ्यांचे पाकीट १५ रुपयांना विकले जाते. श्रावण महिना, गणपती, नवरात्र आणि दिवाळी या काळात पूजा साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदारांच्याकडून गोवऱ्यांना  चांगली मागणी असते.  रोज प्लॅस्टिक कॅनमध्ये गोमूत्र साठवून ठेवले जाते. मागणीनुसार गोमुत्राची पिंपरी चिंचवड, पुण्यातील ग्राहकांना विक्री केली जाते. 

-  रूपाली गायकवाड ः ७५८८२४९६९९  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com