अनेर काठावरच्या शिवारातही जाणवू लागली टंचाई

अनेर काठावरच्या शिवारातही जाणवू लागली टंचाई
अनेर काठावरच्या शिवारातही जाणवू लागली टंचाई

जळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये असलेल्या अनेर नदीकाठावर अनेक वर्षांनंतर या हंगामात टंचाई जाणवू लागली आहे. शिवारात जलसंकट निर्माण होत असल्याने अनेक शेतकरी पूर्वहंगामी कापूस व इतर बागायती पिकांची लागवड टाळत असल्याची स्थिती आहे.  अनेर नदीचा उगम सातपुडा पर्वतात आहे. ही नदी चोपडा, धुळे जिल्ह्यांतील शिरपूर या तालुक्‍यांमधील अनेक गावांची जीवनवाहिनी आहे. अनेरकाठ म्हणजे समृद्ध, मुबलक जलसाठे असलेला भाग मानला जातो. केळी, कापूस, पपई, ऊस व इतर पिकांची उत्तम शेती या भागात असून, काबुली हरभरा उत्पादनासाठी अनेक शेतकरी या भागात अग्रेसर आहेत.  या नदीकाठी चोपडा तालुक्‍यातील गणपूर, गलंगी, वेळोदा, दगडी, मोहिदे, वढोदे, अजंतीसीम, विटनेर, वाळकी आदी गावे आहेत. तर शिरपुरातील तोंदे, तरडी, बभळाज, भावेर, होळनांथे, जापोरे आदी गावांना या नदीचा लाभ होतो. नदीपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या भागात पाण्याची स्थिती बऱ्यापैकी आहे. परंतु, यापेक्षा अधिक लांब अंतरावरील शिवारात कूपनलिकांची जलपातळी खोलवर गेली आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना कूपनलिकांमधील कृषिपंप आणखी खोलवर सोडावे लागले आहेत. १५० ते २०० फूट खोल कूपनलिका या भागात अनेक आहेत.

हिवाळ्यात १५० ते १८० फुटांवर कृषिपंप व्यवस्थित उपसा करीत होते. परंतु, एप्रिलच्या अखेरीस जलपातळी खोल गेली. यामुळे उपसा अखंडित होत नव्हता. काही कृषिपंप दोन ते तीन सेकंद उपसा करीत नव्हते. भूगर्भात पाण्याची पातळी खोल गेल्याने कृषिपंपांना उपसा करण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध होत नव्हते. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कृषिपंप आणखी १० ते २० फूट खाली सोडले आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांना पंप खाली सोडण्याचा व पाइपचा खर्च करावा लागला आहे. केळी, पपई बागा वाचविण्याची धडपड या भागात सुरू आहे. जलपातळी खोल जात असल्याने शेतकरी एस. बी. पाटील, रवींद्र निकम, अजित पाटील आदींनी पुढाकार घेऊन अनेर व इतर नद्यांना आवर्तन सोडण्याची मागणी प्रशासनाला केली होती. त्याची दखल घेतली. या आवर्तनाचा काहीसा दिलासा या भागाला मिळाला आहे. परंतु पुढे जसा पाऊस लांबेल, तसा उपसा वाढेल व जलपातळी आणखी खोल जाईल, अशी माहिती मिळाली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com