गुजरातचा निकाल हा सरकारला इशारा

नागपूर ः गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिठाई भरवून आनंद व्यक्त करताना भाजपचे नेते.
नागपूर ः गुजरात विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिठाई भरवून आनंद व्यक्त करताना भाजपचे नेते.

पुणे : भाजपच्या नाकर्तेपणाचा लाभ उठवण्यात काँग्रेसला अपयश आल्याने त्यांचा पुन्हा विजय झाला आहे. शेतकऱ्यांमधील असंतोष मतदानातून व्यक्त झाल्याने भाजपच्या जागा घटल्या आहेत. गुजरातचा निकाल हा केंद्र आणि राज्य सरकारला इशारा असून, भविष्यात तिसरा भक्कम पर्याय दिला तर भाजपचा पराभव करणे सहज शक्य आहे. हे या निवडणुकीतून सिद्ध झाले आहे, अशा प्रतिक्रिया राज्यातील शेतकरी संघटनांच्या नेत्यांनी गुजरात निवडणूक निकालावर व्यक्त केल्या.

‘‘भाजपच्या नाकर्तेपणाचा लाभ विराेधकांना उठविता न आल्याने सलग सहाव्यांदा गुजरातमध्ये भाजप विजयी झाले आहे. मात्र घटलेली मतांची टक्केवारी आणि घटलेल्या जागा हा नक्कीच केंद्र आणि राज्य सरकारला मतदारांनी आणि विशेषतः शेतकऱ्यांनी दिलेला इशारा आहे. प्रचारामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर काॅंग्रेसने ठाेस भूमिका घेतली नाही. हार्दिक पटेलने पाठिंबा देऊनसुद्धा काॅंग्रेसला वातावरण तापवता आले नाही. मात्र या निवडणुकीतून तिसरा भक्कम पर्याय दिला दर भाजपचा पराभव सहज करणे शक्य आहे. हे या निकालांवरून दिसतं.’’ - रघुनाथदादा पाटील, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य ‘‘शेतकऱ्यांची नाराजी हाेती हे गुजरातच्या निकालांवरून स्पष्ट झालं आहे. सत्ताधारी भाजपने पैशांपासून ते सर्व शक्तीपणाला लावली हाेती. तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा माेठ्या आत्मविश्‍वासाने एकशे पन्नासपेक्षा अधिक जागा घेऊ असे म्हणत हाेते. मात्र या लावलेल्या शक्तीच्या तुलनेत भाजपचा हा विजय निसटताच म्हणावा लागेल. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना दिलेली आश्‍वासने न पाळल्याने झालेल्या शेतकऱ्यांच्या विश्‍वासघाताचे प्रतिबिंब मतदानात झाले. तर भुईमुगाला नसलेले दर, पटेल अांदाेलनाचा परिणामदेखील भाजपच्या मतदानावर झालेला आहे. या निवडणुकीतून काँग्रेसला धाेरणांमधील सुधारण्याची संधी मतदारांनी दिली आहे. त्यांनी त्यांची धाेरणे बदलली तर काँग्रेसला चांगले दिवस येतील असेही मतदारांनी स्पष्ट केले आहे.’’ - विजय जावंधिया, शेतकरीप्रश्‍नांचे अभ्यासक

‘‘शेतकऱ्यांच्या मनातील नाराजी गुजरात निवडणूक निकालांवरून स्पष्ट संकेत देत आहेत. केवळ गुजराती पंतप्रधान आहेत, आणि पंतप्रधानांचा आब राखण्यासाठी गुजराती अस्मिता आणि सहानभुतीतून झालेल्या मतदानामुळे भाजपचा विजय झाला. शेतकरी आता मतदान करायला शिकला असून, याचे परिणाम इतर राज्यांमध्ये नक्की दिसतील.’’ - अनिल घनवट, प्रदेशाध्यक्ष, शरद जाेशी प्रणित शेतकरी संघटना

‘‘शेतकऱ्यांनी गुजरामतमध्ये भाजपच्या विजयाचा उधळलेला वारू राेखला आहे. हा भाजपने शेतकऱ्यांचा इशारा समजावा. शेतकऱ्यांना गृहीत धरण्यात येऊ नये असा इशारा शेतकऱ्यांनी भाजपला दिला हाेता. भाजपचे घटलेले मताधिक्य हे यावरून सिद्ध झाले आहे.’’ - खा. राजू शेट्टी , नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना

  "गुजरातमधील विजय हा त्यांचा विजय नाही. १५० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा होता. परंतु शंभराच्या आतच जनतेने तुम्हाला गुंडाळले. या माध्यमातून जनतेने तुम्हाला योग्य तो संदेश देत सत्तेची घमंड उतरविली आहे. देशात आता लोकशाही उरलीच नाही. मुठभर लोकच राजेशाहीप्रमाणे देशाचा कारभार चालवित असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. वाटेल त्या वेळी नोटबंदीसारखी आणीबाणीसारखे निर्णय लागू होतात. गुजरातच्या निवडणुकीत काँग्रेस कमी पडली. त्यामुळे भाजपला जिंकता आले, हे मात्र मान्य करावे लागेल. काँग्रेस शेवटपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करू शकली नाही. काँग्रेसचे संघटनात्मक नसले तरी राहुल गांधी यांच्या व्यूहरचनेमुळे काँग्रेसला येथे मुसंडी मारता आली. देशाला एक सक्षम विरोधी पक्षनेता या माध्यमातून मिळू शकला, हेदेखील सत्य नाकारता येत नाही. परंतु सत्ताधाऱ्यांनी या निकालाच्या माध्यमातून योग्य तो धडा घेत पुढील वाटचाल करावी.’’ - खासदार नाना पटोले, भंडारा - गोंदिया लोकसभा क्षेत्र.

"गुजरातमधील जनतेचा कौल हा भाजपकरिता सुचक असा आहे. भाजपला मोठ्या आकड्याची अपेक्षा होती. परंतु वस्तुस्थिती वेगळीच झाली. विजयोत्सव साजरा होत असला तरी या निकालानंतर देशातील जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होणार नाही, असे वाटते. गुजरातमधील विकासाचे मॉडेलदेखील जनतेने नाकारले. यापुढील काळात भाजपची वाट आणखी कठीण होईल, असे वाटते.’’ - सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ‘‘यावर्षी तेलबीयांचे दर काेसळल्याने शेतकऱ्यांचा सरकारवर राग हाेता. मात्र शेतकऱ्यांचे प्रश्‍न शास्त्रीय पद्धतीने साेडविण्याचा प्रयत्न सरकारने केल्याने, सरकार आता फक्त ग्राहकांच्या बाजूने नाहीतर शेतकऱ्यांच्यादेखील बाजूने असल्याचे दाखवून दिले. यामुळे गुजरातमधील शेतकऱ्यांचा राग कमी झाला. गुजरातमध्ये साडे चार लाख क्विंटलची खरेदी सरकारने केली आहे. तर विविध टप्प्यांमध्ये पामतेलावरील आयातशुल्क ४० टक्क्यांवर तर क्रुडपाम आॅईलचे आयातशुल्क ३० टक्के केले. सगळ्याच डाळिंवरील निर्यातबंदी केंद्राने उठवल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. याचे चांगले परिणाम गुजरातच्या निवडणुकांमध्ये दिसून आले.’’ - पाशा पटेल, माजी आमदार आणि शेतीप्रश्‍नांचे अभ्यासक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com