साताऱ्यातील ६५ गावांत होणार गांडूळखत प्रकल्प

साताऱ्यातील ६५ गावांत होणार गांडूळ खत प्रकल्प
साताऱ्यातील ६५ गावांत होणार गांडूळ खत प्रकल्प
सातारा  : ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कचऱ्यांचे ढीग दिसू लागले आहेत. कचरा निर्मूलनासाठी कऱ्हाड तालुक्‍यातील बनवडी गावच्या धर्तीवर जिल्ह्यातील पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ६५ गावांत गांडूळ खत प्रकल्प वर्षभरात उभारला जाणार आहे. यातून ग्रामपंचायतींना उत्पन्न वाढण्यासाठी मदत होणार आहे.   
 
कचरा समस्येचा विळखा आता गावांनाही पडू लागला आहे. गावांतील कचरा आता घंटागाड्यांद्वारे संकलित करून तो थेट नदी, ओढे अथवा डोंगराकडेला टाकला जातो. परिणामी, त्या परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे आरोग्याच्या समस्याही उद्‌भवत आहेत. शिवाय, पावसाळ्यात नदी, ओढ्यांना पाणी येऊन त्यातील बहुतांश कचरा पाण्यात मिसळून जलप्रदूषण वाढत आहे. कचरा समस्येवर उपाययोजना करण्याचे आव्हान ग्रामपंचायतींपुढे आहे.
 
स्वच्छ भारत अभियानात (ग्रामीण) देशात तिसरा क्रमांक पटकाविलेल्या जिल्हा परिषदेने आता या अभियानातील दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच घनकचरा व्यवस्थापनातही प्रभावीपणे काम करण्यासाठी पाऊल उचलले आहे. बनवडी येथे घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रयोग राबविला. त्याच धर्तीवर पाच हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ६५ गावांसह आठवडा बाजार भरत असलेल्या १३७ गावांमध्ये कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविला जाणार आहे. 
 
हा प्रकल्प उभारण्यासाठी बनवडीला सुमारे एक ते सव्वा लाख रुपये खर्च आला. हा खर्च करण्याची तरतूद १४ व्या वित्त आयोगात आहे. त्यातून संबंधित ग्रामपंचायतींना खर्च करायचा आहे. बनवडीने हा प्रयोग यशस्वी केल्याने तेथील खताला सध्या दहा रुपये किलोने मागणी आहे. शिवाय, ही ग्रामपंचायत इतर ग्रामपंचायतींचा कचरा विघटन करण्यासाठीही सक्षम आहे.
या पद्धतीने मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यास येथे शेजारील लहान ग्रामपंचायतीही कचरा विघटन करू शकतात. बनवडीमध्ये या प्रकल्पासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्यांनी पुढाकार घेतला. घंटागाडीमध्येच ओला व सुका कचरा ठेवण्यासाठी विभाग केले. त्यासाठी लोकांमध्ये कचरा वर्गीकरणासाठी जनजागृती केली.
 
प्रकल्पासाठी या महिन्यात तालुकानिहाय ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, ग्रामसेवकांना बनवडी येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे. घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी बनवडी ग्रामपंचायतीच्या धर्तीवर ६५ गावांत वर्षभरात गांडूळ खत प्रकल्प राबविला जाईल. सांडपाणी पुनर्प्रक्रियेवरही भर दिला जाईल. प्रत्येक तालुक्‍यात दोन गावे मॉडेल म्हणून विकसित करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी सांगितले. 
या गावांत होणार प्रकल्प
नागठाणे, लिंब, खेड, शाहूपुरी, कोडोली, संभाजीनगर, देगाव, अतित, काशीळ, तांबवे, आटके, चरेगाव, गोळेश्‍वर, काले, कार्वे, विंग, कोपर्डे हवेली, मसूर, मुंढे, पाल, रेठरे बुद्रुक, सदाशिवगड, बनवडी, सैदापूर, शेरे, वडगाव हवेली, वारुंजी, आसू, विडणी, कोळकी, गुणवरे, बरड, गिरवी, सांगवी, पाडेगाव, तरडगाव, साखरवाडी, कुमठे, पाडळी स्टेशन, पिंपोडे बुद्रुक, वाठार-किरोली, वाठार स्टेशन, शिरवळ, बुध, पुसेगाव, खटाव, चितळी, मायणी, कलेढोण, कुरोली-सिद्धेश्‍वर, निमसोड, पुसेसावळी, औंध, कुडाळ, बावधन, भुईंज, ओझर्डे, पसरणी, यशवंतनगर, दहिवडी, पळशी, गोंदवले बुद्रुक, बिदाल, तारळे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com