जळगावात उडीद, मुगाच्या दरात सुधारणा

मुग
मुग
जळगाव ः डाळ उद्योगासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगाव शहरातील डाळमिलचालकांकडून कडधान्य खरेदीसाठी प्रतिसाद काहीसा वाढला. त्यातच उडीद, मुगाच्या दरात क्विंटलमागे १५० ते २०० रुपयांनी सुधारणा झाली. डाळींवरील निर्यातबंदी दूर झाल्याने डाळ उद्योगासाठी दिलासादायक स्थिती निर्माण झाली असून, गत सप्ताहात कडधान्यासंबंधी काही सकारात्मक घडामोडी येथील बाजार समितीमध्ये घडल्या. 
 
जिल्ह्यात कडधान्याचे उत्पादन तापीकाठासह काळी कसदार जमीन असलेल्या भागात तेवढे आले. त्यातच सप्टेंबर, ऑक्‍टोबरमध्ये कडधान्याला हवा तसा उठाव नव्हता. जाहीर लिलाव सुरू होते. नॉन एफएक्‍यू कडधान्याला ३५०० रुपये क्विंटलपासून दर होते. एफएक्‍यू (दर्जेदार) कडधान्याला ४२०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर होते. अगदी या महिन्याच्या सुरवातीलाही तशीच स्थिती होती, परंतु गतसप्ताहात डाळ निर्यातीसंबंधी काही सकारात्मक निर्णय झाल्याने कडधान्याची नोंदणी व मागणी यात वाढ दिसून आली.
 
मुगाची आवक प्रतिदिन ११५ क्विंटल राहिली. उडदाची आवक ३०० क्विंटल प्रतिदिन अशी होती. नॉन एफएक्‍यू उडदाला ३७०० रुपये तर एफएक्‍यू उडदाला ४५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाला. सरासरी दर चार हजार रुपये राहिला. मुगाला सरासरी ४१०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. नॉन एफएक्‍यू मुगाला प्रतिक्विंटल ३८००, तर एफएक्‍यू मुगाला प्रतिक्विंटल ४४०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर राहिले.
 
सोयाबीनचे स्थिर राहिले. बाजार समितीतील आवक प्रतिदिन ११०० क्विंटल एवढी राहिली. लिलाव सुरू होते, पण नॉन एफएक्‍यू सोयाबीनचा फारसा उठाव झाला नाही. नाईलाजाने शेतकऱ्यांना तो अडतदारांकडेच ठेवावा लागला. सोयाबीनला २२०० ते २४०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याचे बाजार समितीमधील सूत्रांनी सांगितले. 
 
कांदेबाग केळीला ९०० रुपये प्रतिक्विंटल असे दर खुल्या बाजारात राहिले. जुनारीला ७०० रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळाला. केळीचे दर स्थिर होते, अशी माहिती बाजार समितीमधील सूत्रांनी दिली.
 
भरीताच्या लांब व कमी बियांच्या वांग्यांची आवक गतसप्ताहात वाढली, पण थंडीची सुरवात झाल्याने त्यांची मागणीही वाढली. या वांग्याला १३०० ते २३०० रुपये क्विंटल दर राहिले. आवक प्रतिदिन सरासरी २४ क्विंटल एवढी होती. किरकोळ बाजारात भरीताच्या वांग्यांचे दर ३५ ते ४० रुपये प्रतिकिलो होते.
 
यासोबत मिरची, कोथींबीर, मेथी, पोकळा यांच्या आवकेतही वाढ दिसून आली. मिरचीची आवक प्रतिदिन सरासरी ३५ क्विंटल होती. तिला सरासरी २००० रुपये प्रतिक्विंटल दर होते. तुरीच्या ओल्या शेंगांची आवकही वाढली. त्यांची प्रतिदिन पाच क्विंटल आवक नोंदविण्यात आली. दर सरासरी ३००० रुपये प्रतिक्विंटल असे राहीले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com