कृषी परिषदेच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांना

तंत्रनिकेतन पदविका घेऊन पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना १० वीनंतर ७ वर्षांनी कृषी पदवी मिळणार, तर १२ वीनंतर सरळ प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १० वीनंतर ६ वर्षांत पदवी मिळते. म्हणजे तंत्रनिकेतनवाल्यांना पदवी घेण्यासाठी १ वर्ष वाढीची शिक्षा भोगावी लागणार आहे.
संपादकीय
संपादकीय

दिनांक १२ व १३ सप्टेंबरच्या ॲग्रोवनच्या अंकात कृषी तंत्रनिकेतनबाबत बातमी वाचली, की कृषी तंत्रनिकेतन पदविकेच्या पहिल्या बॅचमधील राखीव जागेवर दुसऱ्या वर्षात प्रवेश घेतलेले विद्यार्थी आता कृषी पदवीच्या चौथ्या वर्षात आहेत. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या नियमाप्रमाणे व कृषी पदवीच्या माहिती पुस्तिकाप्रमाणे कृषी पदवी मिळण्यासाठी जुन्या अभ्यासक्रमाप्रमाणे १६३ क्रेडिट पूर्ण करणे आवश्‍यक असते. परंतु, सरळ दुसऱ्या वर्षात प्रवेश घेतल्यामुळे या मुलांचे केवळ १४३ क्रेडिट पूर्ण होऊ शकतात.

२० क्रेडिटची तृटी राहते व त्यामुळे ते विद्यार्थी पदवी घेण्यास पात्र होऊ शकत नाहीत. आणि म्हणून विद्यापीठांनी निर्णय घेतला किंवा घ्यावा लागला, की या विद्यार्थ्यांनी कृषी पदवीच्या पहिल्या वर्षाचा अभ्यास करून त्याची परीक्षा द्यावी म्हणजे त्यांचे १४३ क्रेडिट पूर्ण होऊन ते पदवीसाठी पात्र होतील, अर्थात उत्तीर्ण झाल्यानंतर. म्हणजे या विद्यार्थ्यांना या वर्षी चवथ्या वर्षाचा अभ्यास करून परीक्षा द्यावी लागणार व तसेच पहिल्या वर्षाचीही परीक्षा द्यावी लागणार. याशिवाय दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात काही विषय राहिले असल्यास त्यांची परीक्षा देऊन पूर्तता करावी लागणार.

विद्यापीठाकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे जवळपास ६०% विद्यार्थ्यांचे दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांतील काही विषय राहिले. ते त्यात पास होऊ शकले नाहीत. एकंदरीत या विद्यार्थ्यांची कृषी पदवीसाठी १२ वी नंतर सरळ घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत तंत्रनिकेतन पदविका पूर्ण करून पदवीसाठी दुसऱ्या वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची अधिकच तारांबळ उडाली आहे. त्यात आता पहिल्या वर्षाचाही अभ्यास पूर्ण करावा लागणार आहे. 

अनेक शिक्षकांशी चर्चा केल्यानंतर लक्षात येते, की हे विद्यार्थी स्पर्धेमध्ये टिकू शकत नाहीत. त्यांची कामगिरी अत्यंत असमाधानकारक आहे. तशातच भारतीय कृषी संशोधन परिषदेने पाचव्या अधिष्ठाता कमिटीच्या शिफारशीनुसार अभ्यासक्रमात बदल केला आहे. आणि आता कृषी पदवी मिळवण्यासाठी १८३ क्रेडिट पूर्ण करावे लागतील, म्हणजे या विद्यार्थ्यांना ४० क्रेडिटची तूट केवळ तीन वर्षांत भरून काढावी लागणार अर्थात आणखी ओझे वाढले.

अशा परिस्थितीमध्ये पुढील वर्षापासून तंत्रनिकेतनच्या राखीव विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षात प्रवेश न देता त्यांची सरळ पहिल्या वर्षात प्रवेश घ्यावा, असा निर्णय विद्यापीठांनी घेतला आहे. याचा अर्थ तंत्रनिकेतन पदविका घेऊन पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना १० वी नंतर ७ वर्षांनी पदवी मिळणार, तर १२ वी नंतर सरळ प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १० वी नंतर ६ वर्षांत पदवी मिळते म्हणजे तंत्रनिकेतनवाल्यांना पदवी घेण्यासाठी १ वर्ष वाढीची शिक्षा भोगावी लागणार आहे.

हा सर्व उपद्‌व्याप कोणी व कशासाठी केला, असा प्रश्‍न आता अनेकांना पडत असणार आणि उत्तरासाठी विद्यापीठांच्या किंवा कृषी परिषदेच्या खुलाशाची वाट पाहात बसावी लागणार आहे. बातमीनंतर आता पंधरा दिवस होत आलेत. परंतु, याबाबत कोणीच खुलासा करण्याची जबाबदारी घेतली नाही, याचे आश्‍चर्य वाटते. बाधित विद्यार्थी राजकीय दबाव आणून हा प्रश्‍न सोडवू पाहात आहेत. प्रथम आपण हा उपद्‌व्याप कोणी व कशासाठी केला ते समजून घेऊया.

महाराष्ट्रात एकूण २४० कृषी पदविका देणाऱ्या शेती शाळा, खासगी व सरकारी क्षेत्रात आहेत. त्यापैकी १३९, तीन वर्षांच्या तंज्ञनिकेतन शाळा राज्य सरकारच्या जून २०१२ अध्यादेशान्वये अस्तित्वात आल्या. बाकी १०१ शाळा दोन वर्षांचा मराठीतील अभ्यासक्रम राबवतात. या दोन्ही शाळांमधून दरवर्षी १४३८२ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची क्षमता आहे. याचाच अर्थ राज्यात दरवर्षी १४३८२ कृषी पदविका घेणारे विद्यार्थी अपेक्षित आहेत. जर ३०% जागा रिकाम्या राहिल्या असे गृहीत धरले तर निदान १०,००० विद्यार्थी दरवर्षी प्रवेश घेतात. दरवर्षी ७०% च निकाल लागला असे गृहीत धरले तर ७००० विद्यार्थी दरवर्षी पदविका घेऊन बाहेर पडतात. या सर्व पदविकाधारकांचे होते काय?

मुळात १०वी नंतर गणित व इंग्रजीचा अभ्यास न जमल्यामुळे १२ वीत मोठी गळती होते. अशा मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दोन वर्षांचा कृषी पदविका अभ्यासक्रम कृषी विद्यापीठांनी सुरू केला. जवळपास प्रत्येक जिल्ह्यात एक शेती शाळा सरकारी क्षेत्रात कार्यरत होत्या. पदविका घेतलेला विद्यार्थी कृषी सहायक म्हणून कृषी खाते, जिल्हा परिषदा, विद्यापीठे, बीज कंपन्या आणि शेतीसंलग्न काम करणाऱ्या संस्थांमध्ये काम करू शकेल, अशी धारणा होती. नोकरी नाही मिळाली तर स्वतःच्या शेतीवर आधुनिक तंत्राद्वारे शेती करून आपल्या कुटुंबाचे उत्पादन वाढवू शकेल, हाही विचार त्यात होता. 

डॉ. किसन लवांडे  ः ७३५०१८५९९९ (लेखक डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे  माजी कुलगुरू आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com