शेती, पूरक उद्योग अन् ग्रामविकासाला चालना

महिला बचत गट  उपक्रम.
महिला बचत गट उपक्रम.

सातारा जिल्ह्यातील डोंगरी, दुर्गम जावळी तालुक्यात श्रमिक जनता विकास संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या माध्यमातून महिला, बाल विकास, ग्रामविकास आणि कृिपूरक उद्योगांना गती देण्यात आली आहे. शेतकरी बचत गटांची स्थापना करून सुधारित तंत्रज्ञानाचा प्रसार संस्थेच्या माध्यमातून केला जात आहे. संस्थेच्या उपक्रमामुळे शेती आणि ग्रामविकासाला चालना मिळाली आहे.

सातारा जिल्ह्यातील पश्चिम विभागातील डोंगरी व दुर्गम जावळी तालुक्यात आपल्या शिक्षणाचा उपयोग स्थानिक, गरीब गरजू श्रमिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा ध्येयाने केडंबे गावातील अादिनाथ तुकाराम ओंबळे यांनी ग्रामविकासासाठी श्रमिक जनता विकास संस्थेची स्थापना केली. युवकांना संघटित करून संस्थेच्या माध्यमातून अनेक उपक्रम सुरू केले. या संस्थेचे कार्य सातारा, पुणे, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यांतील ग्रामीण भागात पसरले आहे.

जावळी तालुक्यातील पश्चिम विभागातील मोठ्या प्रमाणात अल्प भूधारक शेतकरी आहेत. संस्थेने शेतकऱ्यांचे संघटन करून बचत गट तयार केले. बचत गटाच्या माध्यमातून तांत्रिक चर्चासत्रे, शिवार फेरीच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचू लागले. यामुळे हळूहळू व्यावसायिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढू लागला. शेतकरी गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेती, दर्जेदार भात उत्पादनवाढीवर लक्ष केंद्रित करण्यात आले. संस्थेच्या प्रयत्नातून जावळी, मेढा परिसरात १९९० पासून स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग सुरू झाला. आता या भागातील बावीस गावातील सुमारे पाचशेहून अधिक शेतकरी स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळले आहेत. या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी मातृरोपांची उपलब्धता आणि त्यापासून रोपेनिर्मिती आणि लागवडीबाबत प्रशिक्षण देण्यात आले. चांगला दर मिळण्यासाठी बाजारपेठेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. योग्य तांत्रिक सल्ला आणि बाजारपेठेच्या उपलब्धतेमुळे या परिसरातील अनेक तरुण मुंबई सोडून सुधारित तंत्राने शेतीकडे वळले आहेत. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषिविकास प्रकल्पांतर्गत २०१५ साली केडंबे येथे वेण्णा व्हॅली फार्मस प्रोड्यूसर कंपनीची स्थापना करण्यात आली. कंपनीच्या माध्यमातून दर्जेदार तांदळाची निर्मिती, भाताचा पेंडा व कोंडा वापरून आळिंबी संवर्धन, भात कोंड्यापासून तेलनिर्मितीचे नियोजन आहे. सध्या कंपनीतर्फे स्ट्रॉबेरी संकलन आणि विक्रीचे नियोजन केले जाते. गेल्या वर्षी कंपनीने ३२ टन स्ट्रॉबेरी विक्री केली. सुनील गोळे हे कंपनीचे सचिव आहेत. वेगवेगळ्या माध्यमांतून सुमारे १५०० शेतकरी संघटित होऊन शेती विकासामध्ये सहभागी झाले आहे.

  युवक संघटन आणि रोजगारनिर्मिती

  •  जंगल, जमीन, पाण्याचे संवर्धन व त्यापासून रोजगारनिर्मितीबाबत युवकांना प्रशिक्षण, रोजगारनिर्मिती.
  •  २००७ मध्ये ४५ युवा शेतकऱ्यांना एकत्र करत कृषी पर्यटनाबाबत प्रशिक्षण. यातून तापोळा येथे २२ पर्यटन केंद्रांची सुरवात.
  •  अादिवासी युवकांना मासेमारी व मध संकलनाचे शास्त्रीय प्रशिक्षण, आवश्यक साहित्याचे वाटप.
  •  आत्तापर्यंत ५५० युवकांना प्रशिक्षण देऊन शासनाच्या योजनांचा लाभ.
  •  अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील ३५० युवकांना स्ट्रॉबेरी रोपवाटिका प्रशिक्षण. ५५३ शेतकरी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतात.
  •  महिलांना निर्धूर चूल, ज्वेलरी, शिवणकाम, ब्यूटी पार्लर व्यवसायाचे प्रशिक्षण. या प्रशिक्षणातून सातारा जिल्ह्यातील ७५३ महिलांनी गृह उद्योग सुरू केले.
  • केंद्र व राज्य सरकारसोबत राबविले जाणारे प्रकल्प

     वाल्मीकी प्रकल्प, आदर्शगाव प्रकल्प योजना, जलस्वराज्य, वसुधंरा पाणलोट क्षेत्र ५२ गावांत काम, एकात्मिक अादिवासी विकास प्रकल्प, घोडेगाव, स्वच्छ भारत अभियानांतर्गत सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांतील ४६ निर्मल ग्राम पडताळणी, सातारा जिल्ह्यातील कराड, म्हसवड नगर परिषद, लोणंद निर्मल नगर पंचायतीबरोबर सर्वेक्षणाचे काम केले जात आहे.

    महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न  

  •  संस्थेच्या माध्यमातून १९९८ मध्ये महिला सक्षमीकरणाला सुरवात. याअंतर्गत तीन जिल्ह्यात ५१३ महिला बचत गटांची निर्मिती, तीन महिला सहकारी संस्थांची निर्मिती. या उपक्रमातून ६५०० महिलांना लाभ.
  •  महिलांसाठी रोजगारनिर्मिती, निर्णय प्रक्रिया, आत्मविश्वास वाढविणे, आरोग्य, शेती आधारित उद्योगांना चालना, महिला-पुरुष समानता, महिलेच्या नावावर घरनोंदणी, कौटुंबिक हिंसा कायदा जाणीव, एड्स जनजागृत्ती करणे आदी गोष्टींवर काम. यासाठी महिला अर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड, स्वीसएड, अॅाक्सफेम, केंद्र सरकार, राज्य सरकारची मदत.
  •  श्रमिक महिला बिगर शेतीसह पतसंस्थेच्या (केळघर) माध्यमातून ४५ गावांतील तीन हजार महिला सभासद.
  •  कोयनामाई महिला बिगर शेती पतसंस्थेच्या (वानवली) माध्यमातून तापोळा विभागातील १०९ गावांतील २५०० महिलांसोबत विविध उपक्रमांना   चालना.
  •  श्रमिक महिला बचत गट संस्थेच्या माध्यमातून मेढा विभागातील ५५ गावांतील २५० बचत गटांसोबत विविध उपक्रम.
  •  महिलांच्या उपक्रमामध्ये संस्थेच्या नेहा कुलकर्णी, विद्या सुर्वे कार्यरत आहेत. सध्या या प्रकल्पातून ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील एक हजार महिला सोबत काम सुरू आहे.
  • अादिवासी कातकरी संघटन आणि विकास प्रकल्प

  •  १९९५ मध्ये जावळी तालुक्यातील २७ गावांतील आदिवासी कातकरी समाजातील १५० कुटुंबांचे सर्वेक्षण.
  •  वस्तीवर जाऊन युवकांना प्रशिक्षण. ३५ युवकांच्या गटाची निर्मिती. यासाठी कै. शंकर मुकणे, हौशा मुकणे, कांताराम जाधव, तुकाराम जाधव, बारक्या जाधव यांचे प्रयत्न.
  •  सातारा जिह्यातील ११२ गावांतील १३०० कुटुंबांचे सर्वेक्षण. त्यांना रेशन कार्ड, जातीचे दाखले, मतदार यादीत नावांची नोंदणी केली.
  •  एकात्मिक अादिवासी विकास प्रकल्पातून मासेमारीसाठी जाळी, छोट्या बोटी, किराणा दुकाने, शितपेट्या, सायकल अशा विविध योजना युवकांना मिळाल्या.
  •  अादिवासी मच्छमारी सहकारी संस्थेची निर्मिती.
  •  संस्थेच्या प्रयत्नातून ३०० अादिवासी मुले प्राथमिक शाळेत शिकत आहे.
  •  अादिवासींना पूरक व्यवसाय म्हणून मध गोळा करणे आणि विक्री प्रशिक्षण. शास्त्रीय पद्धतीने मध संकलन पद्धती विकसित करणे आणि त्या मधास बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट अॉफ सायन्स ॲंँड टेक्नॉलॉजी (सीड डिव्हिजन) आणि आरती संस्था, पुणे यांच्यातर्फे मदत. या व्यवसायाचा विस्तार जव्हार (पालघर) मावळ, मुळशी (पुणे), मुरबाड (ठाणे) भागातील आदिवासींमध्ये होत आहे.
  • ग्रामविकास संस्थांची निर्मिती श्रमिक जनता विकास संस्थेने आठ लोकसंस्थांची निर्मिती केली आहे. या संस्थामध्ये स्वतः सहभागी न होता त्यांना अधिकार देण्यात आले आहेत. या संस्थामध्ये वेण्णा व्हॅली फार्मर प्रोड्यूसर शेतकरी कंपनी, श्रमिक महिला बिगर शेती पतसंस्था, कोयनामाई महिला पतसंस्था, सह्याद्री इको अॅग्रो टुरिझम, श्रमिक अदिवासी शैक्षणिक सामाजिक मंडळ, अादिवासी कातकरी मच्छमारी सहकारी संस्था, श्रमिक श्वेत क्रांती, श्रमिक महिला बचतगट सहकारी संस्थेचा समावेश आहे. संस्थापक अध्यक्ष अदिनाथ ओंबळे, सचिव नेहा कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी लहू तरडे संस्थेच्या विविध उपक्रमात कार्यरत असतात.

       संस्थेस मिळालेले पुरस्कार

  •  नाबार्ड बचत गट स्थापना व बँकजोडणीसाठी ‘बेस्ट परफार्मन्स ॲवॉर्ड` 
  • श्रमशक्ती पुरस्कार.
  •  अफार्म ग्रामीण कार्यकर्ता पुरस्कार ः अादिनाथ ओंबळे (अध्यक्ष)  

    - अादिनाथ ओंबळे, ९४२३०३२५१८

     

  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com