हातसडी तांदळाची थेट ग्राहकांना विक्री

प्रदर्शनामध्ये हातसडीच्या तांदळाची विक्री करताना महिला सदस्य.
प्रदर्शनामध्ये हातसडीच्या तांदळाची विक्री करताना महिला सदस्य.

तिकोणा (ता. मावळ, जि. पुणे) गावातील शांताबाई चिंधू वरवे यांनी महासावित्री महिला महाबचत गटाच्या माध्यमातून हातसडी तांदळाच्या निर्मितीला सुरवात केली. गेल्या दहा वर्षांपासून या गटातर्फे पुणे, मुंबईतील ग्राहकांना मागणीनुसार योग्य पॅकिंगमध्ये तांदळाची विक्री केली जाते. थेट विक्रीमुळे बचत गटाच्या नफ्यात चांगली वाढ झाली आहे.  

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील पवना धरणाजवळ सुमारे दीड हजार लोकसंख्येचे तिकोणा हे गाव. सतरा वर्षांपूर्वी कपार्ट आणि इंडोजर्मन या स्वयंसेवी संस्थांनी पाणलोट विकास कामांसाठी तिकोणा आणि परिसरातील गावांमध्ये सुमारे चाळीस महिला बचत गट स्थापन केले. या बचत गटांच्या समन्वयक म्हणून शांताबाई चिंधू वरवे काम करत होत्या. तिकोणा गावात शांताबाई वरवे यांनी दहा महिला बचत गट स्थापन केले होते. त्यामध्ये त्या स्वतः सचिव असलेल्या सावित्रीबाई फुले महिला बचत गटाचाही समावेश होता. शशिकला कदम या गटाच्या अध्यक्षा होत्या. पाणलोटाची कामे बंद झाल्यावर काही वर्षे बचत गटांची कामे थंडावली; परंतु जिल्हा परिषदेने २००६ मध्ये जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून महिलांच्या गटांना चालना दिली. यासाठी शांताबाई वरवे यांनी पुढाकार घेत गावातील दहापैकी सक्रिय असलेल्या सहा गटांतील उपक्रमशील अकरा महिला निवडून महासावित्री महिला महाबचत गट तयार केला. या गटाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी बेबी बळीराम मोहोळ यांनी स्वीकारली. या गटाशी गावातील सहा महिला बचत गट जोडले. गटातील महिलांना बचतीची सवय लागावी आणि गटाला उत्पन्न मिळावे म्हणून प्रत्येक सदस्याकडून प्रतिवर्ष पाचशे रुपयांची बचत बँकेत जमा करण्यास सुरवात केली. साधारणपणे दीड वर्षानंतर सावित्री महिला बचत गटाला बँकेने खेळते भांडवल म्हणून पंचवीस हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले. गटातील महिलांनी इंद्रायणी आणि आंबेमोहोर हातसडीचा तांदूळ निर्मिती आणि विक्री करण्याचे नियोजन केले.

सुधारित पद्धतीने भात लागवड

बचत गटातील महिलांची सुमारे पन्नास एकर शेती आहे. दरवर्षी या महिलांना भाताचे एकरी दहा क्विंटल उत्पादन मिळते. भात उत्पादनात वाढ मिळवण्यासाठी महिलांनी कृषी विभागातील तज्ज्ञांशी संपर्क साधत सुधारित लागवड आणि व्यवस्थापनाबाबत माहिती घेतली. यातून एकरी भात उत्पादन पंधरा क्विंटलपर्यंत पोचले. भात विक्री करण्यापेक्षा हातसडी तांदूळ निर्मिती, पॅकिंग, ब्रॅंडिंग करून थेट ग्राहकांना विक्रीचे नियोजन केले. यंदाच्या वर्षी बचत गटातील ७० महिलांनी सुमारे सत्तर एकर क्षेत्रावर भात लागवड केली आहे.

महिलांना मिळाला रोजगार  

हातसडीचा तांदूळ तयार करण्यासाठी गटातील महिलांनी उत्पादित केलेला भात कमी पडत होता. ग्राहकांना चांगल्या दर्जाचा सुवासिक हातसडीचा तांदूळ उपलब्ध करून देणे आणि बचत गटाचा व्यवसाय वाढविण्यासाठी शांताबाईंनी पुढाकार घेतला. परिसरातील काही शेतकरी सेंद्रिय पद्धतीने भात लागवडीस तयार झाले. या शेतकऱ्यांचा भात बचत गटाने खरेदी करण्यास सुरवात केली. साळीसहित भात खरेदी करून पारंपरिक पद्धतीने उखळावर साळ आणि तांदूळ वेगळा करून हातसडीचा तांदूळ तयार केला जातो. त्यासाठी गटाने गावातील महिलांची मदत घेतली. ज्या महिला हातसडीचा तांदूळ तयार करतील त्यांना गटातर्फे योग्य आर्थिक मोबदला दिला जातो. त्यामुळे गावामध्येच महिलांना रोजगार मिळू लागला आहे.

गटातील महिलांचे उत्पन्न वाढले पूर्वी गटातील महिला परिसरातील व्यापाऱ्यांना किरकोळ दरात भात किंवा बिगर हातसडीच्या तांदळाची प्रतिकिलो २० ते २५ रुपयाने विक्री करत होत्या; परंतु आता थेट ग्राहकांना हातसडीचा इंद्रायणी तांदूळ प्रतिकिलो ८० रुपये आणि आंबेमोहोर तांदूळ ९० रुपये या दराने विकला जातो. थेट विक्रीमुळे बचत गटाच्या नफ्यात वाढ झाली. विविध प्रदर्शनात सहभागी झाल्याने पुणे आणि मुंबई या शहरातील सुमारे एक हजारहून अधिक ग्राहक गटाशी जोडले गेले. त्यामुळे गटातील सदस्यांच्या वार्षिक उत्पन्नात सरासरी चाळीस हजार रुपयांची वाढ झाली.

शहरांमध्ये तांदूळ विक्री गटाने तयार केलेल्या तांदळाची व्यापाऱ्यांना विक्री केल्यामुळे कमी दर मिळत होते. गटाने बाजारपेठेचा अभ्यास करून ग्राहकांना थेट हातसडीच्या तांदळाची विक्री करण्याचा निर्णय घेतला. सन २००६ पासून महासावित्री गटाने एक किलो, दोन किलो, पाच किलो, दहा आणि पंचवीस, पन्नास किलोचे पॅकिंग करून थेट विक्रीस सुरवात केली. यासाठी कृषी विभागाचे कृषी सहायक नवीनचंद्र बोऱ्हाडे, तालुका कृषी अधिकारी देंवेद्र ढगे यांचे मार्गदर्शन मिळाले. थेट ग्राहकांना विक्री केल्याने बचत गटाच्या उत्पन्नात वाढ झाली.

गेल्या बारा वर्षांपासून या गटातील महिला पुण्यातील भिमथडी, कृषी महोत्सव, तांदूळ महोत्सव मुंबई येथील महालक्ष्मी सरस प्रदर्शन येथे ग्राहकांना थेट हातसडीच्या तांदळाची विक्री करतात. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेने तयार केलेल्या ‘सावित्री` ब्रँडनेम ने हातसडीच्या तांदळाची विक्री होते. सुरवातीला हातसडीच्या तांदळाची कमी विक्री होत होती; परंतु महिलांमध्ये जिद्द कायम होती. त्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करत विविध प्रदर्शनात सहभागी होत थेट ग्राहकांना तांदळाची विक्री करून नफा वाढविण्यावर भर दिला. आज हा बचत गट दरवर्षी सरासरी चाळीस टन हातसडीच्या तांदळाची थेट ग्राहकांना विक्री करतो.

रोजगार मिळाला मी दुसऱ्यांच्या शेतावर मजुरी करण्यासाठी जात होते. त्यातून आर्थिक मिळकत तुटपुंजी होती. गटात सहभागी झाल्यामुळे चांगले आर्थिक उत्पन्न मिळू लागले. गटातील महिलांना कायमस्वरूपी रोजगाराची संधी तयार झाली. - बेबी बळीराम मोहोळ, अध्यक्षा, महासावित्री महिला महाबचत गट.  

उत्पन्नात वाढ गटाच्या माध्यमातून तांदळाची थेट विक्री सुरू झाल्यामुळे वार्षिक उत्पन्नात चाळीस हजार रुपयांची वाढ झाली. त्यामुळे शेतीमध्ये सुधारणा करणे शक्य होत आहे. - हिराबाई प्रकाश कदम, सदस्य.  

थेट विक्रीवर भर माझ्या कुटुंबाची पाच एकर शेती आहे. दरवर्षी भात लागवड असते. बचत गटाच्या माध्यमातून हातसडीचा तांदूळ बनविल्यामुळे ग्राहकांना थेट विक्री सुरू केली. नेहमीपेक्षा तांदूळ विक्रीतून चांगला नफा मिळू लागला आहे. - शांताबाई वरवे, ९१५८८०१५२६ , (सचिव, सावित्री महिला बचत गट.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com