शेतीला दिली नवतंत्रज्ञान, पशुपालनाची जोड

बुर्ली, जि. सांगली : जयश्रीताईंनी जातिवंत दूधाळ गाईंचे संगोपन केले आहे.
बुर्ली, जि. सांगली : जयश्रीताईंनी जातिवंत दूधाळ गाईंचे संगोपन केले आहे.

बुर्ली (ता. पलूस, जि. सांगली) येथील महिला शेतकरी जयश्री रामचंद्र पाटील यांनी जबाबदारीने कुटुंबाचा डोलारा सांभाळला. बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन पीक बदल केला. शेतीला पशुपालन आणि मत्स्यशेतीची जोड दिली. सुधारित तंत्राने पीक व्यवस्थापन करत उत्पन्न वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. 

सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीकाठावरील बुर्ली (ता. पलूस) हे बागायती गाव. बुर्ली गावामध्ये रामचंद्र, भगवान आणि बाळासाहेब असे तीन भावांचे एकत्रित कुटुंब. जयश्रीताईंचे पती रामचंद्र एका साखर कारखान्यात नोकरी करीत होते. तर भगवान आणि बाळासाहेब हे शेती सांभाळत. असे हे सुखी कुटुंब, परंतू घरातील कर्ते पुुरुष रामचंद्र यांचे अाकस्मिक निधन झाले आणि पाटील कुटुंबासमोरील अडचणी वाढल्या. दरम्यानच्या काळात जयश्रीताईंचा प्रत्यक्ष पीक नियोजन, व्यवस्थापनाशी फारसा संबंध आला नव्हता. जिरायती शेतीमधून फारसे उत्पन्नही मिळत नव्हते. त्यांचे दोन्ही दीर शेती नियोजनातच होते. पतीच्या निधनाच्या आधी एका जमिनीचा न्यायालयीन वादही सुरू होता. त्यासाठी जयश्रीताईंना प्रत्येक तारखेला न्यायालयात हजर राहावे लागत होते. हळूहळू त्यांना शेतीची माहिती होत गेली. येणाऱ्या विविध अडचणींवर मात करत शेती नियोजनाची जबाबदारी जयश्रीताईंनी घेतली.

  शेती व्यवस्थापनाला सुरवात 

 जयश्रीताई म्हणाल्या की, माझ्या कुटुंबाची एकूण सात एकर जमीन. या जमिनीत योग्य पीक व्यवस्थापन केले तर निश्चित आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ शकते हे लक्षात आले. त्यानुसार कुटुंबाची शेतीमध्ये राहण्याची सोय केली. माझे माहेर तासगाव तालुक्‍यातील तुरची. माहेरच्या शेतीमध्ये पीक लागवडीचा अनुभव असल्याने मी सासू, दीर आणि लहान मुलांना सोबत घेऊन शेतीचे नियोजन सुुरू  केले.                                                                जयश्रीताई ज्या शिवारात राहतात, त्या ठिकाणची वीस गुंठे जमीन पानथळ स्वरूपाची होती. जयश्रीताईंनी या ठिकाणी दहा गुंठे क्षेत्रात शेततळे घेतले. दुसरे दहा गुंठे क्षेत्र शेततळ्यातील निघालेल्या भरावातून भरून घेतले. या शेततळ्यावर विद्युत पंप बसवला. चार एकर शेतीला ठिबक सिंचनाची सोय केली. सध्या परिसरातील कालव्यामुळे शेतीला पाण्याची सोय आहे. उन्हाळ्यात शेततळ्यातून पिकाला पाणी दिले जाते.  पीक नियोजनाबाबत जयश्रीताई म्हणाल्या की, मी चार वर्षापूर्वी दोन एकरावर बाजारपेठेची मागणी लक्षात घेऊन शेवग्याची लागवड केली. या शेवग्याची पुणे, कोल्हापूर आणि कराड बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना विक्रीचे नियोजन केले. या पिकातून चांगला आर्थिक नफा मिळाला. परंतू गेल्या तीन वर्षापासून दर कमी होऊ लागल्याने शेवगा काढून टाकला. गेल्या वर्षी वीस गुंठे क्षेत्रावर फेब्रुवारीमध्ये पावट्याची लागवड केली होती. याचेही चांगले उत्पादन मिळाले. जागेवर प्रति किलोस ७० रुपये दर मिळाला. त्यामुळे हे पीकदेखील चांगला नफा देऊन गेले.   सध्या पाच एकरावर ऊस लागवड, वीस गुंठे क्षेत्रावर भात आणि तीस गुंठे क्षेत्रावर नेपिअर गवताची लागवड आहे. सुधारित तंत्राने ऊस लागवडीवर भर दिला. यासाठी क्रांती साखर कारखान्याच्या माध्यमातून वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ऊस पीक व्यवस्थापनाबाबत चार दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केले. यातून मिळालेल्या माहितीनुसार मी ऊस पीक व्यवस्थापनात बदल केले. उसाला माती परीक्षणानुसारच खतमात्रा दिली जाते. पाणी व्यवस्थापन केले जाते. पाचटाचे आच्छादन करते. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहिली आहे. पूर्वी एकरी ४० टन उत्पादन मिळायचे, आता ८० टनांची सरासरी गाठली आहे. पीक नियोजन आणि व्यवस्थापनामध्ये माझा भाऊ विजय गलांडे आणि  आनंद गावडे, रूपाली कुंभार यांचे मार्गदर्शन मिळते. शेततळ्यामध्ये यंदाच्या वर्षी मी दहा हजार मृगळ मत्स्यबीज सोडले आहेत. पुढील सहा महिन्यांत माशांचे उत्पन्न मिळेल. 

व्यवस्थापनाची सूत्रे 

  • माती परीक्षणानुसार सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा संतुलित वापर.
  • दरवर्षी दहा ट्रॉली शेणखत जमिनीत मिसळले जाते. याचबरोबरीने गांडूळखत, जीवामृताचा वापर. 
  • बाजारपेठेनुसार भाजीपाला लागवडीचे नियोजन.
  • पाच एकर शेतीला ठिबक सिंचन.
  • पीक व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण, शिवारफेरीमध्ये सहभाग. त्यातील माहितीचा पीक नियोजनामध्ये वापर.
  • बचत गटातील महिलांना सुधारित शेती तसेच पशुपालनाबाबत मार्गदर्शन.  
  • पशुपालनास सुरवात शेतीला जोडधंदा म्हणून जयश्रीताईंनी आठ वर्षांपूर्वी पशुपालनाला सुरवात केली. गाईंसाठी सुधारित गोठा बांधला. सध्या त्यांच्याकडे दहा होलस्टिन फ्रिजियन गाई असून पाच दुधात आहेत. रोजचे ८० लिटर दूध डेअरीला दिले जाते. पशुपालनातील उत्पन्नातून कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागवण्यास मदत होते.  जयश्रीताई दूध संकलन केंद्रही चालवितात. या केंद्राच्या माध्यमातून दररोज ४०० लिटर दुधाचे संकलन होते. गावातील गरजू वीस तरुण पशुपालकांचा त्यांनी गट तयार केला आहे. त्यांना पशुपालनासंदर्भात मार्दगर्शन करतात. 

    महिला कृषी बचत गटाची स्थापना  जयश्रीताईंनी चार वर्षापूर्वी सातबारावर नाव असणाऱ्या अठरा महिलांना एकत्र करून दुर्गामाता महिला कृषी बचत गटाची स्थापना केली आहे. या गटाद्वारे कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली जाते. त्याचा महिला शेतकऱ्यांना फायदा झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे बचत गटामार्फत महिलांना कर्जवाटप केले जाते. यामुळे काही महिलांनी गाई, म्हशी घेतल्या. काही जणींनी शेती सुधारणा केली, ठिबक सिंचन केले. मुकुंदनगर भागातील अनेक महिला शेतकरी यापूर्वी सावकारी व्याजाने कर्ज काढत होत्या. बचत गटामुळे सावकारी हद्दपार झाली, गरजेइतकी रक्कम मिळाली.

    शेतीत राबतेय एकत्र कुटुंब 

    ऊस लागवड, भाजीपाला पिकांची लागवड ते विक्री, गाईंचे व्यवस्थापन ही कामे घरातील सर्व सदस्य करतात. त्यामुळे शेती व्यवस्थापनासाठी मजुरांची गरज लागत नाही. शेतातील ठिबकची जोडणीही घरातील मुलांनी केली आहे. आज जयश्रीताईंच्या ८५ वर्षांच्या सासूबाई अनुसया शंकर पाटील यांची भक्कम साथ कुटुंबाला मिळाली आहे. जयश्रीताईंनी संघर्षातून प्रगती करताना कुटुंबातील चार मुलींचे विवाह केले. अभिनव रामचंद्र पाटील, मच्छिंद्र भगवान पाटील यांनी स्थापत्य शिक्षणाची पदविका घेतली आहे. अजय रामचंद्र पाटील बीएस्सी कृषीचे शिक्षण घेत आहेत. महेंद्र भगवान पाटील, सुप्रिया रामचंद्र पाटील यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. जीवनात कितीही संकटे येऊ देत, घेतलेल्या कामावर निष्ठा आणि कष्टाची तयारी ठेवल्यास हमखास यशस्वी होता येते, असे जयश्रीताई सांगतात.

    - जयश्री पाटील, ८६००५७६९४३  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com