भाजीपाला सल्ला : फळभाजी, वेलवर्गीय, रांगडा कांदा

भाजीपाला सल्ला
भाजीपाला सल्ला

यंदा राज्याच्या बहुतांश भागांत अतिवृष्टी झाली. तसेच, काही भागांत पावसाचा मोठा खंड पडला. अतिवृष्टी झालेल्या शेतामध्ये अतिरिक्त पाणी साचून नुकसान होऊ शकते, तर पावसाचा मोठा खंड पडलेला असल्यास पिकांना पाण्याचा ताण बसला असेल. आपल्या विभागातील परिस्थितीनुसार नियोजन करावे. 

  • पाणी धरून ठेवणाऱ्या जमिनीत निंबोळी खत, गांडूळ खत, शेणखत, करंज ढेप, एरंडी ढेप इत्यादी सेंद्रिय खतांचा वापर करावा.
  • सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होते. भाजीपाला पिके शारीरिक वाढीच्या अवस्थेतून पुनरुत्पादनाच्या अवस्थेकडे वळतात. पिकांना या अवस्थेत नत्रयुक्त खतांचा पुरवठा करावा. जमिनीत हवा खेळती राहावी यासाठी पिकात कोळपणी करावी.
  • फळवर्गीय भाजीपाला 

  • फळवर्गीय भाजीपाला पिकात अनावश्‍यक फांद्या व पानांची गर्दी कमी होईल अशा पद्धतीने नियोजन करावे. कारण अतिरिक्त पानांमुळे पिकाच्या खालील भागात पानांची दाटी होऊन दमट वातावरण तयार होते. त्यामुळे कीड- रोगांच्या प्रादुर्भावास अनुकूल वातावरण होते. तसेच, जुन्या पानांची प्रकाशसंश्‍लेषण करण्याची क्षमता संपलेली असते. त्यांच्यात केवळ अनावश्‍यक घटकांचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे अशी पाने व फांद्या खुरपणी करताना हाताने काढून टाकावीत. 
  • फुलांपासून फळधारणा होण्यासाठी, तसेच फळांची दर्जेदार वाढ होण्यासाठी पोषक वातावरण या काळात उपलब्ध असते, त्यामुळे आंतरमशागतीवर भर द्यावा. पिकात कोळपणी करणे व झाडांना मातीची भर दिल्यास जमिनीतील अन्नद्रव्ये पिकांना मिळण्याचे प्रमाण वाढते.  
  • वांगी, टोमॅटो, मिरची आणि भेंडी इत्यादी भाजीपाला पिकाची लागवड जून - जुलै महिन्यात झाली आहे. सध्या २ ते ३ महिने वयाच्या या पिकांना फूल धारणा व फळधारणा होण्याचा काळ आहे. अशावेळी वरखताचा दुसरा हप्ता द्यावा. वांगी या पिकाला प्रतिहेक्‍टरी ३० किलो नत्र द्यावे. टोमॅटोला प्रतिहेक्‍टरी ५० किलो नत्र द्यावे. भेंडीला प्रतिहेक्‍टरी २५ किलो नत्र द्यावे. वरखते झाडाभोवती बांगडी पद्धतीने देऊन नंतर हलक्‍या मातीने झाकावे. 
  • खते देताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्‍यक आहे, अन्यथा खते दिल्यानंतर जमिनीला लगेच हलके पाणी द्यावे. 
  • शक्‍य असल्यास वरील फळभाजीपाला पिकांना प्रतिहेक्‍टरी ५ ते ७ क्विंटल निंबोळीची ढेप द्यावी. त्याचा फायदा जमिनीच्या निचऱ्यासाठी किंवा जलधारण क्षमता वाढण्यासाठी होतो.  
  • पिकाला वाढीकरिता नियमित व गरजेइतकेच पाणी द्यावे. पीक तणविरहित ठेवावे.
  • वेलवर्गीय भाजीपाला 

  • काकडी, दुधी भोपळा, कारली, शिरी दोडका, चोपडा दोडका इत्यादी पिकांची लागवड होऊन दोन महिने झाले आहेत. त्यांना प्रतिहेक्‍टरी २५ किलो नत्राची मात्रा बांगडी पद्धतीने द्यावी. 
  • मंडप पद्धतीत पिकाच्या वेलींचे शेंडे एकमेकांत गुंतणार नाहीत, याची काळजी घ्यावी. 
  • जमिनीचा मगदूर व वातावरणातील तापमान यांचा अंदाज घेऊन पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर ठरवावे. पिकांना खूप जास्त किंवा कमी पाणी मिळणार नाही याची काळजी घ्यावी. 
  • पिकाच्या दोन ओळींतील जागा तणविरहित ठेवावी. 
  • तयार फळांची काढणी करताना बाजारपेठेतील मागणीनुसार प्रत लक्षात घेऊन वरचेवर काढणी करावी. जुनी झालेली किंवा कमी परिपक्व फळे बाजारपेठेत नेल्यास दर मिळत नाही.
  • रांगडा कांदा पिकाच्या रोपाची तयारी 

  • जुलै- ऑगस्ट महिन्यात लागवड केलेली रांगडा कांद्याची रोपे आता लागवडपूर्व अवस्थेत आहेत. लागवडीसाठी ६ ते ८ आठवडे वयाच्या रोपांची निवड करावी.  
  • लागवडीसाठी बसवंत- ७८०, ॲग्री फाउंड लाइट रेड या लाल कांद्याच्या, तर भीमा सुपर या पांढऱ्या कांद्याच्या जातींची निवड करावी. 
  • एक हेक्‍टर रांगडा कांदा लागवडीसाठी २ x १ मीटर आकाराच्या व १५ ते २० सें.मी. उंचीच्या एकूण २२ ते २५ गादीवाफ्यांतील रोपे लागतात.
  •  : डॉ. एस. एम. घावडे, ९६५७७२५८४४ (मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com