कुणाचा ना धाक लुटारूंना!

मागील हंगामातील बोंड अळीच्या संकटानंतर बोगस निविष्ठांवरील कारवाई असो अथवा कापूस उत्पादकांच्या प्रबोधनाबाबत शासन-प्रशासनाने केलेले दावे असो, हे सारे फोल ठरताना दिसत आहे.
संपादकीय
संपादकीय

विदर्भातील अकोला जिल्ह्यात पूर्वहंगामी कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जुलैमध्येच आढळून आला आहे. परभणीजवळ बनावट संवर्धके, कीटकनाशकांचा २९ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. शेतात कीडनाशकांची फवारणी करताना शेतकरी, शेतमजुरांचा मृत्यू झाल्यास संबंधित व्यक्तीच्या वारसांना चार लाख रुपये नुकसानभरपाईचा शासन आदेशही नुकताच काढण्यात आला आहे. मागील चार दिवसांत ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेल्या या बातम्यांचा एकमेकांशी घनिष्ठ संबंध आहे. गेल्या हंगामात कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव जुलैमध्येच आढळला होता. बोंड अळीसह इतरही रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी बोगस, भेसळयुक्त अनेक कीडनाशकांचे एकत्र मिश्रण करून योग्य ती खबरदारी न घेता केलेल्या फवारणीमुळे अनेक शेतकरी, शेतमजुरांना प्राण गमवावे लागले होते. गेल्या वर्षीच्या या संपूर्ण घटनाक्रमापासून शासन-प्रशासनाने काहीही बोध घेतलेला दिसत नाही.

राज्यात दहा दिवसांपासून पाऊस सुरू आहे. असाच पाऊस पुढील काही दिवस बरसणार, असा अंदाज आहे. सततचे ढगाळ वातावरण आणि पडत असलेल्या पावसाने कापूस, सोयाबीन आदी खरीप पिकांना तणासह रोग-किडींचाही विळखा पडला आहे. अशा परिस्थितीमध्ये बोगस निविष्ठांचे साठे राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आढळून येत आहेत. म्हणजे त्यांचा बाजारात सर्वत्र सुळसुळाट आहे. यात सापडला तो चोर...बाकीचे शिरजोर! असाच प्रकार असतो. शेतकऱ्यांचे ‘खरे मार्गदर्शक’ (कृषी सेवा केंद्र चालक) यांच्या सल्ल्याने तणनियंत्रण असो की पीकसंरक्षण यांचे प्रयोग शेतशिवारात राजरोशपणे चालू आहेत. हे असेच चालू राहिले तर फवारणी करताना विषबाधेचे प्रकार याही हंगामात दिसून येतील. याचाच अर्थ मागील हंगामातील बोंड अळीच्या संकटानंतर बोगस निविष्ठांवरील कारवाई असो अथवा कापूस उत्पादकांच्या प्रबोधनाबाबत शासन-प्रशासनाने केलेले दावे असो, हे सारे फोल ठरले आहे, हेच अलीकडे प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतून स्पष्ट होते.

खतांच्या गोणीत-बग्यास अन् राख, कुणाचा ना धाक- लुटारूंना औषधाच्या बाटलीत- गढूळ पाणी, आवळली काणी- नरड्याला बोगस निविष्ठा पुरविणाऱ्यांची पैसा कमविण्याची हाव भयानक असते. विशेष म्हणजे त्यांना कुणाचाही धाक राहिलेला नाही, हे अत्यंत घातक आहे. राज्यात पूर्वहंगामी कापूस कोणीही घेऊ नये म्हणून बियाणेच बाजारात येऊ न देण्याबाबत कृषी विभाग काळजी घेतल्याचे सांगते. तरीही बीटीचे बियाणे बाजारात पोचलेच कसे, कोणत्या कंपनीने ते पोचविले, याचा शोध या विभागाने आता घ्यायला हवा. त्याचबरोबर बोगस भेसळयुक्त रासायनिक खते असोत अथवा कीडनाशके यांचा एक कणही बाजारात विकला जाणार नाही, हे शासन-प्रशासनाने पाहावे. महत्त्वाचे म्हणजे गुलाबी बोंड अळीला नियंत्रणात ठेवण्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीचा प्रसार प्रचार केल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात येते. अशावेळी फेरोमन-प्रकाश सापळ्यांपासून ते निंबोळी अर्काच्या फवारणीपर्यंत या उपायांचा अवलंब किती शेतकरी करताहेत, हाही संशोधनाचा विषय ठरेल. विषबाधेने मृत्यू पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना नुकसानभरपाई जाहीर करताना, असा एकही मृत्यू राज्यात होणार नाही, याबाबतची सर्वोतोपरी खबरदारी शासनाने घ्यायला हवी. कारण जिवाचे मोल पैशात होऊच शकत नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com