अफगाण वारी सार्थ ठरावी

अफगाणिस्तानला आपली वार्षिक निर्यात सध्या जवळपास ३५० दशलक्ष डॉलरची होते. ती पुढील तीन वर्षांत एक अब्ज डॉलरपर्यंत पोचविण्याचा शासनाचा मानस आहे.
संपादकीय
संपादकीय

मागील काही वर्षांत निर्यातीत आघाडी घेतलेल्या आपल्या देशाची निर्यात आता घटत चालली आहे. २०१५-१६ या वर्षाच्या तुलनेत २०१६-१७ या वित्तीय वर्षात शेतमालाची निर्यात सहा टक्क्यांनी कमी झाली आहे. नोटाबंदी, जागतिक बाजारात आपल्या शेतमालाचे तुलनेने अधिक दर, काही शेतमालाच्या निर्यात अनुदानात शासनाने केलेली कपात तर काहींवर लादलेले निर्बंध ही निर्यातीतील घटीची प्रमुख कारणे आहेत. अलीकडे मात्र निर्यातवृद्धीसाठी शासन पातळीवर काही पावले उचलली जात आहेत. सेंद्रिय उत्पादने, डाळींची खुली केलेली निर्यात, काही देशांत थेट कार्गोसेवा सुरू करणे, साखर निर्यातीसाठी प्रोत्साहनपर अनुदानाचे आश्वासन यांचा त्यात उल्लेख करता येईल.

आपल्या देशातून ताजी फळे-भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ, प्रक्रियायुक्त खाद्यपदार्थ, मांस आदींची निर्यात होते. ही निर्यात प्रामुख्याने आपल्या शेजारील पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळपासून आखाती, युरोपियन देशांत केली जाते. असे असले तरी अपेडानुसार जागतिक बाजारपेठांत आपला वाटा केवळ एक टक्काच आहे. खरे तर भारताचे भौगोलिक स्थान पाहता युरोप, मध्य-पूर्व देशांसह जपान, सिंगापूर, थायलंड, कोरियापर्यंत आपला शेतमाल सहज पोचू शकतो. त्यामुळे शेतमाल निर्यातीसाठी शेतकरी, शासन, निर्यातदार यांनी प्रयत्न वाढविले तर जागतिक बाजारातील आपला निर्यातीचा टक्का निश्चित वाढू शकतो. राज्यातून फळे भाजीपाल्यासह सेंद्रिय उत्पादने, मांस, मांसे निर्यातवृद्धीसाठी मुंबई ते काबूल (अफगाणिस्तान) अशी थेट कार्गोसेवा नुकतीच सुरू करण्यात आली आहे. दोन्ही देशांतील व्यापारवृद्धीसाठी ही मोठी संधी असून, त्याचा लाभ घ्यायला हवा. 

अफगाणिस्तान हा आपला पारंपरिक आयातदार देश आहे. या देशाला आपली वार्षिक निर्यात सध्या ३५० दशलक्ष डॉलरची होते. ती पुढील तीन वर्षांत एक अब्ज डॉलरपर्यंत पोचविण्याचा शासनाचा मानस आहे. सध्या नाशवंत शेतमालाची रस्ते वाहतुकीद्वारे निर्यात ही जवळपास अशक्य बाब आहे; परंतु पर्यायच नसल्यामुळे अशाही परिस्थितीत निर्यात होते. मात्र त्याचा वाहतूक खर्च जास्त पडतो. आता आठवड्यातून एकदा विमान कार्गोद्वारे अफगाणिस्तानला शेतमाल पाठविण्याचा निर्णय आणि त्यास सुरवातही झाली आहे. सध्या सुमारे ४० टन फळे-भाजीपाला अफगाणिस्तानात जात अाहे. विशेष म्हणजे आपल्या फळे-भाजीपाल्यासह दुग्धजन्य पदार्थ, प्रक्रियायुक्त पदार्थ, शेळी-मेंढीचे मटन, मांस, अंडी यांना अफगाणिस्तानातून मोठी मागणी आहे. त्यामुळे निर्यातीत अनेक पटीने वाढ होऊ शकते.

एक वर्षापूर्वी दोन्ही देशांत झालेल्या द्विपक्षीय करारानुसार त्या देशातील सफरचंदसारखी फळे, सुकामेवापण योग्य दरात आपल्या येथील ग्राहकांना मिळू शकतो. आपले राज्य शेतमालाच्या निर्यातीत मुळातच आघाडीवर आहे. त्यात विविध देशांकडून आपल्या शेतमालास मागणी वाढत चालली आहे, ही बाब जमेचीच म्हणावी लागेल. पूर्वी युरोप वगळता इतर देशांत कसल्याही शेतमालाची निर्यात चालत होती. परंतु आता आरोग्याच्या बाबतीत सर्वच देश सजग झाले आहेत. त्यामुळे निर्यातीमध्ये गुणवत्तापूर्ण, रेसिड्यूफ्री मालाचा सातत्याने पुरवठा होईल, याची काळजी शेतकरी, निर्यातदार यांनी घ्यायला हवी. केंद्र-राज्य शासनानेही जगाच्या पाठीवर जेथे निर्यातीची संधी आहे, तेथे आपला शेतमाल लवकर आणि कमी खर्चात पोचेल, अशा सेवासुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com