दिल्लीचा धडा

आरोग्य आणीबाणी हटविल्यानंतर दिल्लीचे जनजीवन पूर्वपदावर आले असले, तरी वाढत्या प्रदूषणामुळे तेथील लोकांच्या आरोग्याचा धोका मात्र कमी झालेला नाही.
संपादकीय
संपादकीय

दरवर्षीच थंडीला सुरवात झाली की दिल्लीतील प्रदूषणाची स्थिती गंभीर होते. या वर्षी तर दिल्लीचे रूपांतरच एका गॅस चेंबरमध्ये झाले होते. या चेंबरमध्ये सर्वांचाच जीव घुटमळत होता. शेवटी पर्यावरण व प्रदूषण नियंत्रण अधिकारिणीला दिल्लीत आरोग्य आणीबाणी घोषित करावी लागली. या आणीबाणीमध्ये मुलं, महिला, वृद्ध  यांना घराबाहेर न पडण्यास सांगण्यात येऊन यातून बाहेर पडण्यासाठी शाळेला सुटी घोषित करण्यात आली. बाहेरच्या ट्रक वाहनांवर बंदी, नवीन बांधकामाचे काम थांबविणे असे उपाय सुचविण्यात आले होते. आरोग्य आणीबाणीतून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करायचे सोडून राज्यकर्ते मात्र एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या खेळात गुंग होते. हवेच्या प्रदूषणाबरोबर राजकीय प्रदूषणालाही लोक कंटाळले होते. शेवटी निसर्गच दिल्लीकरांच्या मदतीला धाऊन आला. हिमालयात झालेल्या बर्फवृष्टीने वातावरणात बदल होऊन दिल्लीतील धुक्याचा विळखा कमी झाल्यानंतर आरोग्य आणीबाणी हटविण्यात आली.

आता तेथील जनजीवन पूर्वपदावर आले असले, तरी वाढत्या प्रदूषणामुळे तेथील लोकांच्या आरोग्याचा धोका मात्र कमी झालेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका सर्वेक्षणानुसार प्रदूषणाच्या स्थितीत दिल्ली जगात अग्रेसर असून, ग्वॉलीयर आणि रायपूरसह इतरही अनेक शहरांतील प्रदूषणाची स्थिती अत्यंत बिकट असल्याचे आढळून आले आहे. राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद या शहरांमध्येसुद्धा दिवसेंदिवस प्रदूषणात वाढ होत आहे. त्यामुळे दिल्लीपासून धडा घेऊन देशभरातील सर्वच शहरांनी हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी पावले उचलायला हवीत.

हवेच्या प्रदूषणाची कारणे स्पष्ट आहेत. वाहनांतून बाहेर पडणारा धूर हवेच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात भर घालतो. शहर परिसरातच औद्योगिकरण वाढत आहे.  औद्योगिक विषारी वायूंबरोबर रोजगारांसाठी शहरात आलेल्या लोकांमुळेही शहरावरील ताण वाढतोय. पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये भात, गहू पिकांची कापणी केल्यानंतर पिकांचे अवशेष शेतातच जाळले जातात. दिल्ली एनसीआरमधील वाढत्या प्रदुदूषणास हेही एक महत्त्वाचे कारण आहे. हवा प्रदूषित कशामुळे होते, हे माहीत असताना योग्य ती खबरदारी घेतली, तर प्रदूषणापासून मुक्ती मिळू शकते. खरे तर ही जबाबदारी सर्वांचीच असली, तरी यात शासनाचा पुढाकार महत्त्वाचा आहे.

शहरांमध्ये सिटी बस, लोकल-मेट्रो रेल्वे अशा पब्लिक ट्रान्सपोर्टच्या सोयी वाढवून लोकांना याचाच वापर करण्यासाठी आग्रह करायला हवा. सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था योग्य वेळ आणि प्रमाणात उपलब्ध झाल्यास लोकांकडूनच त्याचा वापर वाढेल. शहरांवरील सर्वच प्रकारचा ताण कमी करायचा असेल, तर येथून पुढे औद्योगिक वसाहती शहरांभोवती विळखा घालणार नाहीत, हेही पाहावे लागेल. 

पीक अवशेष जाळल्यानंतर होणारे हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी त्यांचा वापर सेंद्रिय खते बनविणे वीजनिर्मितीसाठी करायला हवा. राज्यात पूर्वी उसाचे पाचट सर्रासपणे जाळले जात होते, परंतु आता त्यांचा वापर बहुतांश शेतकरी आच्छादनासाठी करीत असून, त्याचे फायदेही त्यांच्या लक्षात आले आहेत. असेच प्रबोधन इतर पीक अवशेषांबाबत वाढवावे लागेल, तसेच गहू, भातासह इतरही पिकांच्या अवशेषांपासून वीजनिर्मितीकरिता शासनाने पुढाकार घ्यायला हवा. दिल्लीमध्ये राष्ट्रीय हरित लवादाने ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन’ला (एनटीपीसी) नोटीस बजावून ‘सीएसआर’च्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून पीक अवशेष खरेदी करून त्यावर वीजनिर्मिती करा, असे सांगितले आहे. लवकरच एनटीपीसी याबाबत निविदा काढणार आहे. देशभर सर्वच पीक अवशेषांची योग्य विल्हेवाट लावण्याकरिता तेथील शासनासह कॉर्पोरेट हाउसेस, सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेतल्यास प्रदूषणास आळा बसून शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com