हमला लष्करी अळीचा

आफ्रिकी देशातील लष्करी अळीचा उद्रेक आणि त्यातून झालेले नुकसान पाहता एफएओने दिलेला इशारा भारताने गांभीर्याने घ्यायला हवा.
संपादकीय
संपादकीय

आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर लष्करी अळीने (आर्मी वर्म) आपला मोर्चा आशिया खंडाकडे वळविला आहे. आशिया खंडात सर्वप्रथम ही अळी भारतात दाखल झाली असून, कर्नाटकपाठोपाठ तेलंगणामध्ये ती आढळून आली आहे. लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने भारतासह आशिया खंडातील अन्नसुरक्षा धोक्यात येणार असल्याचा इशारा ‘अन्न व कृषी संघटने’ने (एफएओ) दिला आहे. लष्करी अळी ही बहुभक्षी कीड आहे. या किडीचा प्रादुर्भाव भात, मका, ज्वारी या धान्‍यपिकांबरोबर सोयाबीन, कापूस, बटाटा, ऊस अशा ८० प्रकारच्या वनस्पती प्रजाती अथवा पिकांवर होतो. आफ्रिका आणि आशिया खंडातील काही देशात धुमाकूळ घालत असलेली ‘फाल आर्मीवर्म’ ही कीड प्रथमतः २०१६ मध्ये आफ्रिकेत आढळली. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांत ही कीड ३८ हून अधिक आफ्रिकन देशात पोचून आता इतर खंडातील देशांवर हमला करायला सज्ज आहे. अळीवर्गीय किडींसाठी सध्या पोषक वातावरण आहे. लष्करी अळीचे प्रजनन अत्यंत जलद होते. प्रसारही झपाट्याने होतो. ही कीड रात्रीच्या वेळी पिकावर तुटून पडते. काही वेळात पिकांचा पडशा पाडते. दिवसा ही कीड तण, ढेकळांच्या खाली लपून बसते. या किडीच्या नियंत्रणासाठी कीडनाशकांचा वापर होतो. गंभीर बाब म्हणजे हा उपाय फारसा प्रभावी ठरताना दिसत नाही. 

आफ्रिकी देशातील लष्करी अळीचा उद्रेक आणि त्यातून झालेले नुकसान पाहता एफएओने दिलेला इशारा भारताने गांभीर्याने घ्यायला हवा. लष्करी अळीच्या अनेक प्रजाती असून कर्नाटक, तेलंगणामध्ये आढळून आलेली कीड आफ्रिकेमध्ये अतिनुकसानकारक ठरलेलीच आहे का? याची तपासणीअंती खात्री करून घ्यायला हवी. तसे असले तरी सध्या दोन राज्यांत झालेला या किडीचा प्रादुर्भाव प्राथमिक पातळीवर असून तो तेथेच कसा थांबेल, याबाबतची काळजी घ्यायला हवी. हे करीत असताना बाहेर देशातून या किडीचे कोष, अंडी आदी भाग कोणत्याही परिस्थितीत देशात येणार नाहीत, याबाबत क्वारंटाईन विभागाने अतिदक्षता पाळली पाहिजे.

आपल्या देशाचा विचार करता अल्प, अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांची संख्या ८० टक्केच्या वर आहे. हा शेतकरी वर्ग प्रामुख्याने अन्नधान्ये पिके घेऊन देशाला अन्नसुरक्षा बहाल करतो. देशातील हा शेतकरी वर्ग मुळातच प्रचंड आर्थिक अडचणीत आहे. हा शेतकरी लष्करी अळीच्या कचाट्यात सापडला तर अन्नसुरक्षेबरोबर येथील शेती व्यवसाय मोडकळीस येऊ शकतो. या बाबींचा विचार करून हे संकट देशावर येणार नाही, याकरिता शेतीतज्ज्ञ, कृषी विस्तार कार्यकर्ते, नियोजनकर्ते, शेतकरी आणि शासन यांचे एकत्रित प्रयत्न गरजेचे आहेत. या घातक किडीला प्रतिबंध करण्यासाठी अमेरिका, आफ्रिका या देशांचा अनुभव आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतो, तेव्हा याबाबतसुद्धा शासनाने पुढाकार घ्यायला हवा. लष्करी अळीचा प्रादुर्भाव, प्रसार रोखण्यासाठी केवळ कीडनाशकांचा वापर निष्प्रभ ठरतो. कीडनाशकांचा वापर हे खर्चिक आणि पर्यावरणास घातक देखील आहे. अशावेळी लष्करी अळीच्या एकात्मिक कीड नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणीव जागृती निर्माण करावी लागेल. आफ्रिकी देशांनी शेत स्वच्छता मोहीम, आंतरपीक पद्धती, सापळा पिकांचा वापर, कामगंध सापळे, जैविक कीडनाशके; तसेच या किडींचे नैसर्गिक शत्रू अशा विविध घटकांद्वारे या किडीवर नियंत्रण मिळविले आहे. आपल्या देशातसुद्धा याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रबोधन वाढवावे लागेल. असे केले तरच लष्करी अळीचा हमला आपण रोखू शकू.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com