हेतूविना वापर बेकार
विजय सुकळकर
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

बीटी कापूस बियाण्यांच्या वापरातून मूळ हेतू साध्य होणे तर दूरच; त्याबाबत तक्रारी वाढत असताना केंद्र शासनाने गांभीर्याने विचार करायला हवा.
 

यवतमाळ जिल्ह्यात कापसावर फवारणी करताना विषबाधा होऊन मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी-शेतमजुरांचा आकडा १८ वर जाऊन पोचला आहे. २५ जणांना दृष्टिबाधा झाली असून, विषबाधित ७०० च्या वर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बोगस कीडनाशकांचा सुळसुळाट, अधिक नफ्याच्या हव्यासापोटी कृषी सेवा केंद्रचालकांची चुकीच्या मात्रेची शेतकऱ्यांना शिफारस, फवारणी करताना घ्यावयाच्या काळजीबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रबोधनाचा अभाव आदी बाबी विषबाधेच्या घटनेने उजागर केल्या आहेत. या प्रकरणाची सविस्तर चौकशी होऊन दोषींवर कारवाई ही व्हायलाच हवी. ही घटना बीटी कापसावर कीड-रोगांचा मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या प्रादुर्भावाकडेही आपले लक्ष वेधते.

खरे तर कापसावरील फवारणीचा खर्च कमी करून उत्पादकतेत वाढ होईल, असा दावा मोंसॅन्टो कंपनीचा होता. म्हणून तर कापूस उत्पादकांना दिलासा देण्याकरिता बोंडअळीस प्रतिकारक बीटी कापसाच्या व्यावसायिक लागवडीस देशात सुमारे १५ वर्षांपूर्वी परवानगी देण्यात आली. मात्र, बीटी कापसावर सुरवातीपासूनच रसशोषक किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो.

मागील चार-पाच वर्षांपासून जुलै-ऑगस्टमध्ये बीटी कापसावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. कापसावरील सर्व प्रकारच्या बोंडअळ्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी बोलगार्ड-२ (बीजी-२) वाण कंपन्यांनी बाजारात आणली. या वाणांच्या बियाण्यांचे दरही अधिक आहेत. असे असताना महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगाण, गुजरात, पंजाब, हरियाना, राजस्थानातील कापूस उत्पादक रसशोषक किडी आणि गुलाबी बोंडअळीच्या वाढत्या प्रादुर्भावाने त्रस्त आहेत. त्यातच राज्यात कापूसपट्ट्यात कृषी विभागाने केलेल्या पाहणीत ५७१ गावांमध्ये बीजी-२ चे सदोष बियाणे आढळून आले आहेत. सदोष बियाण्यांमुळे बीटी कापसाचे पावणेदोन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्र बाधित झालेले असून, याद्वारे राज्यातील कापूस उत्पादकांचे होणारे नुकसान आपल्या सर्वांच्या लक्षात यायला हवे.  

गुलाबी बोंडअळी तसेच रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी फवारणीवरील खर्च वाढत असल्याने बीटी कापूस बियाण्यांच्या वापराबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी विनंती राज्य शासनाने या वर्षीच्या हंगामाच्या सुरवातीलाच केली होती. त्याकडे केंद्र शासनाचे लक्ष दिसत नाही.

‘सीआयसीआर’चे माजी संचालक डॉ. केशव क्रांती यांनीसुद्धा देशभरातील बीटी कापसाचा अभ्यास करून केंद्र शासनाला एक अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये अनेक कापूस उत्पादक राज्यांमध्ये गुलाबी बोंडअळीचा प्रभाव वाढल्याचे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले. गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणाचा नाहक भुर्दंड उत्पादकांना सहन करावा लागत असल्याचेही त्यात म्हटले आहे. याकडेही केंद्र शासनाचे दुर्लक्ष झालेले आहे. त्यातच राज्यात आता सदोष बीटी बियाण्याचे प्रकरण समोर आले आहे.

सदोष बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान बियाणे उत्पादक कंपन्यांकडून वसूल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असला, तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी. निविष्ठा उत्पादक कंपन्या स्वःतच्या चुकीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तरी भरपाई देण्याएेवजी त्यातून पळवाटा काढत सुटण्याचाच प्रयत्न करतात. असे होणार नाही याची काळजी राज्य शासनाने घ्यायला हवी.

महत्त्वाचे म्हणजे बीटी कापूस बियाण्यांच्या वापरातून मूळ हेतू (फवारणीचा कमी खर्च आणि अधिक उत्पादकता) साध्य होणे तर दूरच; त्याबाबत तक्रारी वाढत असताना केंद्र शासनाने गांभीर्याने विचार करायला हवा. त्याच वेळी कापूस उत्पादक राज्यांमध्ये संकरित बीटींना पर्यायी देशी, सरळ वाणांत बीटीच्या संशोधनाला गती मिळायला हवी. संकरित बीटीला पर्यायी वाण विकसित झाल्याशिवाय बीटी वाण उत्पादक कंपन्यांची देशातील एकाधिकारशाही संपुष्टात येणार नाही.

इतर अॅग्रो विशेष
यशवंत सिन्हा आता शेतीसाठी आवाज उठविणारअकोला : अाज देशातील सर्व शेतकऱ्यांना समस्यांपासून...
विदर्भ, खानदेशच्या उत्तर भागांतून...पुणे : गेल्या महिन्यात सुरू झालेल्या परतीच्या...
उस लागवड तंत्रज्ञानआजची सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता पाहता ऊस...
कीटकनाशक विषबाधेचा अहवाल देणे बंधनकारकपुणे : शेतीसाठी कुठेही कीटकनाशकांची हाताळणी अथवा...
मसाला उद्याेगातून भारतीताईंनी साधला ’...काळा मसाल्यासोबत शेंगा, कारळा, जवस चटण्यांचे...
गोसंवर्धन, प्रशिक्षण हेच 'गोकुलम...नांदुरा बुद्रुक (जि. अमरावती) येथील गोकुलम...
ज्वारी चारा पीक लगवड तंत्रज्ञान ज्वारी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे पीक आहे....
यवतमाळ जिल्ह्यात शेतमजुरांची होणार...मुंबई : कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे अनेकांचा...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाजपुणे ः काेकण, गाेवा, मध्य महाराष्‍ट्र व...
आधुनिक बैलगाडीमुळे होईल बैलांवरील ताण...उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संशोधक डॉ. जयदीप...
कडधान्यांच्या अायातीत वाढ !मुंबई ः कडधान्यांच्या अायातीवर केंद्र सरकारने...
बहाद्दर शेतकऱ्यांचा होणार गौरव पुणे - प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश...
खतांवरील अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक... नवी दिल्ली ः खतांवरील अनुदान लाभार्थी...
मंगळवारपर्यंत पावसाची शक्‍यता, त्यानंतर...सर्व हवामान स्थिती पाहता ता. १४ ऑक्‍टोबर रोजी...
फवारणीसाठी चार हजार गावांमध्ये संरक्षण...नगर : यवतमाळ जिल्ह्यात विषबाधेमुळे झालेल्या...
पावसाळी परिस्थितीत द्राक्ष बागेचे...सध्या काही ठिकाणी द्राक्ष बागेत आगाप छाटणी झालेली...
चवळी, मारवेल, स्टायलाे चारा लागवड...चवळी :  चवळी हे द्विदल वर्गातील...
मूग, उडीद खरेदी केंद्र उद्घाटनाच्या...अकोला : शासन अादेशानुसार नोंदणी केलेल्या...
कृषी सल्ला : पिकांचे नियोजन, कीड व रोग...सद्य परिस्थितीमध्ये पिकांच्या नियोजन व कीड व...
आॅनलाइन नोंदणी अडकली नियमातकोल्हापूर : हमीभाव खरेदी केंद्राबरोबरच अन्य...